ठसा – शिबू सोरेन

>> अतुल जोशी

झारखंडमधील गरीब आदिवासींच्या संघर्षाचे ‘नायक’ म्हटले गेलेले तेथील माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेले शिबू सोरेन झारखंडमधील लाखो आदिवासींसाठी आदर्श होते. झारखंड आणि देशातीलही अनेक जण त्यांना ‘दिशोम गुरू’ म्हणून संबोधत असत. ‘दिशोम गुरू’ याचा अर्थ मार्गदर्शक, योग्य दिशा दाखविणारा. झारखंडमध्ये मागील सहा-सात दशकांपासून शिबू सोरेन यांची प्रतिमा हीच होती. 1970 च्या दशकात झारखंडमधील गरीब आदिवासींवर होणारे अन्याय, जुलूम, सावकारी पाश याविरोधात एक बंडखोर, लढवय्या नेता म्हणून शिबू सोरेन यांचा उदय झाला. त्यासाठी सावकारांनी केलेली त्यांच्या वडिलांची हत्या कारणीभूत ठरली. शिबू सोरेन यांचे आजोबा ब्रिटिश काळात ‘टॅक्स तहसीलदार’ होते, तर वडील सोबरन सोरेन हे पेशाने शिक्षक आणि विचाराने गांधीवादी होते. झारखंडमधील सर्वाधिक शिक्षितांपैकी एक म्हणून सोबरन सोरेन यांची ओळख होती. त्या काळात झारखंडमध्ये सावकारी पाशात सर्वच गरीब आदिवासी अडकले होते. कर्जाच्या दुष्टचक्रात अडकवयाचे, त्यातून त्यांच्याकडून अवाच्या सवा पैसे वसूल करायचे आणि ते न देऊ शकणाऱयांच्या जमिनी लाटायच्या. या सावकारीविरुद्ध शिबू यांचे वडील खंबीरपणे उभे ठाकले. त्यांचा हा संघर्ष स्थानिक सावकारांना रुचणारा नव्हताच. त्यातूनच सोबरन सोरेन यांची हत्या झाली आणि शिक्षण घेणाऱया शिबू सोरेन यांच्या आयुष्यात येथेच यू टर्न आला. शिक्षण सोडून ते आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सावकारीविरोधात रस्त्यावर उतरले. झारखंडमधील एक आक्रमक आदिवासी युवा नेता बनले. विशेषतः झारखंडमधील आदिवासी तरुणांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले. भलीमोठी दाढी आणि त्यावरून हात फिरवत बोलणारे शिबू सोरेन पाहिल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत असे. 1972 मध्ये शिबू सोरेन यांनी काॅम्रेड एके रॉय, विनोद बिहारी महतो यांच्या सहाय्याने ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ या त्यांच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी ‘धनकटनी’ आंदोलन सुरू केले. सावकारांनी शेतातील धान्य कापून नेऊ नये म्हणून धनुष्यबाण घेऊन राखण करणाऱया आदिवासी तरुणांची फौजच सोरेन यांनी उभी केली. आदिवासी महिला शेतात येत असत आणि जमीनदारांच्या शेतातील पिके कापून नेत. त्या वेळी धनुष्यबाण घेतलेले आदिवासी युवक संरक्षण करीत. त्यात अनेकदा हिंसाचार घडले. अनेकांचे बळी गेले. या आंदोलनाचे एक वैशिष्टय़ असे होते की, शिबू सोरेन यांनी आंदोलनकर्त्यांसाठी एक नियम केला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली गेली. संघर्ष शेतातला असल्याने तो शेतातच होईल. त्यामुळे पूर्ण आंदोलनात जमीनदारांच्या शेतीशिवाय पुठल्याही संपत्तीवर आच आली ना त्यांच्या पुटुंबातील महिला-मुलांवर. अर्थात, याच आंदोलनाने त्यांना ओळख मिळाली. तेथूनच ते झारखंडमधील आदिवासींचे ‘मुक्तिदाते’ म्हणून पुढे आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 40 वर्षे त्यांनी स्वतः झारखंडसाठी संघर्ष केला. ग्रामपंचायत आणि विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत होणारे शिबू सोरेन नंतर 1980 ते 2014 या काळात तब्बल आठ वेळा दुमका लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. झारखंडचे मुख्यमंत्रीपद त्यांनी तीन वेळेस सांभाळले. अर्थात, तिन्ही वेळेस त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांचे पुत्र हेमंत यांनीदेखील मुख्यमंत्रीपदाचा वडिलांचा वारसा पुढे चालवला. मात्र वडिलांप्रमाणेच त्यांनाही राजकीय शत्रुत्व आणि वाद यातून तुरुंगवास भोगावा लागला. शिबू सोरेन यांची चार-पाच दशकांची राजकीय कारकीर्द संघर्ष आणि वाद-वादंग यांनी भरलेली होती. मात्र त्याचा परिणाम लोकांचा त्यांना असलेल्या पाठिंब्यावर झाला नाही. झारखंडमधील आदिवासींसाठी लढणारा एक बंडखोर लढवय्या नेता ही त्यांची ओळख कायम राहिली. आज ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांची ती ओळख तेथील आदिवासींच्या मनावरून पुसली जाणार नाही.