50 वर्षांचा शिवाजी पार्कचा बाप्पा

77

>> शिबानी जोशी

दादरचा शिवाजी पार्कातील उद्यान गणेश. माघी गणेशोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेश जयंतीसोबतच हा बाप्पा आपली पन्नाशीही साजरी करतोय.

समस्त दादरवासीयांच्या नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाची अस्मिता ज्या मैदानाशी जोडली गेली आहे ते ‘शिवाजी पार्क’ म्हणजे समस्त आबालवृद्धांचे जागृत स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणत्याही वास्तूला श्रींचं अधिष्ठान असलं तर ती पवित्र होऊन जाते. तसं श्री उद्यान गणेशाचं अस्तित्व. शिवाजी पार्क मैदानाला मंगल करून टाकत शिवाजी पार्कवरील उद्यान गणेश मंदिराला यंदा 50 वर्षे होत आहेत. खरं तर शिवतीर्थावरील श्रीगणेश मंदिर आज जे उभं आहे तिथे अनेक वर्षांपूर्वी एका वटवृक्षाखाली श्री गणेशाचे वास्तव्य होतं. उजव्या सोंडेची श्रीगणेशाची तेजस्वी छोटी मूर्ती तिथे विराजमान होती. परंतु ही मूर्ती हळूहळू हजारोंच्या मनातल्या सिंहासनावर विराजमान झाली आणि माघ शुद्ध 4, शके 1891 म्हणजे 1970 च्या सुरुवातीला वटवृक्षाधिष्ठत श्रीगणरायांना ‘श्री उद्यान गणेश’ हे नामाभिदान प्राप्त झाले. शिवाजी उद्यानातील गणपती म्हणून उद्यान गणेश झाला.

वटवृक्षाखालील मूर्तीच्या छोट्या देव्हाऱ्यात सुंदर मंदिर उभे राहिले. काही वर्षांपूर्वी तर विश्वस्त मंडळाने अतिशय आकर्षक, प्रसन्न, सुशोभित मंदिर उभारले. हे मंदिर आता केवळ धार्मिक स्थान राहिले नसून इथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्रीडाविषयक उपक्रम राबविले जात आहेत. मंदिरात नित्यनेमाने अभिषेक, धार्मिक विधी, कीर्तन, प्रवचन, भजन स्पर्धा होत असतात. विशेष म्हणजे स्वच्छता अतिशय काटेकोरपणे राखली जाते.

आपल्या आवडत्या सचिन तेंडुलकरपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत असंख्य सेलिब्रिटी उद्यान गणेशाचं नित्यनेमाने दर्शन घेतात. ज्येष्ठ नागरिकांचं तर उद्यान गणेश मंदिर हे सकाळ-संध्याकाळचं हक्काचं स्थान आहे. वर्षानुवर्षे दररोज दर्शन घेणारे दूरदर्शनच्या सुधीर पाटणकर यांच्यासारखे अनेक भक्त लोकांनी इथे पाहिले आहेत.

या देवळाशी बसून अनेकांच्या आयुष्यात प्रेमाचे तुषार उडले आहेत. अनेक खेळाडूंचे करियर घडले आहे. इथे प्रत्येकाचे अड्डे असतात. अड्डय़ावर सुखदुःखाच्या गप्पा झाल्या की उद्यान गणेशाचं दर्शन घेऊन दादरकर घरी जातो. मॉर्निंग वॉक करताना गणपतीला नमस्कार करायचा, नाईट वॉक झाला की, गणेशासमोर शिरसावंद्य व्हायचं. प्रेयसीबरोबर आणाभाका घेऊन झाल्या की गणरायाच्या दर्शनाला त्यावर शिक्कामोर्तब करायचं. दहावी-बारावीच्या परीक्षेला जाता जाता गणपतीपुढे नतमस्तक होऊन पुढे जायचं. आयुष्यात दुःखद घटना घडली आणि कट्टय़ावर निराश होऊन एखादा बसला तरी त्याला मित्र गणपतीचं दर्शन घेऊन जा रे, बळ मिळेल तुला असं सांगणार व तोही चरणी माथा ठेवून दुःख मोकळं करणार. असा हा तिन्ही त्रिकाळ भजला जाणारा गणपती, त्याचं उद्यान गणेश मंदिर पन्नासाव्या वर्षात यंदा पदार्पण करतंय. जसे सेलिब्रिटी तसेच सामान्य आबालवृद्धही उद्यान गणेशाचे उपासक आहेत. दादरच्या आसपास राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप टोळकी टोळकी करून पार्कातल्या कट्टय़ावर बसतात. सुखदुःखाच्या गप्पा मारतात व गणपतीचे दर्शन घेऊन घरी परततात.

आशा जोशी आजी एकदा सांगत होत्या की, अमेरिकेत राहत असलेल्या नातवाच्या मुंजीची पत्रिका प्रथम देवाला ठेवावी म्हणून आम्ही नातवाला घेऊन मंदिरात गेलो. नातवाला मुंजीचा संस्कार कळावा या हेतूने मुंजीचा बेत केला होता आणि मंदिराच्या गुरुजींनी खरोखरच तो साध्य केला. नातवाशी  अतिशय आपलेपणाने त्यांनी चौकशी केली. देवासमोर ठेवलेली पत्रिका देवाला वाचून दाखवून त्याला आमंत्रण दिलं आणि नातवाला आशीर्वादही दिले. देवच नाही देवाच्या आजूबाजूचेही अतिशय अगत्यशील असल्याने ‘उद्यान गणेश’ आपला वाटतो, असं त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या