ठसा – श्रीनिवास माधव देशपांडे

2375

>> ज्योती कपिले

श्रीनिवास माधव देशपांडे अर्थात बापूसाहेब देशपांडे हे वांद्रे येथील महात्मा गांधी सेवा मंदिर याचे अध्यक्ष होते. 1948 साली बापूसाहेब यांचे वडील माधव देशपांडे आणि त्यांच्या पाच मित्रांनी दोन हजारांत जागा विकत घेऊन महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या कार्याने प्रेरित होऊन महात्मा गांधी सेवा मंदिराची स्थापना केली. गांधीजी आणि विनोबाजी हे माधव देशपांडे अर्थात बापूसाहेबांच्या वडिलांचे मित्र होते. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेले बापूसाहेब देशपांडे हे 1982 साली महात्मा गांधी सेवा मंदिर या ट्रस्टचे कामकाज पाहू लागले. त्यांच्या दूरदर्शीपणाने 1998 साली ट्रस्टची स्वतःची दोन मजली इमारत झाली. तेव्हापासून समाजाचा संस्थेच्या कामात सहभाग असावा यासाठी गांधी जयंती सप्ताह सुरू करून या अंतर्गत विविध स्पर्धा आणि खेळ सुरू केले गेले. यात प्रामुख्याने महिला भजनी मंडळ स्पर्धा, बुद्धिबळ आणि महात्मा गांधी आणि त्यांच्या कार्यावर आधारित काव्य स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. त्यापैकी काव्यस्पर्धा हा उपक्रम आजतागायत चालू आहे. या स्पर्धेत मध्यमवर्गीय, तळागाळातील लोकं आवडीने भाग घेतात याचे बापूसाहेबांना आत्यंतिक समाधान होतं. येणारे स्पर्धक कवी दूरवरून भाडं  खर्च करून येतात त्यामुळे त्यांना अल्पसा प्रवासखर्च आणि जेवण मिळाले पाहिजे हे ते कटाक्षाने बघत असायचे. असा आगळावेगळा आयोजक मिळणं दुरापास्तच! महात्मा गांधी सेवा मंदिराच्या तीन मजली वास्तूत संस्थेची स्वतःची ब्लडबँक आणि अद्ययावत साधनांनी युक्त हॉस्पिटल असून इकडे अल्पदरात उपचार केले जातात. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्युझिक लव्हर क्लब यांचा शास्त्राrय संगीताला प्रोत्साहन म्हणून एक कार्यक्रम असतो. महात्मा गांधी सेवा मंदिर या संस्थेची सांगली जिल्हा, शिराळा तालुक्यात गुढे गावी डोंगरावर स्वतःची 76 एकर दान दिलेल्या जागेवर श्री कमलामाधव विद्यामंदिर उभे आहे.  या शाळेत लवकरच अकरावी/बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. इकडे दुग्धव्यवसाय हा युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम सुरू आहे. संस्थेचे असे उपक्रम राबवताना त्यांनी स्वतःही बरेच मोठे कार्य केले. बापूसाहेब देशपांडे यांना सोव्हिएत अर्थव्यवस्थेचा शिकण्यासाठी रशियन सरकारची स्कॉलरशिप मिळाली होती. तिकडच्या इकॉनॉमीचा अभ्यास करून त्यांनी ‘रशियन प्लॅनिंग’ असं अभ्यासपूर्ण  पुस्तकं लिहिले. ज्याच्या सहा प्रती त्यावेळी अमेरिकन युनिव्हर्सिटीने विकत घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी ‘जोशीकाका’ असं चरित्रपर लेखनही केले होते. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बापूसाहेब कार्यरत होते.

आपली प्रतिक्रिया द्या