
>> दुष्यंत पाटील ([email protected])
निसर्गाच्या प्रेमात पडून मिळालेला `सुकून’ चितारलेले हे चित्र. कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिकने काढलेले हे चित्र आयुष्याच्या कड्यावर उभं राहून, समोरच्या अनिश्चित भविष्याकडे पाहण्याचा संदेश देतं.
आजकाल एखाद्या हिल स्टेशनला गेलं तर सकाळी मोहक निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं. कड्याच्या टोकावर उभं राहिलं तर खाली दरी आणि समोर अथांग पसरलेलं धुकं दिसतं. लोक अशा ठिकाणी एक भारी पोज देतात, फोटो काढतात आणि इन्स्टाग्रामवर/फेसबुकवर टाकतात. अशा फोटोंना कॅप्शन असतं, `सुकून!’. अशा निसर्गाच्या आपण नक्कीच प्रेमात पडतो, अशा ठिकाणी आपल्याला `सुकून’ही मिळतो. गंमत म्हणजे कॅमेरा यायच्या आधी, इन्स्टाग्राम यायच्या आधी, अगदी दोनशे वर्षांपूर्वी एका माणसानं असाच एक `सीन’ पाहिला होता आणि त्यानं तो कॅनव्हासवर अशा काही भन्नाट पद्धतीनं रंगवला की, ते चित्र कलेच्या इतिहासात अजरामर झालं.
हे चित्र कित्येक पुस्तकांसाठी मुखपृष्ठ म्हणून व चित्रपटांमध्येही पाहायला मिळतं. पाश्चात्य मंडळी बऱयाचदा हे चित्र सोशल मीडियावर वापरतात. या चित्रात आपल्याला एका खडकावर उभा असलेला, पाठमोरा माणूस आणि समोर पसरलेला धुक्याचा महासागर दिसतो! या चित्राचं नाव आहे -`द वांडरर अबोव्ह द सी ऑफ फॉग’ (धुक्याच्या सागरावरचा मुसाफिर).
कल्पना करा की, आपण एक उंच डोंगर चढून गेलोय, दमून वर पोहोचलोय आणि तिथे एखाद्या कडय़ावर जाऊन उभं राहिलोय. तिथून खाली बघितलं तर आपल्याला दिसतं नुसतं पांढरंशुभ्र धुकं! गाव, रस्ते, झाडं, शेतं असं सगळं काही त्या धुक्यानं गिळून टाकलंय. आपल्याला त्या क्षणी कसं वाटेल? सगळं गाव, सगळे लोक खाली कुठेतरी आणि आपण उंच ठिकाणी असल्यानं आपण कुणीतरी `राजा’ असल्यासारखं वाटेल. पण त्याच वेळी, त्या अफाट निसर्गासमोर आपण किती क्षुल्लक आहोत, याचीही जाणीव आपल्याला होईल. चित्रकारानं नेमकं हेच त्या चित्रात दाखवलंय. 1818 साली कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिक नावाच्या एका जर्मन चित्रकारानं या महान चित्राची निर्मिती केली.
चित्रात एक माणूस गडद हिरव्या रंगाचा कोट घालून, हातात काठी घेऊन पर्वताच्या एका खडकाळ टोकावर उभा आहे. त्याचे केस उडत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याकडे पाठ करून उभा आहे. तो समोर पसरलेलं अथांग धुकं आणि त्यातून मधूनच डोकावणारे डोंगर पाहतोय. हे डोकावणारे डोंगर म्हणजे जणू काही धुक्याच्या समुद्रातली बेटंच आहेत. जर चित्रकारानं चित्रात त्या माणसाचा चेहरा दाखवला असता, तर चित्र पाहताना आपलं लक्ष त्या चेहऱयाकडे गेलं असतं. पण चित्रातला व्यक्ती पाठमोरा असल्यानं आपल्याला त्याचा चेहरा दिसत नाही. नकळत आपण त्याच्या जागी स्वतला ठेवतो! फ्रेडरिकला हेच हवं होतं. या चित्रातून चित्रकारानं आपल्याला चित्रातल्या व्यक्तीच्या नजरेतून पाहताना दिसणारं दृश्य पाहण्यासाठी आमंत्रित केलंय! आपण जेव्हा आयुष्याच्या एका टप्प्यावर उभे राहून भविष्याकडे बघतो, तेव्हा नेमकं असंच काहीसं फिलिंग येतं. भविष्यातल्या गोष्टी अनिश्चित असल्यानं आपल्याला काहीच स्पष्ट दिसत नाही.
या चित्राकडे बघून लोकांचे दोन गट पडतात. काही जणांना वाटतं की हा माणूस एक हीरो आहे. त्यानं कष्टानं तो डोंगर चढलाय. आता तो वरती उभा राहून आपल्या जिंकलेल्या राज्याकडे बघतोय. त्याच्या उभं राहण्यात एक प्रकारचा रुबाब आहे. एक पाय वरच्या खडकावर ठेवून तो जणू सांगतोय, `मी या दुनियेच्या वर आलोय!’ दुसऱया गटाचं म्हणणं आहे की, तो माणूस त्या अफाट निसर्गासमोर किती छोटासा दिसतोय. ते धुकं, ते डोंगर त्या माणसासमोर महाकाय वाटतात. माणूस कितीही मोठा झाला तरी निसर्गापुढे किंवा देवापुढे तो शून्यच आहे, असं या दुसऱया गटातल्या माणसांना वाटतं. हे धुकं म्हणजे आयुष्यातला `अनिश्चित, माहीत नसणारा’ असा भाग आहे. (यात भविष्य, मृत्यू, देव अशा गोष्टी येतात ज्या आपल्याला दिसत नाहीत.) गंमत म्हणजे, फ्रेडरिकनं हे दोन्ही अर्थ त्यात दडवून ठेवलेत!
या चित्राकडे एका वेगळय़ा दृष्टिकोनातूनही पाहिलं जातं. अठराव्या शतकात युरोपमध्ये एक चळवळ सुरू झाली होती. त्या आधीचा काळ होता `एनलायटनमेंट’चा होता. `एनलायटनमेंट’च्या कालखंडात सगळय़ा गोष्टींचा विचार विज्ञानानं, बुद्धीनं आणि लॉजिकनं केला जायचा. पण लोक या कोरडय़ा `फॅक्टरी आणि मशीन’च्या जगाला कंटाळले होते. त्यांना भावना हव्या होत्या, निसर्ग हवा होता, जादू हवी होती. म्हणून मग `रोमँटिसिझम’ची चळवळ सुरू झाली. यात लॉजिकपेक्षा `फिलिंग्स’ महत्त्वाच्या होत्या. फ्रेडरिकचा हा `वॉन्डरर’ (मुसाफिर) त्याचंच प्रतीक आहे. तो शहराच्या गर्दीतून पळून निसर्गाच्या कुशीत आलाय, स्वतचा शोध घ्यायला. आजच्या भाषेत हा माणूस `डिजीटल डिटॉक्स’साठी सोलो ट्रिपवर गेलाय!
चित्राला दोनशेहून अधिक वर्षे झाली असली तरी आजही मोबाईलच्या जमान्यात हे चित्र आपल्याला आयुष्याच्या कडय़ावर उभं राहून, समोरच्या अनिश्चित भविष्याकडे (त्या धुक्याकडे) पाहण्याचा संदेश देतं!
(लेखक कला समीक्षक आहेत.)



























































