
>> अविनाश पाटील, कृष्णा चांदगुडे
सोशल डिस्टन्सिंग ऐवजी सोशल बॉयकॉट नव्हे, हे आपण पटवून दिले पाहिजे. मुळात ‘सोशल डिस्टन्सिंग’ ऐवजी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हा शब्द योग्य आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच शब्द वापरते. कारण हिंदुस्थानचे समाज वास्तव हे जात वास्तव आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग नव्हे, तर फिजिकल डिस्टन्सिंग अपेक्षित आहे. माणसाला प्रेम मिळाले तर त्याचे मनोबल वाढते.
कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव जगभर असल्याचे दिसून येत आहे. आपल्या देशातही वेगळी परिस्थिती नाही. या सर्व काळात सर्वत्र ‘सोशल डिस्टिंन्सग’ हा शब्द प्रचलित झाला आहे. पुन्हा कोरोनाशी तोंड देताना या सोशल डिस्टिंन्सग म्हणजे सामाजिक दुराव्याचा अनुभवदेखील दुर्दैवाने काही ठिकाणी येत आहे. अगदी सुरुवातीला परदेशातून आलेल्या व्यक्तींना संशयाने पाहिले गेले. पुण्या-मुंबईहून गावाकडे आलेल्या व्यक्तींनाही तसेच अनुभव आले. त्यांच्याशी व्यवहार बंद केले गेले. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या. खरं तर कोरोना तपासणी नकारात्मक आल्यावर त्या व्यक्तीस सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे, पण अनेक ठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्यसेवक, जे आपल्या प्राणाची बाजी लावून लढत आहेत त्यांची मानहानी झाली आहे. वास्तविक सध्याच्या परिस्थितीत असा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन सोडून देणे गरजेचे आहे.
एका बाजुने कोरोनाशी लढणार्या योद्ध्यांना टाळ्या, ताट वाजवून, पुष्पवृष्टी करत सन्मानित करण्यात येत आहे. मात्र राहत्या घरी शेजारच्यांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते हे निषेधार्ह आहे. कोरोनातून बर्या झालेल्या व्यक्तींना, शासकीय अधिकाNयांना अभिनंदन करत, टाळ्या वाजवत सन्मानाने घरी पोहोचवले जाते. परंतु हा आनंद क्षणभंगूर ठरायला नको.
कोरोना विषाणूच्या संसर्गाबरोबरच हिंदुस्थानात `सोशल डिस्टिंन्सग’ म्हणजेच सामाजिक दुरावा हा शब्द खूपच प्रचलित होऊ लागला आहे. त्याबद्दल आमच्यासह अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार, निवेदने पाठविली. त्यानंतर त्यांनी ‘फिजीकल डिस्टिंन्सग’ हा शब्द वापरला. प्रशासनात आणि माध्यमांमधूनदेखील त्वरित असे बदल करायला हवे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील आपले दस्तऐवज आणि निर्देशांमध्ये याच शब्दाचा वापर सुरू केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘सोशल डिस्टिंन्सग’ या शब्दाची व्याख्याही केली आहे. `ही संसर्गजन्य आजार रोखण्याची एक अचिकित्सकीय प्रक्रिया आहे. आजाराचा प्रसार रोखणे अथवा संसर्गाचा वेग कमी करता यावा म्हणून संसर्ग झालेले लोक आणि संसर्ग न झालेले लोक यांच्यातील संपर्क थांबवणे किंवा कमी करणे हा सोशल डिस्टिंन्सगचा उद्देश आहे. सोशल डिस्टिंन्सगमुळे आजाराचा फैलाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यात मदत मिळते’, असे आरोग्य मंत्रालयाने केलेल्या व्याख्येत म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) संसर्ग रोखण्यासाठी दुरावा राखण्याच्या उपायांना फिजिकल डिस्टिंन्सग या शब्दाचा प्रयोग करते. प्रारंभी हा शब्द वापरला जात होता हे खरे, परंतु त्यावर काही प्रवाद होते. त्यामुळे आता डब्ल्यूएचओ सोशल डिस्टिंन्सग शब्द अजिबात वापरत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने खूप विचारविमर्श केल्यानंतर सोशल डिस्टिंन्सग या शब्दाचा वापर बंद केला आहे. कोरोनाचा हा काळ शारीरिक दुरावा ठेवण्याचा आहे. सोबतच हा सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या एकजूट होण्याचाही काळ आहे, असे विशेषज्ञ सांगत आहेत. त्यामुळे `सोशल डिस्टिंन्सग या शब्दाचा वापर केवळ चुकीचाच नाही तर सामाजिकदृष्ट्या हानीकारकच आहे, असे नॉर्थईस्टर्न विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्रोफेसर डॅनियल एलड्रीच सांगतात. शारीरिक दुरावा राखा आणि सामाजिकदृष्ट्या ऐक्य अबाधित राखा, असा संदेशही त्या देतात असे राजस्थानातील ज्येष्ठ हिंदी साहित्यिक लेखक संदीप मील यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानी जनमानस सोशल डिस्टिंन्सग हा शब्द ज्या अर्थाने ग्रहण करते त्याच्या मागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. सोशल डिस्टिंन्सग हा शब्द प्राचीन काळापासून सामाजिक- सांस्कृतिक वर्चस्व कायम राखण्यासाठी वापरला जात आला आहे. आपल्या देशात `सोशल डिस्टिंन्सग’ कायमच शक्तीशाली समूहाकडून दुर्बल समूहावर थोपवण्यात येत आहे. भेदभाव आणि दुरावा राखण्यासाठी आणि अस्पृश्यतेची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीच्या रूपाने सोशल डिस्टिंन्सगचा वापर होत आला आहे. यासंबंधी फ्रान्सचे समाजशास्त्रज्ञ लुई दुमो यांनी त्यांच्या ‘होमो हायरार्किक्स’ या पुस्तकात विस्ताराने विवेचन केले आहे. वस्तुत: `सोशल डिस्टिंन्सग’चा कोरोना किंवा अन्य कोणत्याही आजाराशी काहीएक संबंध नाही. या शब्दाचा वापरच समाजाचे शक्ती संबंध समजावण्यासाठी करण्यात येतो. कोरोनाच्या फैलावाचा संबंध `फिजिकल डिस्टिंन्सग’ म्हणजेच शारीरिक दुराव्याशी आहे. म्हणजे आजारी व्यक्तीच्या शरीरापासून दूर राहण्याशी आहे. तुमचा आजार दुसर्याला देऊ नका आणि दुसर्याचा आजार तुम्ही घेऊ नका!
जातींमधील `सोशल डिस्टिंन्सग’ जातींचे अस्तित्व कायम राखण्यासाठी आहे. काही लोक `सोशल डिस्टिंन्सग ‘च्या सूत्राच्या आधारे लोकांसमोर जाती व्यवस्थेच्या औचित्याचे तर्क मांडू लागले आहेत. स्पर्श न करता केलेले अभिवादन म्हणजेच हात जोडून दूरून केला जाणारा नमस्कार हिंदुस्थानी परंपरेचे श्रेष्ठत्व दाखवून देते, असे सांगितले गेले. परंतु चरण स्पर्शही हिंदुस्थानी परंपरेचा भाग आहे, हे विसरले जाते.
इतिहासात राजा आणि प्रजा यांच्यातही `सोशल डिस्टिंन्सग’ आढळून येते. वर्तमानात गरीब आणि श्रीमंतातही दुरावा राखला जातो. कोणाची पत काय आहे, यावरच सामाजिक संबंध निर्धारित होतात. खेड्यांमध्ये मजुरांसाठी वेगळी भांडी ठेवणे आणि शहरांतही त्यांच्याशी दुरावा राखूनच वागणे हाही सोशल डिस्टिंन्सगचाच भाग आहे. तुम्ही विचार करा की, ज्या देशात जात, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती आदींच्या आधारावर सामाजिक दुरावा केला जातो, तेथे त्या लोकांना एकत्र येण्याचा विश्वास फक्त संविधानाने दिला आहे. एखाद्या महामारीचा गैरफायदा घेऊन वरिष्ठ जाती किंवा अन्य शक्तीशाली समूह जर सोशल डिस्टिंन्सगची धारणा भक्कम करत असतील तर त्यावर केवळ लक्षच ठेवून चालणार नाही तर वैचारिक पातळीवर त्याचा प्रतिकारही करायलाच हवा.
कोरोना संपल्यानंतर आपणावर आणखी मोठी जबाबदारी येणार आहे. त्यामुळे असा भेदभाव मोडण्यासाठी आपणास निकराचे प्रयत्न करावे लागतील. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सोशल बॉयकॉट नव्हे, हे आपण पटवून दिले पाहिजे. मुळात ‘सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग’ हा शब्द योग्य आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ हाच शब्द वापरते. कारण हिंदुस्थानचे समाज वास्तव हे जात वास्तव आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग नव्हे तर फिजिकल डिस्टन्सिंग अपेक्षित आहे. माणसाला प्रेम मिळाले तर त्याचे मनोबल वाढते. त्यामुळे आपल्यासमोर हे मोठे आव्हान आहे.
(लेखक अविनाश पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्याध्यक्ष आहेत आणि कृष्णा चांदगुडे हे जात पंचायतीला मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह आहेत.)



























































