आभाळमाया – चंद्रावरची माती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

मातीचं  मोल अफाट असतं. आपली सारी जीवसृष्टी माती-पाणी-उजेड-वारा यावरच अवलंबून असते. म्हणूनच भूमीला काळी आई म्हटलं जातं. पृथ्वीवरच्या ‘मातीतूनच’ आपण आलो. त्यामुळे या पाणीदार ग्रहावरच्या पाण्याचं महत्त्व जेवढं, तेवढंच मातीचंसुद्धा.

…आणि त्यातही माती चंद्रावरची असली तर?… तर तिचं दुर्मिळता मूल्य (स्केअरसिटी व्हॅल्यू) प्रचंडच. सध्याचे वर्ष माणसाच्या चंद्रावतरणाच्या मोहिमांची सांगता झाल्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करणारं. अपोलो 11 ते 17 या मोहिमांमधून फक्त अमेरिकेचे चांद्रवीर चंद्रावर उतरले. त्यांची संख्या आहे 24. मात्र त्यात एकाही महिलेला संधी मिळाली नाही हे कटुसत्य आहे. त्याविषयी 21 जुलैच्या लेखात सविस्तर. या महिन्यात चंद्रासंबंधीच्या वैशिष्टय़ांची माहिती घ्यायची. कारण हा चंद्र प्रथमच पादाक्रांत केल्याचा महिना.

या लेखात चंद्रावरच्या मातीविषयी जाणून घेऊ. 1993 मध्ये खगोल अभ्यासकांसह अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीला भेट देण्यासचा योग आला. हा ‘इस्रो’चाच उपक्रम आहे. त्यावेळी तिथे डायरेक्टर होते श्री. भंडारी त्यांनी खूप उत्साहाने आम्हाला अनेक वैज्ञानिक गोष्टींची माहिती दिली. अशांची तपासणी कशी केली जाते तेही तिथे पाहिलं. हिंदुस्थानात सापडलेलं डायनॉसॉरचं भलंमोठं निर्जीव अंडं भग्नावस्थेत जतन करून ठेवलेलं आढळलं आणि मुख्य म्हणजे चंद्रावरून अंतराळयात्रींनी आणलेली दगड-माती पाहता आली.

पौर्णिमेचा चंद्र जरी सूर्यप्ररकाशाचे परावर्तन झाल्याने चंदेरी दिसत असला तरी त्याचा पृष्ठभाग काळा कुळकुळीत आहे. चंद्रावरची माती म्हणजे कोळशाची पूड वाटावी अशी या मातीचे सुमारे 360 किलो भरतील एवढे नमुने अमेरिकेच्या चांद्रवीरांनी पृथ्वीवर आणले. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन याच देशांनी चांद्रपृष्ठावरची माती-दगड आणले आहेत.

कशी आहे चंद्रावरची माती? पृथ्वीवरच्या मातीपेक्षा ती खूपच वेगळी आहे. पृथ्वीपृष्ठावर आपण जी माती पाहतो त्यात दमटपणा, अनेक धातू आणि झाडपाल्यामुळे मिसळून गेलेला सुपीक गाळही असतो. चंद्र हा शुष्क उपग्रह आहे. तिथे पाणी मिळाल्याच्या बातम्या वारंवार येत असल्या तरी पृथ्वीसारखा विशाल जलसंचय दृष्टिपथात आलेला नाही. चंद्राच्या ध्रुवीय भागात कार्बनचे शुष्क बर्फ असलं तर त्यापासून पाणी मिळेल किंवा धूमकेतूंच्या आदळण्यामुळे साठलेलं बर्फ सापडेल. शिवाय, पृथ्वीच्या मातीत असलेला प्राणवायूही त्या मातीत नाही. चंद्रावर सतत कोसळत असलेल्या अशनी आणि उल्कांमुळे तिथे पृष्ठभागावरची माती मऊ पावडरीसारखी आहे. नील आर्मस्ट्राँग 21 जुलै 1969 रोजी चंद्रावर उतरले तेव्हाच त्यांचं त्या मातीत उमटलेलं ‘पाऊल’ आजही तिथे अत्यल्प वातावरणामुळे तसंच असू शकतं. फक्त ते धुळीच्या कारंजासारख्या उसळण्याने किंवा उल्का पडून नष्ट झालं नाही तरच!

चंद्रावरची माती चंद्रावर आदळणाऱ्या उल्का, अशनी, धूमकेतू यांच्या आघातांचा परिणाम आहेच. पण ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेली ‘फाईन डस्ट’सुद्धा आहे. अपोलो – 17 यानातून गेलेल्या अंतराळयात्रींना चंद्रावरच्या ‘शॉर्टी’ विवरात नारिंगी रंगाची माती आढळली. त्याशिवाय काचगोलक (स्फेरुल्स) आणि काळी माती चंद्रावर सतत होणाऱ्या अशनी आघातांमुळे पृष्ठभागाची उभी-आडवी रचना परस्परांत सम्मीलित होताना मुलायम माती तयार झाली. याला ‘गार्डनिंग इफेक्ट’ म्हणतात. चंद्रावरच्या मातीत लोहसुद्धा सापडल्याने काही ठिकाणी मृद्रंग नारिंगी असावा.

आता चंद्रावर वसाहत करायची तर ज्या कोणत्या गोष्टींचा प्राधान्याने विचार करावा लागेल त्यात चंद्राचा पृष्ठभाग खूप महत्त्वाचा. त्याविषयी, चांद्र वसाहतीच्या कल्पनेसंबंधीच्या लेखात नंतर जाणून घेऊ.

माणूस चंद्रावर गेला तो अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांच्या काळात. 1970 ते 73 या कालखंडात निक्सन यांनी चंद्रावरून आणलेल्या मातीचे नमुने 135 देशांना भेट म्हणून दिले. निक्सनचा स्वभाव बघता हे औदार्य मोठंच म्हणायचं. अर्थात हा वैज्ञानिक जगताचा निर्णय असणार.

आता या मातीचं नुसतं प्रदर्शन मांडून काय होणार? उद्या तिथे म्हणजे चंद्रावर जायचं आणि राहायचं ठरवलं तर शेतीभातीसाठी उपयुक्त जमीन नको? त्यासाठी मुळात त्या मातीचा प्रकार (प्रॉपर्टी) पृथ्वीवरच्या मातीसारखा नसल्याने त्यात पृथ्वीवरच्या वनस्पती कशा उगवणार? त्याबाबतचे प्रयत्न अनेक वर्षे सुरू होते आणि अगदी आता आता म्हणजे 2022 च्या मे महिन्यात चंद्रावरून आणलेल्या मातीत ‘थेल क्रेस’ (Thale Cress) नावाचं रोप उगवलं अशी आशादायक बातमी आली. चला… चांद्र वसाहतीसाठी आवश्यक ते एक तरी कोडं सुटलं असं वाटतंय. बाकी नंतर कळेलच!

>> [email protected]