आभाळमाया – महातेजोमेघ टॅरेन्टय़ुला

>> वैश्विक

मृग  या सुंदर तारकासमूहातील मेसिएच्या यादीमधल्या बेचाळीस क्रमांकाच्या (एम-42) ओरायन नेब्युलाची माहिती मागच्या लेखात घेताना तेजोमेघ ताऱ्यांना कसे जन्म देतात हेसुद्धा वाचलं. मात्र काही तेजोमेघ खुद्द ताऱ्यांच्या मृत्यूमधूनच जन्माला येतात! ‘मरणात खरोखर जग जगते’ अशी एका कवितेतली ओळ आहे. कविवर्य भा.रा. तांबे या कवितेत म्हणतात ‘मारिल मरणचि मरणा भावी, मम चिरंजीवपण ये मग ते.’ आता याचा वैश्विक संदर्भात विचार करायचा तर उत्पत्ती, स्थिती, विलय आणि त्यातूनच पुनर्निर्मिती अशी प्रक्रिया विश्वात सुरू असते एवढय़ापुरताच अर्थ घ्यायचा. मात्र वैज्ञानिक तथ्य तपासूनच कुणाच्या ‘मरणातून काय जन्मते’ याचा मागोवा घेणं योग्य. तर काही ताऱ्यांच्या अंतामधूनही तेजोमेघ जन्म घेतात. त्यांना ग्रहाकृती तेजोमेघ म्हणतात.

आपल्या सूर्यताऱ्याचेच उदाहरण घेऊ. सुमारे पाच अब्ज वर्षांनी हा दिनमणी रविराज म्हणजेच सूर्य कायमचा अस्ताला जाईल. ही त्याची अंत-प्रक्रियासुद्धा लाखो वर्षे चालेल. सूर्याच्या गाभ्यातील हायड्रोजनचे हिलियम वायूत रूपांतर करणारी ‘अणुभट्टी’ मंदावत गेली की, ऊर्जानिर्मिती ‘थंडावत’ जाईल. सूर्याच्या केंद्रकाचा त्याच्या बाहय़ आवरणावर असलेला ताबा सुटू लागेल आणि तेथील द्रव्य विस्तारत म्हाताऱ्या सूर्याचे लाल म्हाताऱ्यात रूपांतर होईल. त्याचा आवाका वाढू लागला की, पृथ्वीसह मंगळापर्यंतचे ग्रह त्या आवरणाच्या कवेत येतील. आपली जीवसृष्टी त्यापूर्वीच नष्ट झालेली असेल आणि इलॉन मस्कसारख्यांच्या प्रयत्नाने काही जण मंगळावर जाऊन बसले तरी त्यांची खैर उरणार नाही. पुढच्या वायुरूप ग्रहांवर वस्तीच अशक्य. त्यामुळे बाकीचे कल्पनाविलास तूर्तास बाजूला ठेवू.

आपला सूर्य त्याच्या विशिष्ट वस्तुमानामुळे श्वेतखुजा म्हणजे शुभ्र-बुटका तारा (व्हाइट ड्वार्फ) होऊन राहील. नेपच्यून ग्रहाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ विल्यम हर्षल यांनीच 1875 मध्ये अशा प्रकारच्या श्वेतखुजाचे पहिल्यांदा निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना तो एखाद्या ग्रहाच्या ‘चकती’सारखा दिसला. (आपल्या दुर्बिणीतून मंगळ-गुरू तसेच ‘चकती’सारखे दिसतात) यावरून हर्षल यांनी या श्वेतखुजाला ग्रहाकृती (खरं तर ग्रहसदृश तेजोमेघ असं नाव दिलं. आपला सूर्य पाच अब्ज वर्षांनी अशाच ग्रहाकृती तेजोमेघात (प्लॅनेटरी नेब्युलामध्ये) रूपांतरित होईल. तो तेव्हा कसा दिसेल हे पूर्वी घडलेल्या ग्रहाकृती तेजोमेघावरून समजतं. स्वरमंडल किंवा ‘लायरा’ तारकासमूहातील ‘एम-51’ हा ग्रहाकृती नेब्युला अशा कमी व्यासाचा आरसा असलेल्या चार इंची दुर्बिणीतूनही छान दिसतो. संधी मिळाल्यास जरूर पहा.

अतिप्रचंड ताऱ्याचा शेवट एका महास्फोटात होऊन त्यातील द्रव्य अवकाशात भिरकावले जाते. ते पुढे हजारो वर्षे दिसते. मात्र स्फोट होताना त्याचे तेज प्रखर असते. 1054 मध्ये वृषभ तारकासमूहातील ‘क्रॅब’ नेब्युलाचा स्फोट झाल्यावर अनेक रात्री त्यांच्या प्रकाशाने उजळत असल्याची नोंद चिनी खगोल निरीक्षकांनी करून ठेवली आहे. हिंदुस्थानात तशी नोंद का नसावी हे एक आश्चर्यच, पण कदाचित त्या काळात आपल्याकडे पावसाळय़ामुळे आकाश दाट ढगांनी व्यापलेले असल्याने नेब्युलाचे निरीक्षण करता आले नसावे असा एक तर्क केला जातो. मात्र ढगाळ वातावरणातही दिवसा पुरेसा प्रकाश असतोच. तसा किंवा रात्रभराचा ‘संधीप्रकाश’ तरी कोणी कसा नोंदला नाही याचे समाधानकारक उत्तर मात्र सापडत नाही. अशा महाताऱ्याच्या स्फोटक अंतानंतर बनलेल्या नेब्युलांना सुपरनोव्हाचे अवशेष (सुपरनोव्हा रेमनन्ट) असं म्हटलं जातं.

आता थोडं आपल्या आकाशगंगा दीर्घिकेची उपदीर्घिका असलेल्या ‘मॅजेलॅनिक क्लाऊड’मधल्या एका प्रचंड तेजोमेघाविषयी. हा तेजोमेघ विश्वातील एक प्रचंड आकाराचा तेजोमेघ असून तो आपल्या ‘परसातल्या’ एलएमजी म्हणजेच ‘लार्ज मॅजेलॅनिक क्लाउैड’चा भाग असून त्याला ‘30 डोरॅडस’ असंही म्हणतात. ‘लार्ज मॅजेलॅनिक क्लाउैड’ ही आपल्या मिल्की-वे किंवा आकाशगंगेची उपदीर्घिका आहे. त्याचप्रमाणे स्मॉल मॅजेलॅनिक क्लाउैड ही दीर्घिकाही आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून या दीर्घिका अवकाशात स्पष्ट दिसतात. आपल्याकडून त्या दिसत नसल्या तरी दक्षिण हिंदुस्थानच्या टोकावर जर कन्याकुमारीला गेलात तर या दोन्ही दीर्घिकांचं दर्शन होतं. याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. सोबत टेलिस्कोप असल्यास उत्तम. त्यांच्याविषयीची अधिक माहिती ‘दीर्घिका-परिचया’वरील लेखात घेऊ या.

‘लार्ज मॅजेलॅनिक क्लाउैड’मध्ये टॅरेन्टय़ुला नावाचा सुंदर तेजोमेघ आहे. त्याची माहिती घेऊन आपण तेजोमेघांवरचं विवेचन संपवू. कारण आपल्या एकटय़ा आकाशगंगा दीर्घिकेतच सुमारे 20 हजार तेजोमेघ आहेत. मग विश्वातील अशा अब्जावधी दीर्घिकांमधल्या ‘ट्रिलियन’ संख्येत जाणाऱ्या तेजोमेघांची काय गणती!

‘टॅरेन्टय़ुला नेब्युला’चा शोध निकोलस लॅकॅसिल यांनी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावरून (केप ऑफ गुड होप येथून) ‘एलएमसी’चं निरीक्षण करताना लावला. 1751 ते 53 या काळात त्यांनी ‘एलएमसी’कडे सतत दुर्बिण रोखली आणि त्यांना हा ‘प्रथम प्रतीचा’ (फर्स्ट क्लास) तेजोमेघ आढळला. नंतर त्याचा समावेश 1801 मध्ये जॉन बोड यांनी त्यांच्या अवकाश नकाशात केला. आपल्यापासून 1 लाख 20 हजार प्रकाशवर्षे दूर असलेला हा तेजोमेघ 20 ते 570 पार्सेक व्यासाचा आहे. तो जर मृगातील तेजोमेघाच्या जागी (कल्पनेने) ठेवला तर रात्री त्याच्या प्रकाशात आपली सावली आपल्याला दिसेल.

याच तेजोमेघाच्या कडेला ‘198-7 ए’ हा तेजोमेघही आढळतो. एक्स-दुर्बिणीतून टॅरेन्टय़ुलामधील कृष्णविवरही सापडले असून आपल्या आकाशगंगेच्या (मिल्की-वे) केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवरानंतरचे हे उपदीर्घिकेमधले सर्वात जवळचे कृष्णविवर आहे. पुढच्या वेळी एकूणच विश्वातील दीर्घिकांचा आढावा घेता येईल.