
>>वैश्विक, [email protected]
पृथ्वीबाहेर पाऊल ठेवून माणसाने अर्धशतकापूर्वी जी वैज्ञानिक क्रांती केली ती अजोड आहे. एकेकाळी ‘पृथ्वी’ म्हणजे जमीन समुद्रापर्यंतच असते असा समज होता. बोटीतून दूरवर जाणारे पृथ्वीच्या गोलाकारामुळे हळूहळू दिसेनासे होतात हे जोपर्यंत कळले नव्हते तोपर्यंत ते ‘अदृश्य’ झालेले कुठेतरी गेले असे मानले जायचे. मग कालांतराने ते परतले आणि तिथे पाहिलेल्या एखाद्या प्रदेशाचे, तिथल्या माणसांचे, प्राण्यांचे वर्णन केले तर ते ‘पाताळलोकात’ जाऊन आलेत असे मानले जायचे. अगदी एकोणिसाव्या शतकातही आपल्याकडे अमेरिकेत जाणे म्हणजे पाताळलोकी जाणे मानणारा ‘सुशिक्षित’ वर्ग होता. एवढेच नव्हे तर समुद्रबंदी मोडून परदेशी जाऊन आलेल्यांना ‘प्रायश्चित्त’ घ्यावे लागायचे. या समजुतींना काही वैज्ञानिक आधार नव्हता. त्यामुळे त्या हळूहळू नष्ट झाल्या.
मात्र पृथ्वीच्या या खंडावरून त्या खंडावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जशा इथे अप्राप्य असलेल्या वस्तू आणल्या तसे कुठूनतरी प्लेगसारखे रोगही आले. आधी इथे ठाऊक नसलेला ‘काका ताप’ आला. सर्वसंचारी पर्यटनाच्या फायद्याबरोबरच तोटय़ाचाही विचार, पण वैज्ञानिक दृष्टीनेच व्हायला हवा. म्हणूनच परदेशात जाताना विविध देशांत कोणती रोगनिर्मूलक लस टोचून जावी याचे नियम आहेत. आता ग्लोबलायझेशनच्या जमान्यात सर्वांनाच ते पाळावे लागतात याचे एकमेव कारण म्हणजे आरोग्य. एका देशात बोटीच्या तळाशी भरलेले पाणी (वजन स्थिर ठेवणारे बॅलॅस्टिक वॉटर) दुसऱ्या देशातील बंदरात तपासणीविना ओतता येत नाही. जगभरचे ओले खाद्य पदार्थ अनेक देशांत बोट किंवा विमानाने उतरताच तपासणी होऊन टाकून द्यावे लागतात.
पृथ्वीवरची माणसे आणि प्राणी यांच्या एकेकाळच्या दूरदूरच्या वसाहतींची आता सरमिसळ होत चालल्याने खाण्याच्या सवयींपासून सारीच लाइफस्टाइल ‘ग्लोबल’ होत असताना पिढय़ान्पिढय़ा आपल्याला काय पचते त्याकडे दुर्लक्ष होतेय. रुचते काय तेवढय़ाचाच विचार होतो आणि त्यातून अनेकदा त्रास.
जी गोष्ट पृथ्वीवरची तीच अंतराळातली (कारण पृथ्वी काही अंतराळाबाहेर नाही). अंतराळात चंद्र – मंगळावर वसाहती करण्यासाठी वेगवान यानभराऱ्या घेणाऱयांना ‘नासा’च्या एका पाहणीने अप्रत्यक्षपणे सावधगिरीचा इशारा दिला आहे. ‘स्पेस’मध्ये राहून आलेल्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो याची तपासणी सातत्याने होत असते. अगदी 1969 मध्ये चांद्रवीर महापराक्रम करून पृथ्वीवर परतले तेव्हाही लगेच कोणी त्यांची गळाभेट घेऊ शकले नाही. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष निक्सन यांनाही सुरक्षा खोलीत काचबंद असलेल्या (क्वारंटाइनमधील) अंतराळवीरांचे पहिले दर्शन झाले.
अशीच खबरदारी पुढच्या सर्वच अंतराळ मोहिमांमध्ये घेण्यात आली. तरीसुद्धा ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने काही अंतराळवीरांची हाडे ओस्टिओपोरोसिसने ठिसूळ होणे किंवा काहींना डिप्रेशन जाणवणे असे प्रकार अधूनमधून घडतातच. चार-दोन दिवसांच्या अंतराळयात्रेचे ठीक, पण सहा ते दहा महिने अंतराळ स्थानकांवर काढणाऱयांच्या किंवा काढलेल्यांच्या तब्येतीची विशेष काळजी करावी लागते. ‘आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन जरी अंतराळात गेले तरी शरीर नावाच्या गुंतागुंतीच्या आणि अब्जावधी पेशींच्या विलक्षण ‘यंत्रात’ कुठे कोणता सूक्ष्म ‘व्हायरस’ दडून बसला असेल काय सांगावे!
‘नासा’च्या एका पाहणीत असे दिसले की, आंतरराष्ट्रीय स्पेस स्थानकावर जाऊन आलेल्या निम्म्या अंतराळवीरांच्या शरीरात बालपणी दडलेल्या काही ‘व्हायरस’नी उचल खाल्ली. हर्पिस (नागीण), कांजण्या (चिकन पॉक्स) अशा विकारांचे व्हायरस बालपणी शरीरात घुसले असतील तर वर्षानुवर्षे ‘डोर्मन्ट’ (निपचित) राहतात आणि ‘योग्य वातावरण’ मिळताच कितीही काळाने ‘जागे’ होतात. या अंतराळयात्रींबाबत असेच काहीसे घडले असेल तर संवेदना पेशींवर (नर्व्हज् सेल) हल्ला करणाऱ्या या ‘सुप्त’ व्हायरसचा कसा मुकाबला करायचा त्याचे उपाय शोधावे लागतील. त्यामुळे चंद्र-मंगळाकडे उत्साहाने ‘भरारी’ घेणाऱयांना हा सावधगिरीचा इशारा आहे.




























































