आभाळमाया : अवकाशयानांची गती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉकेट आकाशाकडे सरळ आणि सुसाट झेपावतं याची कल्पना रोषणाईचं दारूकाम करणाऱ्यांना प्राचीन काळापासून होती. वेगाने सरळ वर आकाशात जाऊन नंतर इच्छित स्थळी कोसळणारं शस्त्र म्हणून कालांतराने त्याचा वापर होऊ लागला. मात्र ही रॉकेट पृथ्वीचं वातावरण भेदून जाण्याएवढी सक्षम नव्हती. अर्थात या काळात पृथ्वीपलीकडे जाण्याचा विचारही कोणी केला नव्हता. कविकल्पनांमध्ये चंद्र-सूर्याकडे जाण्याच्या गोष्टी येत असल्या तरी प्रत्यक्ष तसं वाहन तयार करून पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जाण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं.

यंत्रयुगाच्या सुरुवातीनंतर त्याचा वेग विविध क्षेत्रांत साहजिकच वाढत गेला. अवकाशयान पाठवणं किंवा चंद्रावर वगैरे जाणं याचा विचार करण्यापूर्वी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पार करून जाणारं तंत्रज्ञान विकसित करणं गरजेचं होतं याचा विचार संशोधक रॉबर्ट गोडार्ड यांनी केला आणि 16 मार्च 1926 रोजी पहिलं प्राथमिक स्वरूपातलं रॉकेट उडविण्यात आलं. त्यामुळे गोडार्ड यांना आधुनिक ‘रॉकेटरी’चं जनक मानलं जातं.

त्यानंतरच्या काळात पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पार करून थेट पृथ्वी प्रदक्षिणा करणारा उपग्रह सोडणारं रॉकेट रशियाने तयार केलं आणि स्पुटनिक-1 हा जगातला पहिलावहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात भिरभिरू लागला.

रॉकेट उडवण्यासाठी सुरुवातीला द्रवरूप आणि नंतर वायुरूप इंधनात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. रॉकेटच्या तळाशी असलेल्या बूस्टरमुळे धक्का (थर्स्ट) मिळून ते सरळ उंच जाऊ लागलं. आपल्याकडे त्याला अग्निबाण हे समर्पक नाव मिळालं ते त्यामुळेच. रशियाने ‘ल्युना-3’ साठी रॉकेट तंत्रज्ञान पहिल्यांदा यशस्वीरीत्या वापरलं ते अंतराळात यानाचा वेग वाढवण्याचं. हा रॉकेटनंतरचा पुढचा टप्पा होता.

पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदून पलीकडे जायचं तर त्या वाहनाची गती सेकंदाला किमान 7.9 किलोमीटर हवी. पृथ्वीवरून अवकाशात जाण्याची ‘एस्केप वेलॉसिटी’ (मुक्तता गती) 11.2 किलोमीटर आहे. या वेगाने रॉकेट वर गेलं आणि त्यावर ठेवलेला उपग्रह त्याने विशिष्ट कक्षेत ‘ठेवला’ तर तो पृथ्वीभोवती फिरत राहतो. अवकाशातील बहुसंख्य कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती 300 ते 800 किलोमीटरच्या कक्षेतून फिरतात. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनही रॉकेटला गती देण्यात यश आल्यावर पुढच्या काळात अवकाशयानांना गती देऊन ती दूरस्थ ग्रहांपर्यंत पाठवण्याच्या कार्यक्रमांची आखणी मुख्यत्वे रशिया आणि अमेरिकेने केली. आता साठ वर्षांनंतर हिंदुस्थानही त्या स्पर्धेतला यशस्वी भागीदार ठरला आहे. आपणही चंद्र, मंगळापर्यंत यानं पोहोचवली आहेत. दूरस्थ जाणाऱ्या रॉकेटचा वेग 9 ते 16 हजार किलोमीटर आणि पृथ्वीभोवती फिरणाऱ्या यानासाठी ताशी 28 हजार किलोमीटर असतो.

मात्र पृथ्वीपलीकडच्या ग्रहांवर किंवा अगदी चंद्रावरही जायचं तर यानांच्या ‘बूस्टर रॉकेट’मधील इंधनाचा प्रचंड खर्च वाचविण्यासाठी पृथ्वीच्या आणि इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या गतीचा वापर करून यानांची गती वाढवता येते. कोणता तरी ‘बूस्टर’ किंवा ‘थर्स्ट’ असल्याविना अंतराळात यानं सातत्याने विशिष्ट मार्गाने कशी जाणार? शिवाय, पृथ्वीवरच्या वाहनांना पृथ्वीचंच बल (फोर्स) पुढे जाताना मिळत असतं. कारण त्यांची चाकं जमिनीला स्पर्श करीत असतात. अंतराळात अशी काही सोय नसते. तेव्हा यानांना जोडलेल्या बूस्टरचा ‘धक्का’ वापरून त्यांची गती कमी वा जास्त करण्यात येते, परंतु अतिदूरच्या यानांसाठी प्रचंड इंधन अवकाशात पाठवायचं तर त्याचं वजन वाढणार आणि परिणामी अधिक इंधन लागणार.

त्यामुळे ‘ग्रॅव्हिटी ऍसिस्ट मॅन्युवर’ तंत्राचा वापर करून पृथ्वीच्या आणि इतरही ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत यान-गती वाढवता येते. सध्या सूर्याकडे गेले युजिन स्पेसक्राफ्ट असेल किंवा सूर्यमालेबाहेर पडलेलं व्हॉएजर असेल, त्यांनी याच तंत्राचा उपयोग करीत आपला प्रवास गतीमान ठेवला. याच तंत्राने आपण पृथ्वीच्याच गुरुत्वाकर्षणाचा जास्तीत जास्त वापर करीत आपल्या पहिल्या चंद्रयानाची गती वाढवली आणि इंधन बचत केली. अर्थात त्यामुळे पृथ्वीला ध्रुवीय कक्षेत अनेक परिक्रमा करण्यात आणि यान गती वाढवण्यात वेळ गेला, पण खर्च खूपच कमी आला. त्याशिवाय आपलं अवकाश तंत्रज्ञानातील कौशल्यही कसोटीला उतरलं. अशा प्रकारे अनेक ग्रहांना वेळोवेळी ‘फ्लाय बाय’ करून यानं गुरू, शनी, नेपच्यूनपर्यंत गेली आहेत आणि व्हॉएजरने तर आपल्या ग्रहमालेला ‘बाय बाय’ करून आपला निरोपही घेतला आहे.

[email protected]