
>>दिलीप जोशी<<
ओडिशा राज्याला ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ‘फणी’ नावाच्या वेगवान वादळाने जबरदस्त तडाखा दिला. तिथल्या पटनायक सरकारने या वादळाची पूर्वसूचना लक्षात घेऊन उत्तम व्यवस्था ठेवली. किनारपट्टीच्या वस्त्या हलवल्या. लाखो लोकांना सुरक्षित जागी नेले. राज्य, केंद्र सरकारी यंत्रणा आणि हवामान खात्याचे तज्ञ या सर्वांच्या सहकार्याचा उत्तम मेळ जमला आणि कमीत कमी जीवितहानी झाली. अर्थात तेवढीही न होण्याचं (झीरो कॅज्युअल्टीचं) उद्दिष्ट असायलाच हवं. परंतु 1999 मध्ये झालेल्या अशाच वादळाने हजारो लोकांचा बळी घेतला होता, त्या तुलनेत या वेळचे शासकीय यश नजरेत भरणारे होते. या देशातील शासकीय, प्रशासकीय यंत्रणांचे कौतुक करण्याची वेळ क्वचितच येते. ओडिशा मात्र या प्रशंसेला पात्र ठरला.
ओडिशातील ताशी 200 किलोमीटर वेगाचं वादळ पचवून ज्या इमारती ताठ मानेने उभ्या राहिल्या त्यापैकी बऱ्याच इमारतींचा आराखडा (डिझाइन) खरगपूर येथील आयआयटीच्या संशोधकांनी बनवला होता. विज्ञान-तंत्रज्ञाकडे नवी आव्हानं पेलण्याची शक्ती असते. मात्र त्याचा विधायक उपयोग वेळीच करून घेण्याची समयसूचकता दाखवावी लागते. 1999 च्या प्रलयकारी वादळापासून धडा घेऊन, नवीन पटनायक सरकारने वेळीच योग्य पावलं उचलली आणि आर्थिक नुकसान झालं तरी प्राणहानी खूपच कमी झाली. या यशाबद्दल संयुक्त राष्ट्रांनीही आपल्या सरकारी यंत्रणांचे कौतुक केले.
प्रगत देशात वादळं येतात तेव्हा तिथेही मालमत्तेचे मोठे नुकसान होतेच, परंतु जीवितहानी बिलकुल होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात वादळ आलं, तसं तिथे ते नेहमीच येते. कारण बहुतेक वादळं पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या पश्चिम ते पूर्व या गतीमुळे जगातल्या पूर्व किनाऱ्यांवर येतात. दोन वर्षांपूर्वी संबंध फ्लोरिडा राज्यातील लोकांना इतरत्र हलवलं गेलं. सुमारे 55 लाख लोक आपापली घरे सोडून गेले. (एवढी माणसं मुंबईत रोज इकडून-तिकडे लोकलने प्रवास करतात!) ओडिशातील गरीब लोकांना इतरत्र नेण्याची जबाबदारी सरकारने घेतली. त्या भागातली वाहतूक वादळाच्या दोन दिवसांत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आणि उत्तम ‘डिझास्टर मॅनेजमेंट’चं दर्शन घडलं.
आता प्रश्न असा की ओडिशा, आंध्र काय किंवा फ्लोरिडा, टेक्सास काय अशी महावादळं वारंवार येतातच कशी आणि कुठून? पृथ्वीवर दक्षिण गोलार्धात भूभाग कमी आणि समुद्र विस्तीर्ण आहे. बहुतेक सारे देश उत्तर गोलार्धात येतात. त्यामुळे आपल्याकडचे पावसाळी ढगसुद्धा दक्षिण गोलार्धातील समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन येत असतात. तसं पाहिलं तर पृथ्वीवरच्या सर्व समुद्राचं कुठे ना कुठे मिलन होतंच. कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाजवळ उभे राहिलं तर हिंदुस्थानचं दक्षिण टोक स्पष्टपणे दिसतं. उजवीकडे (पूर्व) बंगालचा उपसागर, डावीकडे (पश्चिम) अरबी समुद्र आणि सभोवती (दक्षिणेकडे) हिंदी महासागर असा समुद्रांचा त्रिवेणी संगम नजरेत भरतो. जपान ते अमेरिकेत पॅसिफिक आणि इंग्लंड ते अमेरिकेदरम्यान ऍटलॅण्टिक महासागर येतात. या विशाल जलसाठय़ामध्ये सतत लाटांचा धिंगाणा सुरू असतो. लयबद्ध लाटांची गाज सुखद वाटते, पण सागराने रौद्ररूप धारण केलं की उसळलेल्या पाण्याच्या उंचच उंच लाटा किनाऱ्यांवर आदळतात.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार 1985 पासून पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील समुद्र दिवसेंदिवस खवळत आहे. सुमारे 4 अब्ज निरीक्षणातून 1985 ते 2018 या काळात सागरी लाटांचा अभ्यास केला गेला तेव्हा लक्षात आले की, समुद्राच्या लाटांची उंची दीड मीटरने म्हणजे आठ टक्के वाढली असून ही वाढ गेल्या तीन दशकांतली आहे.
या ना त्या कारणाने समुद्र हटवून उभी राहणारी नगरं आणि ग्लोबल वॉर्मिंग (वाढतं तापमान) अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून असं घडतंय. समुद्री लाटांमध्ये पाच टक्क्यांची वाढ आता फार वाटत नसेल, पण किनाऱ्यावरच्या ज्या वस्त्यांना समुद्र गिळंकृत करू पाहतो त्यांना ते लगेच जाणवतं. ठाणे जिल्हय़ातील दांडी-उच्छेळी भागाने त्याचा अनुभव घेतला आहे. समुद्राचे पाणी अचानक वाढलं आणि परत गेलंच नाही तर? कविवर्य यशवंत यांच्या एका कवितेत म्हटलंय- ‘काय हटवुनि हटतो सागर, हटेल एकीकडे। उफाळेल तो दुसरीकडुनी गिळून डोंगरकडे।।’ ही गोष्ट खरीच आहे. पृथ्वीवरचं एकूण सागरी पाणी तसंच राहणार. ते जाईल कुठं? कालांतराने मुंबई-न्यूयॉर्कच्या किनारपट्टीलाही सागरी लाटांची धडक जाणवू लागेल. आधी चौपाटय़ा आकसतील, मग पाणी आणखी पुढे येईल. हा प्रकार घडायला बरीच वर्षं लागतील हे खरं, पण त्यापूर्वीच सावध होऊन सागरी योजनांमध्ये या संभाव्य धोक्यांचा विचार व्हायला हवा. निसर्गाशी मेळ घालूनच माणसाला प्रगती करता येईल.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर समुद्राचं प्रमाण जवळजवळ 76 टक्के आहे ही गोष्ट सर्वांनाच भूगोलाच्या शाळेत अभ्यासापासून ठाऊक असते. क्लायमेट चेंज किंवा हवामान-बदलाच्या प्रतापांनी पूर्वीचे नैसर्गिक चक्राचे आडाखे बदलायला लागलेत. हा नवा इशारा लक्षात घेऊन समुद्राशी नव्याने नातं जुळवावं लागेल. पूर्व किनारपट्टीवरच्या, ओडिशात झाले तशा वादळांची शक्यता लक्षात घेऊन वसाहतींची योजना करणं भाग पडेल आणि वाढती सागरी-पातळी ध्यानात घेऊन पश्चिम किनारपट्टीवरच्या योजना राबवाव्या लागतील. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा! किनारा तुला पामराला।।’ असं कविवर्य कुसुमाग्रजानी माणसाच्या जिद्दीविषयी समुद्राला ठणकावून सांगितलंय. आता तोच ‘पामर’ सागर किनारे ओलांडून पुढे झेपावू पाहतोय. 31 उपग्रहांच्या सखोल अभ्यासातून तरी तसंच दिसतंय सागराची ही गाज आपणाला जाग आणेल?



























































