खाऊगली- कोको, ढोढो, लोला आणि चिल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीव साबडे

साई बहजी, सेयाल, सात्सागी किंवा चिटी कुनी, कमल ककडी की सब्जी, भरपूर भाज्या घातलेली दही वा ताक न घालता केलेली कढी, कोकी, चिल्ला, ढोढो और चटणी, लोला, डाल पकवान हे खाद्यप्रकार आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी खाल्ले काय, ऐकलेही नसतील. हे खाद्यप्रकार कळावेत म्हणूनच जायचं काही सिंधी रेस्टॉरंटमध्ये.

साई बहजी, सेयाल, सात्सागी किंवा चिटी कुनी, कमल ककडी की सब्जी, भरपूर भाज्या घातलेली दही वा ताक न घालता केलेली कढी, कोकी, चिल्ला, ढोढो और चटणी, लोला हे खाद्यप्रकार आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी खाल्ले काय, ऐकलेही नसतील. डाल पकवान ऐकलं असेल, पण खाल्लं असेल कमी लोकांनी. पक्वान्न म्हटलं की गोडधोड, मिठाई आठवते, पण पक्वान्न म्हणजे पकवलेले, मराठीत शिजवलेलं अन्न. एखाद्या पापडासारख्या मोठ्या व कडक पुरीवर मसालेदार शिजवलेली डाळ, चटणी, कांदा घालून खाण्याचा हा प्रकार. वरील खाद्यप्रकार कळावेत म्हणूनच जायचं काही सिंधी रेस्टॉरंटमध्ये.

मुंबईत सुमारे चार लाख सिंधी आहेत. चेंबूर, शीव, खार भागांत त्यांच्या वसाहती आहेत. उल्हासनगरमध्येही तितकेच. त्यामुळे सिंधी खाद्यप्रकार मिळणारी रेस्टॉरंट असणं स्वाभाविकच. आपण पंजाबी, दक्षिण हिंदुस्थानी, गुजराती, मुघलाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, थाई, जापनीज रेस्टॉरंटमध्ये जातो, पण सिंधी खाद्यपदार्थ माहीत नसतात. सिंधी खाद्यप्रकार आपल्यासारखेच असतात, पण थोडे मसाले, करण्याची पद्धत व खातानाची चव वेगळी आणि त्यामुळे नावंही वेगळी. कैलास पर्बतची मुंबईत कुलाबा, वांद्रे, खार, मुंबई सेंट्रल गोरेगाव, मालाड, अंधेरी अनेक रेस्टॉरंट्स आहेत. तिथे प्रामुख्यानं पंजाबी व उत्तर हिंदुस्थानी खाद्यपदार्थ मिळत असले तरी त्यांच्या मेन्यूवर अनेक सिंधी प्रकार आणि जेवणही आहे. फुलका चपातीबरोबर थालीपीठच्या जवळ जाणारी कोकी, अरबी टुक (अरबी पॅटिससारखा प्रकार) साई भाजी (म्हणजे भिजवून ठेवलेली चणा डाळ, गाजर, बटाटा, टोमेटो घालून केलेली हिरवी-पालक, मेथी यांची भाजी), सेयाल (हा प्रकार आपल्या फोडणीच्या पोळी व भाकरीसारखा आहे. मात्र त्यात पाणी घालतात आणि आंबटपणा येण्यासाठी टोमाटो), भुगा चावल (तळलेला कांदा घालून केलेला आणि पिवळसर, करडा रंग आलेला मसाले भात म्हणता येईल), आनी बसर (बेसन वडी), सात्सागी वा चिटी कुनी (भोगीला करतात तशी, पण सिंधी मसाले असलेली मिक्स भाजी) हे सारे जेवणातील पदार्थ इथे मस्त मिळतात.

दाल पकवान हा प्रकार असंख्य ठिकाणी, टपरीवरही मिळतो. पण शीव येथील गुरूकृपा, त्याच्यासमोरील ए-1 समोसा, चेंबूरच्या व्हीआयजी व खारच्या सिंधफुल रेस्टॉरंटमध्ये मिळणारा अतिशय अप्रतिम, फारसा तिखट नसलेला हा पोटभरीचा प्रकार आहे. मात्र त्यावर जी हिरवी चटणी असते ती मात्र तिखट. त्यामुळे खाण्यापूर्वी अंदाज घ्यायला हवा. उल्हासनगरला रस्त्यारस्त्यावर दाल पकवान व सिंधी भजी मिळतात. सिंधफुल रेस्टॉरंटमध्ये गेलात तर सिंधी पद्धतीची कढी व भात, कोकी व बंदी रायता, रोटी वा फुलका व साई भाजी, सेयाल पाव (रस्सेदार आंबट तिखट-फोडणीचा पाव) आणि मांसाहारी असणाऱयांनी सिंधी मटण अवश्य खावं. सिंधी पापड तर हवाच. सिंधी खाद्यपदार्थांची चव त्यांच्या मसाल्यात आणि चटपटीत चव येण्यासाठी काही वेळेस वापरण्यात येणाऱया चाट मसाल्यात असते. आपण छोले असंख्य वेळेस खाल्ले असतील, पण पंजाबी अमृतसरी व उत्तर हिंदुस्थानी छोले चवीला काहीसे वेगळे लागतात. त्यामुळे सिंधी रेस्टॉरंटमधील समोसा छोले, टिक्की किंवा पॅटीस छोले खाण्याची गंमत वेगळी असते. अनेक सिंधी हॉटेलांत लोक त्या चवीच्या छोलेसाठी जातात. चेंबूर म्हणजे सिंधी खाद्यपदार्थांची चंगळ म्हणायला हरकत नाही. सिंधी वस्ती खूप असल्याने शाकाहारी व मांसाहारी सिंधी रेस्टॉरंट्सही तिथे खूप आहेत. जे मांसाहारातील दर्दी आहेत त्यांच्यासाठी ‘गोपाल मटण आण्ड चिकन’ हे ठिकाण खास. स्ट्रीट फूडचं हे ठिकाण सिंधी कॅम्पच्या रस्त्यावर आहे. लोक इथून सिंधी पद्धतीचे मांसाहारी प्रकार, बिर्याणी आणि साधा पण मस्त चिकन सँडविच घरी घेऊन जातात.

ट्रॉम्बे रस्त्यावर ‘दमा दम मस्त कलंदर’ नावाचं रेस्टॉरंट आहे. या नावावरूनच हे सिंधी असणार हे लक्षात येतं. तिथे अनेक प्रकारचे शाकाहारी, मांसाहारी आणि पंजाबी खाद्यपदार्थ मिळतात. सिंध व पंजाब यांचं जवळचं नातं असल्याचा हा परिणाम. आई वा आजीच्या हातचं जेवल्याचं समाधान इथे अनेकांना मिळतं. सर्व शाकाहारी पदार्थ शुद्ध तुपात बनवले जातात. त्यांचा शाकाहारी मेन्यू मोठा आहे, मांसाहारीला मागणी जास्त. कांदिवलीच्या चारकोप गावात ‘दाढो सुटो’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये मोजकेच सिंधी पदार्थ वाजवी दरात मिळतात. दाल पकवान, तेलातील व तुपातील कोकी, सिंधी पद्धतीचे पराठे, लोलो नावाची दशमीसारखी, पण थालीपीठासारखी जाड साखर पोळी आदी प्रकार तिथे मिळतात. अंधेरीला लोखंडवाला परिसरातील एका लेनमध्ये ‘सो सिंधी’ नावाचं लहानसं रेस्टॉरंट अलीकडेच सुरू झालं आहे. तिथे सिमला मिरच्या व लांब मिरच्यांचे सिंधी पद्धतीचे पकोडे, दाल पकवान आदी स्नॅक्स प्रामुख्याने मिळत असले तरी कमळाच्या देठांची (हिंदीत त्यांना कमल ककडी किंवा भे म्हणतात) बटाटे घालून केलेली भाजी, सिंधी पद्धतीचा खिमा व मटण हे प्रकारही उपलब्ध आहेत. नवी मुंबईत नेरुळमध्ये ‘सिंधी तडका’ रेस्टॉरंट आहे. तिथे सिंधी नाश्ता व जेवण या दोन्हीचे बरेच प्रकार आहेत. फोर्टच्या मोती हलवाई कराचीवालाकडे जशी सिंधी गोल मूग भजी मिळतात, तशी सिंधी तडकाकडे आहेत. शिवाय साई भाजी, टमाटानी कढी (ही घरी करणं अतिशय सोपं.) इथे मिळते. दही वा ताकाच्या कढीप्रमाणे

टोमॅटोच्या ग्रेव्हीला बेसन लावून कोल्या  कढीत अनेक भाज्याही असतात. बेसनाचं पिठलं करण्याऐवजी त्याच्या वड्यांची पातळ भाजी इथे आहे. तांदूळ, ज्वारी व बाजरीच्या भाकरीसारखा डोडो किंवा ढोढो नावाचा प्रकारही इथे मिळतो. आपल्या भाकरी व चटणीप्रमाणेच चटणी आणि ढोढो खातात. बहुतांशी सिंधी

रेस्टॉरंटमध्ये एखादी त्यांची खास मिठाई मिळते.

सिंधी मिठाईतलं वैविध्य पाहायचं आणि खायचं असेल तर मुंबईत आता अनेक ठिकाणी असलेलं झामा स्वीट्स, चंदू मिठाईवाला व मोहनलाई की मिठाई, अंधेरीचा चंदू, खारचं थारू स्वीट्स व सिंधी स्वीट्स इथे भेट द्यायला हवी. झामा स्वीट्सची शेव बर्फी आता देशभर प्रसिद्ध आहे. चेंबूरला राहणारे अभिनेते राज कपूर झामा स्वीट्सची मिठाई परदेशातील मित्रांना पाठवायचे.

[email protected]