
>> डॉ. वंदना बोकील–कुलकर्णी
जगण्याशी कधी जमवून घेत तर कधी दोन हात करत स्त्रीची वाटचाल अविरत सुरू आहे. या वाटेवरचा प्रवास मांडून ठेवणाऱया अभिव्यक्तीची लिपी समजून घेणारे हे सदर.
आपल्या संत स्त्रिया चांगल्याच धीट होत्या. स्त्रियेचे शरीर पराधीन देह…अशी देहमनाची विभागणी त्यांना उत्तम जमली होती. मनाने हरिगुण गात असताना, मुखाने त्याचेच नाम उच्चारत असताना आपल्या स्त्री देहामुळे जे जे काही वाटय़ाला येतं त्याचा धीट उच्चार त्या करत गेल्या आणि त्याच का? इथली सामान्य स्त्राrदेखील, सतत कामात असणारी स्त्राrदेखील, ‘दळिता-कांडिता’ आपल्या मनीचं गूज जात्यावरच्या ओव्यात मांडत राहिली की, तिला अक्षर ओळख नसेल, पण उपजत शहाणपण होतं तिच्या ठायी. तिला मुद्दाम शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं तरी तिची विचारशक्ती होतीच की जागी. ती ऐकत होती, पाहत होती, निरीक्षण करत होती आणि स्वत स्वतंत्र विचारही करत होतीच. म्हणून तर –
राम गेले धावुनी बाण भाता घेऊनि
सीता पाहे वाटुली दारी उभी राहुनी
अशी कथा सांगता सांगता –
राम म्हणू नाही राम नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा
असं अगदी बिनधास्तपणे म्हणत होती ती. नाव नाही ओवी रचयिता स्त्राrचं. पण हवं कशाला ते…साऱयाच स्त्रियांच्या मनातली ठसठस तिनं बोलून दाखवली आहे. लोकसाहित्यात अशा किती ओव्या, म्हणी, गाणी आणि कथा रचल्या बायांनी. मुळात ओवी या शब्दात ओवणे ही कृती सामावलेली आहे. काय ओवते ती? तर एखादी कथा ओवते. स्वतच्या जगण्याची कथा. ‘आपुलिया सारिख्या’ इतर बायांची कथा-व्यथा. सुखाची मोजकी भांडी पुनः पुन्हा लख्ख केलेली आणि तळघरात झाकून ठेवलेला सल, वेदना आणि निश्वसिते. कधी जात्यावर दळत असताना त्या जात्याला सुख-दुःख सांगतात. जात्यावरच्या ओव्या या तर स्त्रियांची श्रमगीतं आहेत. दळणं आणि गाणं…तिला जे म्हणायचं होतं ते तिच्या ओठांवर ओवी रूपात येत गेलंय. म्हणून तिच्या जगण्याची लय तिच्या ओव्यांना मिळत गेली. जात्याचं एक आवर्तन हे ओवीचंही एक नादरूप आवर्तन. कधी ‘साऱयाजणी’ मिळून काम करताना एकत्रितपणे ओवीला ओवी जोडत नेल्या आहेत. जसं काम तसं त्यांचं गाणं. सहज, स्वाभाविक, अंगवळणी पडलेलं.
कधी तिनं गाणी रचली. आनंदानं गायली मग ती खेळ खेळताना म्हणायची गाणी असोत की हादग्याची गाणी असोत. गाणं म्हणताना हसत-खेळत, अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं. अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारतं… असं किंवा सासुरीच्या वाटे कुचूकुचू काटे…माहेराच्या वाटे हळदकुंकू दाटे असं म्हणून गेली आहे ती. कधी तिनं मांडवात पुढंपुढं करणाऱया, तोरा मिरवणाऱया विहिणीची टर उडवून त्याचा खटय़ाळ आनंद घेतला आहे. भावाची माया ओलावल्या आवाजात पुनः पुन्हा सांगितली आहे. उखाणे रचून रोजच्या कष्टमय जगण्यावर उतारा शोधला आहे आणि दुःख हसून साजरं केलं आहे.
कधी कथा रचल्या आहेत. भागवत- पुराणातल्या स्त्रिया तिला ‘स्त्राr’ म्हणून जवळच्या वाटल्या आहेत. आपल्यासारख्याच वाटल्या आहेत. म्हणून तिनं ‘सीतेनं आपलं दुःख गहू गहू साऱया बायांना वाटून दिलं’ असं म्हटलं आहे. तर कधी-
पाऊस पडला पडला मोत्या-पवळ्याच्या धारा
नका करु गलबला ग धरणीबाईचा पती आला
अशी कविताच रचली आहे. पाऊस आणि धरणीबाई यांच्यातील आदिम संबंधांचा उच्चार कौतुकानं केला आहे! तर कधी…
पंढरीची वाट कशानं ग झाली वली
न्हायलेली रुक्मीन केस वाळवीत गेली
असं रुक्मिणीच्या रूपात स्त्राrरूपच पाहिलं आहे! निसर्गात, प्राचीन कथांत जिथे म्हणून स्त्राr आहे त्या साऱया स्त्राrत्वाशी तिनं सहज स्वतला जोडून घेतलं आहे. घेऊ शकली आहे. म्हणूनच त्या सीतेला माहेरचा आधार नसलेली सासुरवाशीण, मुलांना रामानं स्वीकारावं म्हणून व्याकूळ होणारी आई, नवऱयानं टाकलेली गर्भारशी अशा रूपांत पाहू शकतात. प्रांतोप्रांती अनेक ‘सीतायणं’ निर्माण झाली आहेत ती उगाच नव्हे!
मला स्त्राrवादाच्या संदर्भात नेहमी उपयोगात येणारा ‘भगिनीभाव’ हा शब्द फार मोलाचा वाटतो आणि हा शब्द प्रचलित होण्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे हा ‘भाव’ सातत्यानं प्रवाहित होत आला आहे, हे फार महत्त्वाचं वाटतं.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)