नाद-मराठी- स्वर-सुधा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

काही गाणी कमालीचं भाग्य घेऊन येतात. वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात रुंजी घालतात. कानात गुंजत राहतात. एरवी उत्तम काव्य, उत्तम चाल आणि उत्तम संगीत असा त्रिवेणी संगम झालेली अनेक गीतं हिंदी, मराठी सिनेमृष्टीत असतील, पण काही अप्रतिम गाण्यांना पडद्यावर येण्याचा योगच आला नाही. काही अकारण विस्मृतीत गेली, तशी अकारण ‘गाजलेली’ आणि वारंवार ‘वाजलेली’ही अनेक गाणी असतात. सध्याच्या ऱिहदमच्या जमान्यात ‘कोलावेरी डी’सारखं गाणंही तुफान चालतं, परंतु या प्रकारातली गाणी तशी अल्पजीवी असतात. त्यांची चलती असताना त्यावर नकळत ताल धरला जातो खरा, पण कालांतराने या गाण्यांची सद्दी संपते.

या उलट काही गाणी इतकी मनीमानसी घर करतात की, त्यामुळे एखाद्या गायक-गायिकेचं ते एखादंच गाणंसुद्धा आपल्याच नव्हे तर अनेक पिढय़ांच्या लक्षात राहतं. मराठीत असं भाग्य लाभलं सुधा मल्होत्रा यांना. त्यांची मराठी गाणी आठवायला गेलात तर अरुण दाते यांच्यासह गायिलेल्या दोन द्वंद्वगीतांपलीकडे फार जाता येईलसं वाटत नाही, पण ती दोन गाणीच इतकी बहारदार की, आजही गाण्याच्या स्पर्धांमध्ये नव्या उमेदीचे गायक-गायिका ती आवर्जून सादर करतात.

त्यापैकी पहिलं सर्वपरिचित गीत म्हणजे ‘शुक्र तारा मंद वारा.’ कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या या गाण्याचं संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर अरुण-दाते आणि सुधा मल्होत्रा यांचे. अरुण दाते यांचंही मराठीत विलक्षण गाजलेलं पहिलंच गाणं. कारण त्यांचं बालपण मध्य प्रदेशात इंदूर येथे गेलं आणि सुधा मल्होत्रांचं बालपण तर दिल्ली, लाहोर, भोपाळ अशा ठिकाणी गेलं. त्यांची सांगीतिक पदवीसुद्धा आग्रा येथील.

या गोड गळय़ाच्या गायिकेचे गुण हेरून संगीतकार गुलाम हैदर यांनी ‘चाइल्ड आर्टिस्ट’ म्हणून ‘आरजू’ चित्रपटात एक गाणं दिलं. हा काळ 1950चा. त्यावेळी सुधा मल्होत्रा यांचं वय जेमतेम पंधरा असेल. कारण त्यांचा जन्म 1936 मधला. तेव्हापासून त्यांची गानकारकीर्द सुरू झाली ती पुढे दोन दशकं अव्याहत चालली. 1959 मधलं त्यांचं मुकेश यांच्याबरोबरचं ‘हिंदी’ चित्रपटातलं ‘तुम मुझे भुल भी जाओ, तो ये हक है तुमको; मेरी बात और है, मैंने तो मुहब्बत की है’ हे आर्त स्वरातलं अर्थपूर्ण गाणं आठवा आणि जरूर ऐका. विशेष म्हणजे या गाण्याचं संगीत आपले मराठी संगीतकार एन. दत्ता यांचं होतं. रामचंद्र चितळकर सी. रामचंद्र झाले त्या काळात दत्ता नाईक एन. दत्ता झाले. दत्ता नाईक मूळचे गोव्याचे. वयाच्या बाराव्या वर्षीच ते गीत, संगीताच्या ओढीने मुंबईला आले आणि गुलाम हैदर यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. त्यांच्याच संगीत दिग्दर्शनात सुधा मल्होत्रा यांनी ‘कासे कहूं मन की बात’ हे अप्रतिम गाणं गायलंय. गीता दत्त यांच्या जोडीने ‘कालाबाजार’ या देव आनंदच्या चित्रपटातलं त्यांचं ‘ना मैं धन चाहू, ना रतन चाहू’ हे गाणंही अविस्मरणीय.

अवघ्या दोन- अडीच दशकांतील कारकीर्दीत त्यांची हिंदी चित्रसृष्टीवर ठसा उमटवणारी गाणी खूप गाजली. ‘मैंया मोरी मैं नहीं माखन खायो’ हे त्यांचं भजन आपल्याकडेही प्रभातगीतांमध्ये (रेडिओवर)  लागायचं ते आठवतं. ‘ये प्यार था क्या कुछ और था’ हे आर. के. फिल्म्सच्या ऋषी कपूर नायक असलेल्या ‘प्रेमरोग’ चित्रपटात सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं सिनेमातलं शेवटचं गाणं असावं. नंतर त्या संसारात रमल्या. आज त्यांचं वय पंच्याएWशी आहे.

… तर त्यांच्या दोनच मराठी गाण्यांचा ‘नाद’ मात्र त्यांचं नातं महाराष्ट्राशी कायमचं जोडून गेला. ‘शुक्र तारा’ गाण्याच्या वेळी तर मूळच्या अरविंद दाते यांचं नाव आकाशवाणीवरून ‘अरुण दाते’ असं सांगण्यात आलं आणि तेच त्यांना कायमचं चिकटलं. सहगायिकेचं नाव सुधा मल्होत्रा होतं. ‘मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला; तू तुझ्या समजून घेरे लाजणाऱ्या या फुला’ या ओळी त्यांनी लाडिक ओढीने म्हटल्याचं लक्षात येईल. या गाण्याची एकूणच सांगीतिक ‘भट्टी’ अशी काही फर्मास जमली की पुढे अरुण दाते यांच्या कार्यक्रमाचं ते शीर्षक झालं.

तीच गोष्ट ‘हात तुझा हातातून धुंद ही हवा, रोजचाच चंद्र आज भासतो नवा या याच दोघांच्या युगुल गीताची. त्याचेही शब्द मंगेश पाडगावकरांचे आणि संगीत श्रीनिवास खळे यांचंच.

सुरुवातीला म्हटलं तशी सुधा मल्होत्रा यांची मला ठाऊक असलेली तरी दोनच अत्यंत गाजलेली मराठी गाणी, तीही द्वंद्वगीतं. तरीही त्यांचं नाव वेळोवेळी रेडिओवरच्या अनेक गीत- कार्यक्रमांत येतं. कारण श्रोत्यांची या गाण्यांना आजही पसंती असते. मोजक्याच गाण्यांतून इतका काळ रसिक मनात टिकून राहण्याचं भाग्य क्वचितच कुणाला लाभत असेल. हिंदीमध्येही सुधा मल्होत्रा यांच्या गाण्यांची संख्या खूप मोठी नसली तरी जी गाणी आहेत, अवीट गोडीची. नंतर त्यांनी गाण्यांचा आल्बम वगैरे प्रसिद्ध केला. पण मराठीत त्यांना या दोनच गाण्यांनी मानाचे स्थान दिलं. 2013 मध्ये त्यांच्या गान कारकीर्दीचा सन्मान सरकार दरबारी झाला. सुधा मल्होत्रांना ‘पद्मश्री’ प्राप्त झाली. त्यांच्या सुरेल कंठाचा हा उचित सन्मान होता.