
>> दिलीप जोशी
नागपूरच्या साहित्य वर्तुळात स्वतःच्या काव्य-लेखनाचा ठसा उमटवणारे सुधाकर तथा बाबासाहेब बक्षी यांचं काही काळापूर्वी देहावसान झालं. नव्वदीपार, समृद्ध जीवन व्यतीत केलेले बक्षी एक आनंदयात्री होते. अनेक पिढय़ांमधल्या ‘मित्रां’शी त्यांचा संवाद असायचा. प्रदीर्घ जीवनात सुमारे पाच पिढय़ांच्या जीवन पद्धतीचा त्यांनी सहजतेने अभ्यास केला. त्यातूनच ‘मन’ या विषयावर त्यांचं सखोल चिंतन सुरू होऊन ‘सामना’मध्ये वर्षभर ते चिंतन ’मनसंपदा’ या सदरात प्रसिद्धही झालं. त्यापूर्वीसुद्धा ’मनपासष्टी’सारख्या काव्यात्मक रचनेतून त्यांनी तरुण वर्गासाठी ‘सकारात्मक’ विचारांची दिशा दाखवली होती.
रामायण आणि महाभारत हे सुधाकररावांच्या जिव्हाळय़ाचे विषय होते. यावर त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये नाटपं लिहिली. ती रंगमंचावर सादर झाली. त्यांच्या अनेक सांगीतिका आणि व्याख्यानं नागपूर आकाशवाणीने प्रसारित केली. काव्याच्या प्रांतात गजल लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता. मराठीबरोबर हिंदीतही ते सहजतेने काव्यरचना करत. त्यांचं मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. तरीसुद्धा गप्पागोष्टी, चर्चांमधून एखादा नवा शब्द गवसला तर तो उत्सुकतेने स्वीकारण्याची त्यांची तयारी असे. स्पष्ट, परखड, पण सौम्य मांडणीतून त्यांनी स्वतःकडे अलिप्ततेने पाहत ‘प्रकाश काजव्याचा’ या आत्मकथेत आत्ममूल्यमापन केले.
आशयपूर्ण अभिव्यक्तींसाठी अचूक अर्थवाही शब्दांची रचना महत्त्वपूर्ण ठरते म्हणून यावर त्यांचा कटाक्ष असायचा. ते निवेदनही उत्कृष्ट पद्धतीने करत. उतारवयातही आपल्या लेखांचं अभिवाचन करताना आशयानुसार आवाजातील चढ-उतारांकडे त्यांचं लक्ष असे. नव्या पिढीकडून लिखाण, आधुनिक तंत्रज्ञानही समजून घेतल्याने ते कॉम्प्युटरचा वापर करत असत.
सध्याच्या जगात तरुण वर्गात ताण-तणावाचं प्रमाण वाढत चाललंय, त्याची कारणमीमांसा ते करत. यंत्रापलीकडचा परस्पर मानवी संवाद घडायला हवा. सुसंवादातून सामंजस्याने ‘मनं’ जाणून घ्यायला हवीत असं त्यांना वाटत असे.
सुधाकररावांनी 1987 मध्ये ‘उत्तरायणातील आनंदवाटा’ हे पुस्तक 87 व्या वर्षी लिहिलं. त्यात त्यांनी जीवनभर जोपासलेल्या धारणेविषयी म्हटलंय, अडचणींना संकट न समजता आव्हान समजून संघर्ष केला तर त्यातील संधी आपल्याला कळू शकतील आणि असं झालं तर मग उत्तरायणातले किती दिवस उरले आहेत हा हिशेब न करता उरलेले दिवस किती आनंदात घालवू याचा विचार करू. सुखदुःखांसह जीवन आनंदाने जगू.
हे जीवन सुखदुःखाचे,
मी जगतो आनंदाने
कटु-गोड रसांचे घोट,
मी पितो आनंदाने
ही उतरण मावळतीनी,
दमछाक सुरू श्वासांची
धाप लागते तरी निरंतर,
स्पंदन आनंदाने
ना वाटचाल ही सरली,
ना कळे अजून किती उरली
येताच वेळ पण,
सोडून सारे जाईन आनंदाने
बक्षी यांचं महाभारतातील व्यक्तिरेखांवर आधारित त्यातील ‘डोळस’ कोण आणि ‘मनांध’ कोण यावर स्वतंत्र विचार मांडणारं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. नव्वदीनंतरही सकस लिखाणासाठी नित्यनव्या विषयांच्या शोधात ते असत. रोज ध्यानधारणा करून त्यांनी स्वतःची प्रकृती अबाधित राखली होती. उत्साही आणि आश्वासक विचारांच्या ‘सर्वस्नेही’ स्वभावाचे बक्षी कायम स्मरणात राहतील.