
>> विवेक दिगंबर वैद्य
सप्टेंबर 1857. नवरात्रोत्सवाच्या पाचव्या अर्थात ललिता पंचमीच्या दिवशी श्रीस्वामी समर्थांची पावले अक्कलकोटच्या पावनभूमीवर पहिल्यांदा उमटली तेव्हा ते कोण व कुठून आले याविषयीची माहिती ग्रामस्थच काय, तर अक्कलकोट संस्थानाधिपतींनादेखील नव्हती.
पुढे काही काळानंतर या साधुपुरुषामधील देवत्वाची प्रचीती नगरवासीयांना येत गेली आणि पाहता पाहता पंचक्रोशीतील खेडय़ापाडय़ांपर्यंत पोहोचल्याने तिथल्या भक्तजनांचा ओघ अक्कलकोटच्या दिशेने वाहू लागला. यात मुख्यत्वे सोलापूर, मोहोळ, मंगळवेढे आणि पंढरपुरातील भक्तांमधील काही भक्त ‘हे स्वामी अक्कलकोटास येण्याआधी आमच्या येथे वास्तव्यास होते’ असे संदर्भ देत. कलकत्त्याहून आलेल्या एका इंग्लिश बॅरिस्टर दर्शनार्थीने श्रीस्वामींना त्यांच्या पूर्ववास्तव्याबद्दल विचारले तेव्हा ‘‘आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघाल्याचे’’ सांगून त्यांनी कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर, दक्षिण हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट या स्थानांचा उल्लेख केला.
अक्कलकोटमध्ये येण्याआधी श्रीस्वामी महाराज हे चंचलभारती, दिगंबरस्वामी, नृसिंहमुनी अशा विविध नावांनी ओळखले जात असत. तत्कालीन ‘कोश’कर्ते गोडबोले यांनी त्यांच्या संदर्भ नोंदीमध्ये श्रीस्वामी समर्थांचा उल्लेख ‘हे कर्नाटकात रामभारती नावाने परिचित होते’ असा केलेला आहे. सन 1871 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘श्रीपादभूषण’ या पहिल्या ओवीबद्ध चरित्रामध्ये लेखक कवी सखाराम सरनाईक यांनी श्रीस्वामी समर्थांचा उल्लेख मुख्यत्वे ‘दिगंबरस्वामी’ नावाने केलेला आहे. सन 1872 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माधवाचार्य म्हैसलगीकर लिखित चार अध्यायी संस्कृत चरित्रातही याच नाममुद्रेचे उल्लेख आढळतात. त्यामुळे विशिष्ट नावाची ‘ओळख’ दृढ न झाल्यामुळे पुढे श्रीस्वामी समर्थांची ओळख ‘अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ’ अशी झाली. त्यामुळे ‘अक्कलकोट’ या स्थानाचे माहात्म्य हीच श्रीस्वामी समर्थांकरिता ‘ओळखीची खूण’ म्हणून प्रसिद्ध झाली. हे ‘स्थानमाहात्म्य’ श्रीस्वामी समर्थांची ओळख निर्माण करण्यास उपयोगी झाले तरीदेखील त्यांना ‘श्रीस्वामी समर्थ’ ही नाममुद्रा कशी प्राप्त झाली हे जाणून घेण्याकरिता सन 1869 मधील रंजक व अलौकिक घटनेकडे पाहावे लागेल.
मुंबईतील लक्ष्मण पंडित, हरिभाऊ तावडे व गजानन खत्री हे त्रिकूट व्यापारामध्ये नुकसान होण्याच्या भीतीने एकत्र आले. त्यांच्यातील लक्ष्मण पंडित यांनी आर्थिक अरिष्टातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी अक्कलकोटनिवासी श्रीमहाराजांना साकडे घातले. सुदैवाने तिघेजण आर्थिक संकटातून सुखरूप बचावले व याच कारणाने ते नवस फेडण्यासाठी अक्कलकोटास गेले. मात्र, जातेवेळी एकत्र निघालेल्या तीन प्रापंचिक संसारी गृहस्थांपैकी माघारी येताना केवळ दोघेजण शिल्लक उरले. कारण श्रीमहाराजांच्या भेटीनंतर हरिभाऊ तावडेंच्या मनात वैराग्य वृत्ती उत्पन्न झाली. त्यातच श्रीमहाराजांनी हरिभाऊंना ‘‘तू माझा सुत (मुलगा) हो’’ असे सांगून त्यांना ‘‘आपला संसार लुटवून टाक आणि मुंबईच्या बंदर किनाऱयावर माझा किल्ला (मठ) उभा करून त्यावर ध्वजा फडकव’’ अशी आज्ञादेखील केली.
मुंबईस परतल्यावर हरिभाऊंना पुन्हा अक्कलकोटास जाण्याची ओढ लागली. मागील खेपेत श्रीमहाराजांनी केलेल्या आज्ञेनुसार, त्यांनी चांदीच्या पादुका तयार केल्या व ते पुन्हा अक्कलकोटास गेले. हरिभाऊंनी आणलेल्या चांदीच्या पादुका श्रीमहाराजांनी चौदा दिवस पायी वापरल्या व पुन्हा हरिभाऊंकडे सुपूर्द करीत ‘‘हे आमचे ‘आत्मलिंग’ असून याची स्थापना दर्याकिनारी मठामध्ये कर’’ अशी आज्ञा केली. या खेपेस अक्कलकोटहून येताच हरिभाऊंनी श्रीमहाराजांच्या आज्ञेनुसार आपला संसार पूर्णतः लुटवला आणि गिरगाव येथे समुद्रकिनारी असलेल्या कांदेवाडी परिसरामध्ये श्रीमहाराजांचा मठ स्थापन करून तिथे ‘आत्मलिंग’ पादुकांची स्थापना केली.
ही अलौकिक आणि रंजक घटना सन 1869 मध्ये घडली आणि अक्कलकोट येथील श्रीमहाराजांना ‘श्रीस्वामी समर्थ’ ही ‘ओळखीची खूण’ अर्थात ‘नाममुद्रा’ देण्यासाठी कारणीभूत ठरली. हरिभाऊ तावडे यांना व्यापारामध्ये अपयश येणे या सर्वसाधारण घटनेमध्ये आगामी काळात त्यांच्या हातून ‘श्रीस्वामी समर्थ संप्रदाय’ स्थापन होणार असल्याची बीजे रोवली गेली होती हेच या घटनेवरून सिद्ध होते. कारण यातूनच हरिभाऊंनी सर्वप्रथम ‘श्रीस्वामिसुत’ ही नाममुद्रा धारण केली आणि मुंबई येथे ‘श्रीस्वामी समर्थ संप्रदायाची गादी’ स्थापन केली.
श्रीस्वामिसुत केवळ सांप्रदायिक गादी स्थापन करून थांबले नाहीत, तर त्यांनी अक्कलकोटनिवासी श्रीमहाराज पहिल्याप्रथम हस्तिनापूरनजीक ‘छेलीखेडा’ येथे चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1071 (सन 1149) मध्ये आठ वर्षे वयाच्या बालरूपात प्रकट झाले असे प्रतिपादन केले. त्यासोबतच, श्रीस्वामिसुतांनी नगरचे प्रख्यात ज्योतिषी नानाजी रेखी यांच्याकडून श्रीमहाराजांची कुंडली बनवून घेतली आणि सन 1870 मध्ये ‘श्रीस्वामी जयंती’चा पहिला उत्सव कांदेवाडी मठात साजरा केला. पुढे, सन 1871 पासून या उत्सवाला श्रीस्वामिसुतांनी भव्य स्वरूप प्राप्त करवून दिले आणि कांदेवाडी (गिरगाव, मुंबई) येथे श्रीस्वामी समर्थांचा पहिला सांप्रदायिक मठ स्थापन केला. सन 1872चा ‘श्रीस्वामी जयंती’ उत्सव अक्कलकोट येथे श्रीमहाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्रीमहाराजांचा गजर सर्वत्र ‘श्रीस्वामी समर्थ’ या नावाने होऊ लागला. श्रीस्वामिसुतांनीच ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामीसमर्थ’ हा पंचदशाक्षरी मंत्र सर्वप्रथम स्वामिभक्तांमध्ये रुजवला. श्रीस्वामी समर्थांचा संप्रदाय उभारण्याच्या अनुषंगाने महापर्वणी उत्सव (फाल्गुन शुद्ध द्वितीया), ‘श्रीस्वामी शक’ या शक-कालगणनेवर आधारित ‘श्रीस्वामी समर्थ गादी’ पंचांगाची निर्मिती, अभंगरचनेद्वारे श्रीस्वामी संप्रदायाची दीक्षा, नेमनियम, उत्सव, उपासना व परंपरा यांचे स्वरूप श्रीस्वामिसुतांनी जनमानसात रुजवले. ‘अक्कलकोटी’ वास्तव्य करणाऱया परब्रह्माची ओळख ‘श्रीस्वामी समर्थ’ नावाने जिथे घडली त्या ‘श्रीस्वामी समर्थ मुंबापुरी गादी’चे ‘स्थानमाहात्म्य’ मुंबईच्या गिरगाव परिसरातील ‘कांदेवाडी’ मठाच्या पावन वास्तूत सामावलेले आहे.




























































