स्वामी विवेकानंदः हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाची ज्ञानगंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. विवेकानंद यांच्या 156व्या जयंती निमित्त या अलौकिक सिद्धयोग्याला विनम्र अभिवादन! पाहुयात त्यांचे काही दुर्मीळ फोटो

>> प्रा. शरयू जाखडी 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर स्वामींविषयी म्हणाले होते की, ‘तुम्हाला हिंदुस्थान जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. त्यांच्यात सर्व काही सकारात्मक दिसेल.’ गुरू रामकृष्ण परमहंसांशी भेट झाल्यावर रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची शिदोरी नरेंद्रच्या स्वाधीन करून त्यांचे नामाभिदान ‘विवेकानंद’ असे केले आणि हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाची ज्ञानगंगा जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याची जबाबदारी विवेकानंदांवर सोपवली. अर्थात हा भगीरथ खरोखर त्या कार्यात यशस्वी झाला.

आपल्या हिंदुस्थानात आध्यात्मिक उपासनेची श्रीमंती युगेयुगे पाहायला मिळते. साक्षात्कारी संतमहंत, ब्रह्मज्ञानी महापुरुषांच्या हिऱ्यांची ती खाण आहे. अशा या हिऱ्यांच्या खाणीत कोहिनूर शोभावा असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंदांच्या रूपाने उदयाला आले. संत रामकृष्ण परमहंस यांच्या या विश्वविख्यात शिष्याने हिंदुस्थानी तत्त्वज्ञान जगासमोर मांडले. अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत 11 सप्टेंबर 1893 रोजी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचे नेतृत्व करण्यासाठी गेलेल्या विवेकानंदांनी हिंदू धर्म तत्त्वाच्या वैश्विक मूलतत्त्वाचे विवेचन परिषदेत केले. हिंदू धर्मातील मानवकल्याणाच्या आत्म्याला त्यांनी जगासमोर प्रगट केले. भाषणाची सुरुवात ‘अमेरिकेतील माझ्या बंधूभगिनींनो’ अशी केली. स्वामींच्या पहिल्याच वाक्याने हिंदू धर्माच्या विश्व बंधुत्वाच्या स्नेहल विचाराचा ऊबदार स्पर्श जमलेल्या धर्ममार्तंडांच्या हृदयाला झाला. अखंड दोन मिनिटांच्या टाळय़ांच्या गजरात या साध्या वेशातील संन्याशाचे अभूतपूर्व स्वागत झाले. सर्व धर्ममार्तंडांची मने त्यांनी जिंकली. तेथील सर्व धर्मगुरूंच्या आणि अमेरिकेतील सामान्य लोकांच्या मनात हिंदू धर्माविषयी विलक्षण औत्सुक्य निर्माण केले. तो दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला.

जगाच्या क्षितिजावर हिंदू धर्माचा ज्ञानसूर्य उदय पावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या धर्म परिषदेपर्यंत स्वामीजी पोहोचले होते. तत्पूर्वी हिंदुस्थानकडे नगण्यपणे पाहिले जात होते. एका प्राध्यापकाच्या ओळखीने स्वामींना फक्त काही मिनिटे परिषदेत बोलण्याची परवानगी मिळाली. त्या संधीचे स्वामींनी सोने केले. तीन वर्षे अमेरिकेत राहून अनेक व्याख्यानांतून हिंदू धर्माच्या मूळ हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाचे विवेकपूर्ण विवेचन या ब्रह्मवेत्त्या संन्याशाने केले. स्वामींच्या मते सर्व धर्मांचे अंतिम सत्य एक आहे. सर्व प्राणीमात्रांत शिवाचा अंश आहे. वेगळा ईश्वर शोधायची गरज नाही. ‘शिवभावे जीवसेवा’ हा माणुसकीचा मूलमंत्र आहे. तुमचे चांगले कर्म व कर्तव्य यातून तुम्ही दिव्यत्त्वाचा साक्षात्कार अनुभवू शकता. स्वामींच्या मते, धर्माधर्मातील भांडणे, भेदभाव, दुष्ट असुरी प्रवृत्ती यातून पृथ्वीवर वारंवार नरसंहार घडतात असे घडले नाही आणि सर्व मानव जातीत सौहार्दाचे वातावरण असेल तर मानव अधिक प्रगतीची झेप घेऊ शकतो.

तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी स्वामींच्या ओजस्वी व्यक्तिमत्त्वाची व विचारांची वाखाणणी केली. आयुष्याच्या अवघ्या 39 वर्षांच्या जीवनपटात अभुतपूर्व कार्य करून हिंदुस्थानच्या व जगाच्या क्षितिजावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा देदीप्यमान ठसा या थोर पुरुषाने उमटवला. स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक अंगाने त्यांनी मांडलेल्या जीवनमूल्यांवर आधारित प्रतिभावंत लेखकांनी स्वागतार्ह लेखन केले आहे. नवीन युवा पिढीसमोर विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श सुडौलपणे मांडला आहे. विवेकानंदांच्या विचारांचा मागोवा घेऊन तो पुनः पुन्हा नव्या पिढीसमोर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा करतात हे औचित्यपूर्ण आहे. कारण विवेकानंदांनी युवकांसाठी प्रेरणादायी विचार मांडले आहेत. ते तरुणांना सुचवतात की, मनाची नकारात्मकता, चंचलता, मलिनता टाकून मन आत्मकेंद्रित करा. स्वतःच्या विकासासाठी व सृजनशक्ती विकसित करण्यासाठी मन एकसंध एकजिनसी करा. त्यातूनच तुमचे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार होईल. विवेकानंदांच्या प्रासादिक आणि प्रभावी शब्दाशब्दांतून सुविचारांचा साक्षात्कार घडवला जातो.

विवेकानंदांच्या मते शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक मनाचा विकास झाला पाहिजे. त्या वेळच्या शिक्षण पद्धतीतून नुसत्या पाटय़ा टाकणारे कारकून तयार होत होते. ते विवेकानंदांना मान्य नव्हते. शिक्षणाने आत्मनिर्भरता, स्वावलंबन, चारित्र्यसंपन्नता, मनाच्या शक्तीचा विकास हे गुण वाढीस लागले पाहिजेत. शिक्षण पूर्ण होताच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया स्वबद्दलच्या दृढ विश्वासाने तयार झाला पाहिजे. मनाच्या विकासाबरोबर बलाची उपासना महत्त्वाची आहे असे त्यांचे ठाम मत होते. बलवान शरीरात सशक्त मन निवास करीत असते. त्यामुळे शिक्षणाबरोबर खेळासाठी मैदानावर जाणे तितकेच महत्त्वाचे आहे. विवेकानंदांना वाचनाची अतिशय आवड होती. हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचा, वेदान्त, षड्दर्शने यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्याचबरोबर मैदानी खेळ, पोहणे, घोडय़ावर बसणे, योगाभ्यास यातही ते पारंगत होते. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांचा आवाज मधुर होता. परीक्षेला जाताना परीक्षेचे ओझे घेऊन जाणे त्यांना पसंत नव्हते. परीक्षेला जाण्याच्या अगोदर थोडा वेळ ते बासरी वादनाच्या नादब्रह्मात विलीन होत असत. परीक्षेला जाताना ते सृजनात्मक सकारात्मक मन बरोबर नेत असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रसन्न असे आनंदाचे समाधानाचे सुंदर प्रकाशकिरण परावर्तीत होत असत. त्यांच्या मते, शिक्षणाने यांत्रिक युगाकडे जाताना माणसाचे यंत्र होऊ नये. माणसाच्या मनातील संवेदनक्षमता जिवंत राहिली पाहिजे. बंकिमचंद्रांची ‘आनंदमठ’ कादंबरी वाचून माझ्या मनात देशभक्तीची भावना अधिक तीव्र झाली’ असे ते आवर्जून सांगत असत. ‘राष्ट्रभक्तीची भावना प्राणपणाने जपली पाहिजे. युवकांनी राष्ट्र सामर्थ्यशाली बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. युवकांना ते आवाहन करीत की, हिंदुस्थानी युवकांनो उठा, जागे व्हा, ध्येयप्राप्तीशिवाय थांबू नका. विराट भारतमातेच्या पूजेसाठी सज्ज व्हा. विद्यार्थ्यांनो, भौतिक ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञानाची कास धरा, त्यातून तुमची आत्मिक प्रगती होण्यासाठी मदत होईल. मन, बुद्धी स्थिर व्हायला मदत होईल. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आत्मनिर्भर बना.’

स्वामी विवेकानंद आपल्या अनुभवातून, चिंतनातून नेहमी सकारात्मक विचार मांडत असत. ते सांगतात, प्रत्येक विचाराला तीन अवस्थांतून जावे लागते. एक त्या विचाराची खिल्ली उडवणे, नंतर त्याला विरोध करणे आणि शेवटी त्याचा स्वीकार करणे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर स्वामींविषयी म्हणाले होते की, ‘तुम्हाला हिंदुस्थान जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. त्यांच्यात सर्व काही सकारात्मक दिसेल.’

विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्या या सुपुत्राचा जन्म पौष कृष्ण सप्तमी या दिवशी कोलकाता येथे झाला. त्या मुलाचे नाव त्यांनी नरेंद्र असे ठेवले होते. गुरू रामकृष्ण परमहंसांशी भेट झाल्यावर रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची शिदोरी नरेंद्रच्या स्वाधीन करून त्यांचे नामाभिदान ‘विवेकानंद’ असे केले आणि हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाची ज्ञानगंगा जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याची जबाबदारी विवेकानंदांवर सोपवली. अर्थात हा भगीरथ खरोखर त्या कार्यात यशस्वी झाला.

[email protected]