आदित्य ढेकळे याची तालावरची वेगळी वाट

सामना प्रतिनिधी । मुंबई

आपल्याला आवड असो की नसो, घरात ज्या पद्धतीचे वातावरण असते तशी आवड आपोआप आपल्याला जडते. माझ्या बाबतीत तरी हे असंच झालंय. मला तबल्याची आवड नव्हती. पण घरात संगीताचे वातावरण असल्यामुळे बाबांच्या मनात होतं की आदित्यनेही याच क्षेत्रात नाव कमवावं… म्हणून असं वाटायचं. त्यामुळे त्यांनी मला माझ्या वयाच्या तिसऱया वर्षीच तबल्याचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. तेव्हा लहानग्या मला बाबा पहाटे 4 वाजता उठवून माझ्याकडून रियाज करवून घ्यायचे. मला आधी कंटाळा यायचा पण हळूहळू तबला वाजवण्यात रस वाढू लागला.

मी लहानपणापासूनच तबल्याचं प्रशिक्षण घेत होतो ते बाबांच्या जिद्दीमुळे… म्हणूनच आता मी तबल्यामध्ये तरबेज झालो आहे. या कलेत मला माझ्या शिक्षकांनीही खूप पाठिंबा दिला. यामुळेच शाळेत मला दोनदा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेता आला आणि त्या दोन्ही स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मी मिळवली. स्व. पंडित मुळगावकर यांच्याकडून मी तबल्याचं प्रशिक्षण घेतलं. ते नेहमी म्हणायचे दुसऱ्यांसारखं कधीच होऊ नका. तुम्ही स्वत:च आपलं व्यक्तिमत्त्व निर्माण करा. मी त्यांच्या म्हणण्यानुसारच वागेन.

नुकतीच मला पद्मश्री पद्मजाताई फेणाणी-जोगळेकर यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. कैलास खेर यांनी काही महिन्यापूर्वी ‘ए. आर. डिव्हाईन’ नावाचा ग्रुप तयार केला आहे. कैलास खेर यांच्या सहवासात बरंच शिकायला मिळालं. संगीताने मला जगायला शिकवलं. खरं तर संगीताविना मी अपूर्णच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या