नाद- मराठी – यश हे अमृत झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

रेशमी, मुलायम आवाज असलेल्या लखनऊच्या एका देखण्या तरुणाची हिंदी चित्रपटसृष्टीतला गायक-नायक होण्याची महत्त्वाकांक्षा होती. उत्तम गळा आणि उत्तम रूप हे त्याला जन्मजातच लाभलं होतं. त्या काळात अभिनय आणि देखणेपण नसलेले नायकही नुकतेच बाळसं धरू लागलेल्या हिंदी सिनेमाच्या पडद्यावर होतेच. ‘प्लेबॅक’ किंवा ‘पार्श्वगायना’चा जमाना येण्यापूर्वी नायक-नायिकाच (जमेल तसं) आपलं गाणं म्हणत. यात अशोककुमारपासून दिलीपकुमारपर्यंत अनेकांचा समावेश होता. या तरुणाकडे दोन्ही गुण होते. नजरेसमोर कुंदनलाल सैगल या गायक अभिनेत्याचा आदर्श होता. अभिनय मात्र पडद्यावरच सिद्ध करायला लागणार हे स्पष्ट होतं.

त्या तरुणाचं नाव होतं तलत मेहमूद. 2 फेब्रुवारी 1924 रोजी त्यांचा जन्म लखनौ येथे झाला. सिनेमाचा गायक-नायक होऊ इच्छिणाऱ्या तलतच्या जन्माच्या वेळी मात्र सिनेमा ‘बोलत’ नव्हता. 1931मध्ये ‘आलमआरा’ हा पहिला हिंदी बोलपट आला. (त्याचे नायक आपले मराठी मास्टर विठ्ठल होते) अर्थात तलत तरुण होईपर्यंत काळ आणि तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं होतं.

तलतच्या घरी गाणं होतं, पण ते उपासनेपुरतं. त्यांच्या वडिलांचा आवाजही सुरेल होता. तलत यांना गाण्यासाठी प्रोत्साहन मिळालं ते मात्र त्यांच्या आत्याकडून. लखनऊ कॉलेजात असताना त्याची खूप वाहवा झाली. ती वार्ता कानी पडताच एचएमव्हीच्या कोलकाता विभागाचे लोक त्यांना भेटायला आले आणि तलत मेहमूद यांच्या पहिल्या दोन ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. त्यातलं ‘तस्वीर तेरी, दिल मेरा बहेला न सकी’ हे गाणंही लोकप्रिय झालं. आता गायक म्हणून कारकीर्दीची सुरुवात व्हायला काहीच हरकत नव्हती… पण तरुण तलतला अभिनेता होण्याचीच ओढ अधिक होती. म्हणून कोलकात्याला जाऊन ‘राजलक्ष्मी’ या चित्रपटात त्यांनी तपनकुमार नावाने कामही केलं. 1945 मधली ही गोष्ट. त्यानंतर मात्र त्यांनी चित्रनगरी मुंबई गाठली ती कायमचीच. संगीतकार अनिल विश्वास यांच्या ‘आरजू’ चित्रपटातलं ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल’ हे गाणं कमालीचं ‘हीट’ झाल्यावर नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘बाबूल’ चित्रपटात त्यांनी दिलीपकुमारसाठी ‘मिलते ही आँखे दिल हुआ दिवाना किसीका’ हे गाणंही गाजलं. तसा तेरा चित्रपटात तलत मेहमूद यांनी अभिनय केला, पण त्यांचं नाव झालं ते ‘गजल गायनसम्राट’ म्हणून आणि हिंदीइतकीच त्यांची इतर भाषांमधली गाणीही गाजली. मराठीतलं त्यांचं आशा भोसले यांच्यासह गायलेलं ‘हसले आधी कुणी, तू का मी’ हे युगुलगीत आठवून पहा. याचे शब्द होते जनकवी पी. सावळाराम यांचे तर मधुर संगीत वसंत देसाई यांचं. ‘मोलकरीण’ चित्रपटासाठी हे गाणं चित्रित झालं.

‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटातलं पी. सावळाराम यांचंच ‘यश हे अमृत झाले’ हे तलत मेहमूद यांच्या मधाळ स्वरातील गाणं जरूर ऐका. संगीत आहे वसंत प्रभू यांचं. याच सिनेमातलं डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने शांता शेळके यांनी लिहिलेलं ‘स्वप्ने मनातली का’ हे सुमन कल्याणपूरसह गायलेलं गाणंही श्रवणीय. शांताबाईंचंच ‘तोची साधू ओळखावा’ या चित्रपटातील ‘खवळून उठले साती सागर’ हे गीत तलत मेहमूद यांनी गायलं आहे. संगीत होतं हेमंत केदार यांचं.

तलत मेहमूद यांचा मुलायम, आर्त स्वर गजल गायनाला न्याय देणारा होता. त्यांनी गाण्याचे अनेक कार्यक्रमही सादर केले. मुंबईच्या ‘षण्मुखानंद’ सभागृहात तलतचं गाणं ऐकण्याचा योग आला होता. त्या वेळी श्रोत्यांनी भरलेल्या सभागृहातून कित्येक गाण्यांची वारंवार ‘फर्माईश’ होत होती. ‘सुजाता’ चित्रपटातलं ‘जलते है जिसके लिए, तेरी आँखों के दिये’ हे आणि ‘बिरादरी’मधलं ‘तस्वीर बनाता हू’ ही त्यांची अतिशय रसिकप्रिय गाणी. अशा या गोड गळय़ाच्या गायकाचा सन्मान 1992मध्ये ‘पद्मभूषण’ प्रदान करून झाला. आपल्या स्वराप्रमाणेच मृदू स्वभावाच्या तलत यांचं वर्णन दिलीपकुमार यांनी ‘परफेक्ट जंटलमन’ असं केलं होतं. सिनेसृष्टीचं तलतविषयी तेच मत होतं.

प्रदीर्घ काळाची गान-कारकीर्द संपवून 9 मे 1998 रोजी तलत मेहमूद यांनी या जगाचा निरोप घेतला. त्याला आता बावीस वर्षे झाली. तरीही गझल म्हटलं की तलतचं स्मरण होणारच. सिनेमात यशस्वी अभिनेता होणं साध्य झालं नाही, पण तलतचं गाण्यातलं ‘यश’ मात्र ‘अमृत’ झालं. त्याचं माधुर्य रसिकांच्या मनात सतत राहील.