झणझणीत मिसळ

>> रश्मी वारंग

तळागाळापासून ते विदेशापर्यंत पसंती मिळण्याचं भाग्य फार कमी पदार्थांना लाभतं. महाराष्ट्राची ओळख ठरलेल्या मिसळीला हे नशीब लाभलेलं आहे. या झणझणीत मिसळीची ही कहाणी.

मिसळया नावातच मिसळणं, मिळून येणं हा भाव दडलेला आहे. नावातूनच पदार्थ कळून येणं फार कमी पदार्थांच्या बाबतीत घडतं. मिसळ त्यापैकी एक. महाराष्ट्रात वेगवेगळय़ा प्रकारच्या उसळी खाल्ल्या जातच होत्या. मटकी, वाटाणे यासारख्या कडधान्यांच्या उसळीतून मिळणारी प्रोटिन्स महत्त्वाची आहेत हे आपल्या पूर्वजांनी ओळखलं होतं. महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा प्रसंगांशी या उसळी जोडलेल्या आहेत. कोकण प्रांतात गणपती उत्सवातील उसळपाव तर खास रंगतदार ठरतो. त्यामुळे उसळ तर होतीच, पण याच उसळीला तिखटजाळ तर्रीची जोड देऊन त्यात पोहे, कांदा, शेव, फरसाण घालून सजवण्याची बुद्धी कुणा अस्सल खवय्याला झाली आणि झटपट तयार होणारा पोटभरीचा झणझणीत पदार्थ जन्माला आला.

काही संशोधकांनी मराठा सरदार कोंडाजी फर्जंद यांना मिसळीचे जनक म्हटले आहे. सैनिकांना तत्काळ देता येणारा पोटभरीचा आणि ऊर्जा देणारा नाश्ता म्हणून मिसळ द्यायची पद्धत त्यांनी सुरू केली होती. मिसळीचे सुरुवातीचे नाव ‘उसळ मिसळ’ असे होते.

ही कथा खरी मानली तरी ‘उसळ मिसळ’ म्हणजे उसळ, तर्री, कांदा एवढंच त्याचं स्वरूप असणार. कारण ना तेव्हा पाव होता आणि ना गुजराती फरसाण.

काही मंडळींनी मिसळीचं जनकत्व खानदेशाला दिलं आहे. मिसळ नेमकी कोणत्या भागाची यावर एकमत होऊच शकत नाही. कारण कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबई, नगर प्रांताने त्यात आपापल्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे बदल केलेले दिसतात. त्यात सोयीचा भागही मोठा आहे. प्रांतोप्रांतीची मिसळ मुंबईसारख्या गिरणभागात आल्यावर त्यात मुंबईतील मिश्र संस्कृतीमधील गुजराती फरसाण वापरलं जाऊ लागलं. गिरणी कामगारांच्या सोयीसाठी पटकन देता येऊ शकणारा आणि पोटभरीचा पाव जोडीला आला आणि आजची नखरेल मिसळ तयार झाली. पूर्वी नाश्त्याला गाडीवर मिळणारी मिसळ आज खास स्पेशल थाळीतून समोर येते आहे. तिला दह्याची, ताकाची जोड मिळू लागली आहे आणि अनेकांसाठी तो जेवणाचा पर्याय ठरू लागला आहे.

अशा या लोकल मिसळीने 2015 मध्ये जगाच्या नकाशावर दमदार पाऊल उमटवलं. 2015 मध्ये मिसळपावला लंडनमधील फूडी हब पुरस्कार सोहळय़ामध्ये जगातील सर्वात चवदार शाकाहारी डिश म्हणून सन्मानित करण्यात आले.

 तळागाळापासून विदेशापर्यंत महाराष्ट्राचा झेंडा रोवणारी मिसळ म्हणजे तिखटजाळ सुख आहे. पोटात भुकेने कावळे कोकलत असतात. लालसर तवंगाच्या तर्रीतून मटकी, मूग, वाटाण्याची उसळ डोकावते. फरसाण, कांदा, शेव आपापली जागा पकडतात आणि पावाच्या तुकडय़ावर स्वार होत ती झणझणीत चव मुखात विसावते आणि आपण स्वतःलाच विचारतो, ‘‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?’’