
>> डॉ. प्रीतम भी. गेडाम
जगभरात 10-19 वयोगटातील सातपैकी एका मुलाला मानसिक आरोग्य समस्या आहे. तरीही या समस्या मोठ्या प्रमाणात ओळखल्या जात नाहीत आणि त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. अभ्यासात असे आढळून आले की, शाळकरी मुलांपैकी 23.33 टक्के मुलांना मानसिक आरोग्य समस्या आहेत. अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा अतिवापर आणि कुटुंबातील बिघाड यामुळे ताणतणाव वाढतो. यातील 43 टक्के विद्यार्थ्यांनी मूड स्विंगची तक्रार केली तर 11 टक्के विद्यार्थ्यांनी चिंतेसंदर्भात समस्या व्यक्त केली. 10 टक्क्यांपेक्षा कमी तरुण भारतीयांना औपचारिक मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. बहुतेक किशोरवयीन मुले मानसिक आरोग्य विकारांसाठी मदत घेण्यास कचरतात.
आजच्या आधुनिक युगात सर्व वयोगटातील लोकांना कधी ना कधी मानसिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा तोंड द्यावे लागले असेल. आयुष्यात आनंद, सुख-समाधान आणि शांती फक्त नावापुरतीच असल्याचे दिसते. असे वाटते की, प्रत्येक जण स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगत आहे. अगदी किशोरवयीन मुलांमध्येही आजकाल मानसिक आरोग्य समस्यांचा प्रश्न गंभीर पातळीवर पोहोचला आहे. किशोरवयीन मुलांमध्ये सातत्याने वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण हीदेखील एक गंभीर समस्या आहे. या वयातील मुलांमध्ये राग, चिडचिडेपणा, ताणतणाव, द्वेष, सहनशीलतेचा अभाव, सोशल मीडियाचे व्यसन आणि अमली पदार्थांचे सेवन यासारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. शाळकरी मुलांद्वारे त्यांच्या शिक्षकांवरही हल्ला करण्याच्या घटना अनेकदा नोंदवल्या जातात. लहान वयात गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असण्याचा ट्रेंड, सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग, ड्रग्जचे व्यसन, खोटा देखावा, खोटे बोलणे, संस्कारांचा अभाव, नैतिकतेचा अभाव, चारित्र्याचा अभाव आणि अश्लीलता यांनी समाजाला विषारी बनवले आहे.
दुसरीकडे पालकांचा मुलांवर नियंत्रणाचा अभाव, मुलांवर आंधळा विश्वास, वाईट संगत, मुले आयुष्यातील वाईट गोष्टी किंवा घडत असलेल्या घटनांना विरोध करण्यास घाबरतात, काही भीतीच्या सावलीत जगतात, पालकांनी मुलांना वेळ न देणे, संगोपनाचे सकारात्मक वातावरण निर्माण न करून देणे, मुलांकडून पालकांनी जास्त अपेक्षा ठेवणे, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे, मुलांवर दबाव आणणे किंवा आपल्या इच्छा त्यांच्यावर लादणे आणि पालकांची त्यांच्या मुलांच्या भावना समजून घेण्यास असमर्थता हीदेखील किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण करणारी कारणे आहेत.
किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 मार्च रोजी ‘जागतिक किशोर मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. हा दिवस जागरूकता वाढवणे, कलंक कमी करणे, चिंता, ताण आणि नैराश्यासारख्या किशोरवयीन आरोग्य आव्हानांबद्दल खुल्या संभाषणांना प्रोत्साहन देणे तसेच स्वतःची काळजी घेण्याच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करणे यावर भर दिला जातो. 2026ची थीम ‘किशोरवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये निरोगी आणि कल्याणकारी उपक्रमांचे नेतृत्व करण्यास सक्षम करणे’ अशी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते किशोरवयीन मुले शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदलांमुळे मानसिक आरोग्य समस्यांना बळी पडतात, ज्यात गरिबी, गैरवापर किंवा हिंसाचार यांचा समावेश आहे. त्यांना या समस्यांपासून वाचवणे आणि चांगल्या जीवनासाठी आवश्यक असलेले आल्हाददायक संगोपनाचे वातावरण निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असा अंदाज आहे की, जगभरात 10-19 वयोगटातील सातपैकी एका मुलाला मानसिक आरोग्य समस्या आहे. हे सर्व जागतिक आजारांपैकी 15 टक्के आहे, तरीही या समस्या मोठय़ा प्रमाणात ओळखल्या जात नाहीत आणि त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. आयुष्यभर होणाऱ्या मानसिक आजारांपैकी अर्धे आजार वयाच्या 14व्या वर्षी सुरू होतात. मानसिक आरोग्य समस्या असलेल्या मुलांना सामाजिक बहिष्कार, भेदभाव, कलंक, शैक्षणिक अडचणी, जोखीम पत्करण्याचे वर्तन, शारीरिक आजार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यांचा सामना करावा लागतो. वर्तणुकीशी संबंधित मानसिक विकार हे मोठय़ा वयाच्या किशोरवयीन मुलांपेक्षा तरुण किशोरवयीन मुलांमध्ये अधिक सामान्य आहेत. नैराश्य, चिंता आणि वर्तणुकीशी संबंधित विकार हे किशोरवयीन मुलांमध्ये आजार आणि अपंगत्वाची प्रमुख कारणे आहेत.
15-29 वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. आवश्यक आरोग्य सेवेची उपलब्धता नसल्याने, मुले मोठी होताना समाजात आणि कुटुंबात योग्य स्थान मिळवू शकत नाहीत, ज्यामुळे जीवनात अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागते. अटेंशन डेफिसिट हायपरऑक्टिव्हिटी डिसऑर्डर, अतिक्रियाशीलता विकार आणि वर्तणुकीशी संबंधित विकार किशोरवयीन मुलांच्या शिक्षणावर परिणाम करू शकतात आणि गुन्हेगारी वर्तनाचा धोका वाढवू शकतात, जो संपूर्ण मानवी समाजासाठी चिंतेचा विषय आहे.
मुलांना योग्य वेळी आधार देणे महत्त्वाचे आहे, त्यांच्यासोबत मित्र म्हणून वेळ घालवणेदेखील महत्त्वाचे आहे. फक्त आपली मुले आहेत म्हणून त्यांच्या चुका झाकणे किंवा ते हट्टी आहेत म्हणून त्यांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आज आपण जगभरात आणि समाजात जे गुन्हेगार पाहतो, कदाचित जर त्यांच्या पालकांनी त्यांना योग्य वेळी चांगले संगोपन, मूल्ये आणि पोषक वातावरण दिले असते, तर ते आज समाजासाठी एक भयंकर ‘शाप’ बनले नसते. समस्या सोडविण्यासाठी परस्पर कौशल्ये विकसित करणे आणि भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकणे आवश्यक आहे. घर, कुटुंब, शाळा आणि व्यापक समुदायामध्ये संरक्षणात्मक आणि आल्हाददायक सहाय्यक वातावरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
अभ्यासात असे आढळून आले की, शाळकरी मुलांपैकी 23.33 टक्के मुलांना मानसिक आरोग्य समस्या आहेत. अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा अतिवापर आणि कुटुंबातील बिघाड यामुळे ताणतणाव वाढतो. यातील 43 टक्के विद्यार्थ्यांनी मूड स्विंगची तक्रार केली तर 11 टक्के विद्यार्थ्यांनी चिंतेसंदर्भात समस्या व्यक्त केली. 10 टक्क्यांपेक्षा कमी तरुण भारतीयांना औपचारिक मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. बहुतेक किशोरवयीन मुले मानसिक आरोग्य विकारांसाठी मदत घेण्यास कचरतात. सायबरबुलिंग, सामाजिक तुलना आणि इंटरनेट व्यसन वाढत आहे आणि 15-19 वयोगटातील मुलांमध्ये अल्कोहोलचा वापर जास्त आहे. 13-17 वयोगटातील अंदाजे 7 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्य विकार आहेत आणि तरुणांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे.
पालकांनी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांना भावनिकदृष्टय़ा बळकटी मिळेल आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होईल. मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजवणे, भेदभाव दुर्लक्षित करून मानवतेचा संदेश पसरवणे आणि राष्ट्रसेवेला प्राधान्य देणे या गोष्टी मुलांमध्ये रुजविण्याची प्राथमिक कर्तव्ये पालक आणि शिक्षकांची आहेत. अशा प्रकारे मुलांमध्ये मानसिक आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता टाळता येईल.





























































