गड आला पण सिंह गेला

नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीतीर्थ उमरठ. रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. तानाजी मालुसरे यांचे नाव ऐकताच ‘गड आला पण सिंह गेला’ ही उक्ती कानात घुमू लागते. छत्रपती शिवाजी महाराजांची सावली बनून त्यांची सोबत करणारे, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे तानाजी मालुसरे. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक घटनेत त्यांनी महाराजांची सोबत केली. अफजलखानाची मोहीम फत्ते करण्याआधी महाराजांसोबत असणाऱया निवडक शिलेदारांमध्ये तानाजी मालुसरे होते. सिंहगड स्वराज्यात आणण्यासाठी त्यांनी घरातील मंगलकार्य बाजुला ठेवले. या लढाईत त्यांनी दाखवलेला पराक्रम आणि त्यांचे बलिदान स्वराज्यासाठी अजरामर ठरले. 4 फेब्रुवारी 1670 रोजी त्यांना सिंहगडावर वीरगती प्राप्त झाली. उमरठ हे तानाजी मालुसरे यांचे मामा शेलारमामा यांचे गाव. वडिलांच्या मृत्यूनंतर ते इथेच स्थायिक झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना या गावी आणले गेले. ज्या वाटेने आणले गेले ती वाट मढेघाट नावाने ओळखली जाते. उमरठ येथे गावाच्या वेशीवर त्यांना अग्नी दिला गेला. त्या जागी चौथरा व समाधी उभारण्यात आली आहे. या समाधीचा नुकताच दुसऱयांदा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घराच्या जागी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून तिथे स्मारकाची स्थापना करण्यात आली आहे.