
>>दिलीप जोशी
सध्या जगभरची वृत्तपत्रे, वृत्त चॅनेल यांच्याकडे येत असलेल्या बातम्यांमध्ये विनाशकारी, जगणं असह्य करणार्या वृत्तांचाच भरणा अधिक असतो. जगात कुठे काही बरं घडतंय की नाही ते या बातम्यांच्या जंजाळात शोधावं लागतं. सत्तेची साठमारी, युद्धाचे ढग, विद्वेषाचे वणवे आणि अन्याय, अत्याचार कुठे ना कुठे घडत असलेल्या माणसांच्या जगात कधीतरी माणुसकीचा गहिवर आणणारंही काही घडतं. तसं थोड्याफार प्रमाणात ते सर्वत्रच घडत असतं म्हणून जग टिकून आहे, पण प्रत्येक वेळी तो ‘बातमी’चा विषय नसतो.
जागतिक फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना आणि दिग्गज संघांपैकी काही पराभुतांना त्यांच्या देशात रोषाचे दगड खावे लागल्याचं वृत्त झळकत असलेल्या काळातच थायलंडमधल्या एका नगण्य फुटबॉल संघाने २३ जूनपासून जगाचं लक्ष वेधून घेतलं. ‘वाइल्ड बोअर्स’ नावाचा हा ११ ते १७ वयोगटातल्या नवतरुणांचा फुटबॉलचा संघ. त्याचा प्रशिक्षक (कोच) केवळ पंचवीस वर्षांचा तरुण. सौम्पियांगगेगाई या खेळाडूचा सतरावा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा चमू २३ जूनला थाम लुआंग नाना, नॉन्गनान म्यानमार (ब्रह्मदेश) आणि थायलंडचा सीमेवरील डोईनान्ग नॉन या पर्वतराजीच्या पायथ्याशी असलेल्या अक्राळविक्राळ गुहेपाशी आला. चिअँग राई प्रांतातली गुहा या पर्वतात १० किलोमीटर अस्ताव्यस्त पसरलेली आहे. ‘निद्रिस्त राजकन्या’ असं या प्राचीन गुहेचं नाव. या गुहेत शिरण्याचं साहस पार पाडून परतावं असा या फुटबॉल पथकाचा हेतू, परंतु निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं.
गुहेचा तोंडाशी सायकली ठेवून हे तेरा जण गुहेत शिरले आणि काहीतरी नवं धाडसी कृत्य करतोय या नादात आत आत जात राहिले. दरम्यान, बाहेर तुफानी पाऊस सुरू झाला. परिणामीच गुहेच्या तोंडातही पाणी शिरलं. या पथकाला हे समजपर्यंत परतीचा मार्ग बंद झाला होता. खळाळणार्या, रोरावणार्या पाण्यात झोकून देऊन पोहता येणंही शक्य नव्हतं. शिवाय गुहा अनेक ठिकाणी अगदी चिंचोळी, केवळ सरपटत जाता येईल एवढीच जागा असलेली. तीही पाण्याने भरली. त्यामुळे बाहेर पडणं अशक्यच. गुहेच्या आतल्या भागात अडकलेली हवा घुसमटणारी, पण थोडा श्वास घेण्यापुरती. या मुलांकडे थोडं पिण्याचं पाणी आणि वेफर्ससारखे तुटपुंजे खाद्यपदार्थ. काय घडलंय किंवा बिघडलंय हे लक्षात आल्यावर सर्वांचीच पाचावर धारण बसली. त्यातल्या त्यात मोठा पंचविशीतला प्रशिक्षक मुलांना धीर देत होता.
बाहेर पाऊस वाढत होता. आपण या गुहेत अडकलोत हे बाहेरच्या जगाला ठाऊक आहे की नाही हे कळण्याचा प्रश्नच नव्हता. एवढ्या आत सेल फोन असले तरी ‘रेंज’ नसणं स्वाभाविक होतं. मात्र वन विभागाच्या एका माणसाने गुहेच्या बाहेर या मुलांचं काही सामान पाहिलं आणि आत कोणीतरी अडकल्याची वार्ता पसरली. ही ज्युनियर फुटबॉल टीम आहे आणि त्यात कोण कोण आहे याचाही पत्ता लागला आणि तत्काळ शोधमोहिमेला आरंभ झाला.
हे काम अत्यंत कठीण होतं. गुहेतला पाणी भरल्या बिकट वाटेवरून नेमकं किती आत जावं लागेल आणि अडकलेले कोणत्या अवस्थेत असतील याचा अंदाज नसलेल्या पाणबुड्यांना (डायव्हर्सना) नेटाने शोधकार्य तडीस न्यायचं होतं. पुराचं पाणी ओसरण्याचं चिन्ह दिसेना. उलट ११ जुलैला आणखी धुवाधार पाऊस आणि पुराचं भाकीत तिथल्या हवामान खात्याने वर्तवलं. त्यामुळे त्याआधीच या फुटबॉलपटूंची सुटका होणं गरजेचं होतं. २३ जून ते २ जुलैपर्यंत या आतल्या मुलांचा जीव टांगणीला लागला होता. गुहेच्या अंतर्भागात तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका उंचवट्यावर सारे दाटीवाटीने बसले होते. या चुनखडीच्या (लाइम) गुहेतून ठिबकणारं पाणी पिऊन आणि गुहेत कोंडलेल्या हवेत गुदमरला श्वास घेत एकमेकांना धीर देत होते. जवळचे खाण्याचे पदार्थ तर कधीच संपले असणार. एका विचित्र कोंडीत हे तेरा जीव सुटकेची आशा बाळगून होते.
आता त्यांच्या सुटकेसाठी सारं जग एकवटलं. थायलंडमध्येच नव्हे तर जगभर प्रार्थना सुरू झाल्या. या घरच्या मुलांच्याइतकीच काळजी जगातल्या कोट्यवधी माणसांना लागली. जगातले निष्णात पाणबुडे थायलंडला पोचले. ब्रिटिश पाणबुड्यांना २ जुलैला या अडकलेल्या चमूचं दर्शन झालं आणि सुटकेची शाश्वती वाटू लागली. आपल्या महाराष्ट्रातील किर्लोस्कर पंपांसह मिरजेचे प्रसाद कुलकर्णीही थायलंडला धावले. पंपाने पाणी उपसण्याचं काम त्यांच्याकडे होतं. ते त्यांनी चोख पार पाडलं. अमेरिकेच्या कल्पक उद्योजक इलॉन मस्कने एक सुरक्षित कॅप्सूल या मुलांसाठी बनवली, पण पाणबुड्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ८ जुलैला पहिली चार मुलं सुखरूप बाहेर आली. त्यानंतर दुसर्याच दिवशी आणखी चार आणि १० जुलैपर्यंत सर्व तेरा जण १७ दिवसांचा थरार अनुभवून साक्षात मृत्यूच्या गुहेतून सहीसलामत बाहेर पडले. या मुलांच्या मनोधैर्याचं जेवढं कौतुक, तेवढंच जिवावर उदार होऊन त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करणार्या जगातील अनेक पाणबुड्यांचंही. प्रसाद कुलकर्णींसारख्यांच्या प्रयत्नांचाही आपल्याला अभिमान वाटायला हवा. यात एकच दुर्घटना घडली ती म्हणजे या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात थाई पाणबुड्या सामन कुनान याचा 5 जुलै रोजी मृत्यू झाला. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही गोष्ट सिद्ध करणार्या, माणसातलं माणूसपण जागवणार्या मोजक्या घटनांपैकी या सुटका नाट्याचा थरार कल्पितापेक्षा विस्मयकारी आहे. या सर्वांच्या सुटकेचा आनंद आहेच, पण सामन कुनानच्या बलिदानाचंही स्मरण असू द्यावं.























































