लेख : तंबाखूवर संपूर्ण बंदी होणार का?

>> प्रा. डॉ. प्रीतम गेडाम

तंबाखू आणि त्यापासून बनणारी इतर उत्पादने यांच्यापासून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. किंबहुना सरकारच्या उत्पन्नाचा हा एक मोठा स्रोत आहे. त्यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर सरसकट बंदी घालण्याची इच्छाशक्ती सरकारजवळ नसावी. खरे म्हणजे तंबाखूपासून सरकारला जेवढे उत्पन्न मिळते त्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारांवर खर्च होते हे लक्षात घेतले पाहिजे. शासनाने जर तंबाखूवर संपूर्ण बंदी घातली तर कॅन्सरसारख्या कित्येक गंभीर आजारांत 80-90 टक्के घट होईल.

व्यसन कोणत्याही अमली पदार्थाचे असो, शेवटी ते जीवनाला संपवण्याकरिताच असते. तंबाखू ही यापैकीच एक आहे. समाजात तंबाखू सहजपणे उपलब्ध होणारी गोष्ट आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच तंबाखूच्या आहारी गेलेले आढळतात. आपल्या राज्यात तर तंबाखूचा खर्रा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. तंबाखूचा भरपूर स्वरूपात वापर होतो, जसे की विडी, सिगारेट, गुटखा, खर्रा, हुक्का, चिलम व इतर. धूररहित तंबाखू- तंबाखूचे पान, पान मसाला, तंबाखू सुपारी चुन्याचं मिश्रण, मैनपुरी तंबाखू, मावा, खैनी, सनस, मशेरी, गुल, बज्जर, गुढाकू, क्रीम तंबाखू पावडर, तंबाखूयुक्त पाणी व इतर. आजच्या आधुनिक काळात हुक्का पार्लर खूप प्रचलित झाले आहेत. रेव्ह पार्टीच्या व इतर पार्टीच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणात युवकांद्वारे नशा केली जाते.

31 मे 1988 पासून हा दिवस विश्व तंबाखू निषेध दिवसाच्या रूपाने साजरा करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. याचा उद्देश म्हणजे तंबाखूचे दुष्परिणाम लोकांसमोर आणणे, जनजागृती करणे, लोकांच्या स्वास्थ्य समस्येकडे वैश्विक लक्ष वेधणे असा आहे. डब्ल्यूएचओद्वारे 31 मे 2008 ला सर्व प्रकारच्या तंबाखू उत्पादांच्या वस्तूंच्या जाहिरातींवर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. दरवर्षी हा तंबाखू निषेध दिवस एका नवीन विषयासोबत साजरा करण्यात येतो. तसेच आंतरराष्ट्रीय धूम्रपान निषेध आठवडा 25 ते 31 मेपर्यंत साजरा केला जातो.

तंबाखूच्या उपभोक्त्यांमध्ये जगात हिंदुस्थानचा दुसरा क्रमांक (27.5 कोटी लोकसंख्या) येतो. जगात दर 6 सेकंदाला एक मरण तंबाखूमुळे होते, एक सिगारेटमुळे जीवनातील 11 मिनिटे कमी होतात. हिंदुस्थानात रोज दोन हजार 739 लोक तंबाखूमुळे आपला जीव गमावतात. जगभरात 70 लाखांहून जास्त लोकसंख्या दरवर्षी तंबाखूमुळे आपले जीवन संपवतात. त्यातून कमीत कमी 10 लाखांपेक्षा जास्त लोक हिंदुस्थानातून दरवर्षी तंबाखूसंबंधित आजारामुळे मृत्युमुखी पडतात. ज्यात 72 टक्के लोक फक्त राजस्थान राज्याचे आहेत. 48 टक्के पुरुष व 20 टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूच्या बाजारात 48 टक्केवारी विडी, 38 टक्केवारी तंबाखू, 14 टक्के सिगारेट आहे. यात मृत्यूचे प्रमाण विडीमुळे जास्त वाढलेले दिसून येते. जे लोक सिगारेट, विडी पित नाहीत, पण त्याच्या विषारी धुराचा संपर्कात येतात ते लोकसुद्धा तंबाखूच्या दुष्परिणामाला मोठ्या संख्येने बळी पडतात. अशा कारणांमुळे शासनाला स्वास्थ्य सेवेवर जास्त निधी खर्च करावा लागतो. राजस्थानमध्ये सर्व प्रकारच्या तंबाखू उत्पादनांवर 65 टक्के कर आकारण्यात आलेला आहे. 2 ऑक्टोबर 2008 ला सार्वजनिक जागेवर धूम्रपान निषेध कायदा लागू करण्यात आला. शासनाने जर तंबाखूवर संपूर्ण बंदी घातली तर कॅन्सरसारख्या कित्येक गंभीर आजारांत 80-90 टक्के घट होईल.

तंबाखूमध्ये उत्तेजना व मादकता वाढविणारा मुख्य घटक निकोटिन असतो. हाच सर्वात जास्त घातक आहे आणि नायट्रोसामाईन्स, बेन्जोपायरिन्स, आर्सेनिक, क्रोमियम इतर विषारी तत्त्वे असतात. कॅन्सर उत्पन्न करणारी तत्त्वे या तंबाखूमधे असतात, त्याचे दुष्परिणाम  फुफ्फुस, तोंड, गळा, पोट, मुत्राशय, आतडे, यकृत व इतर अवयवांवर होतो. या प्रकारच्या गंभीर आजारांमुळे तंबाखूला ‘ए’ श्रेणीचा दर्जा प्राप्त झाला आहे. धूम्रपानामुळे वातावरणही प्रदुषित होते. या प्रदूषणाला जवळ जवळ 4 हजार प्रकारची रसायने हातभार लावतात.

तंबाखू आणि त्यापासून बनणारी इतर उत्पादने यांच्यापासून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. किंबहुना सरकारच्या उत्पन्नाचा हा एक मोठा स्रोत आहे. त्यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर सरसकट बंदी घालण्याची इच्छाशक्ती सरकारजवळ नसावी. खरे म्हणजे तंबाखूपासून सरकारला जेवढे उत्पन्न मिळते त्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारांवर खर्च होते हे लक्षात घेतले पाहिजे.

शासनातर्फे जिल्हा राज्य-राष्ट्रीय स्तरांवर तंबाखू नियंत्रण कार्यक्रम चालवले जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार व तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आयोजित केले जातात. शासनाने ‘सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन अधिनियम, 2003’ व ‘खाद्य सुरक्षा व मानक अधिनियम, 2006’ लागू केले आहेत. या शिवाय शैक्षणिक पाठय़क्रमात तंबाखूच्या दुष्प्रभावाबद्दल प्रचार केला पाहिजे. कॅन्सरपीडित पेशंटनी जेवणात ऍंटिऑक्सिडंटयुक्त फळे, भाज्या, फायबरयुक्त रेषेदार आहार, मोसमी फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. तंबाखूचे व्यसन सोडण्याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजबूत इच्छाशक्तीची गरज असते, निकोटिन च्युइंगगम, निकोटिन टॅब्लेटचा वापर तंबाखूची लत सोडवण्याकरिता डॉक्टरांच्या सल्ल्याद्वारे घेता येते. व्यसनाधीन मित्रमंडळींपासून दूर राहावे. नेहमी निर्व्यसनी लोकांच्या सहवासात राहावे. परिवार व मित्रांची साथ खूप गरजेचा असतो. नेहमी सकारात्मक विचार करावा व आपला वेळ योग्य ठिकाणी वापरावा. रोज योग, प्राणायाम, व्यायाम करावा, तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.

अर्थात शासनाने कितीही कर आकारले तरी व्यसनी व्यक्ती आपली सवय सोडत नाही. जोपर्यंत माणसाला स्वतःच्या जिवाची व आपल्या परिवाराची काळजी वाटणार नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार. म्हणून नशेच्या आहारी न जाता नेहमी त्यापासून दूरच राहावे व दुसऱ्यांनासुद्धा नशेच्या मुक्ततेसाठी परावृत्त करावे.

prit00786@gmail.com