
>> स्नेहा अजित चव्हाण
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱया दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोर्डाच्या मुंबई विभागाने हेल्पलाइन व नियंत्रण केंद्राची घोषणा केली आहे. विद्यार्थी, पालक किंवा इतर संबंधितांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यासोबत पालक -विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची हेल्पलाइन व समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत.
समुपदेशिका म्हणून माझी भूमिका विद्यार्थ्यांना भावनिक आधार देण्याची आणि त्यांना परीक्षेच्या दबावातून मार्गदर्शन करण्याची असते. योग्य नियोजन, मानसिक स्थैर्य आणि शारीरिक आरोग्य यांचा योग्य समन्वय साधल्यास परीक्षा एक सुखद अनुभव ठरू शकतो.
विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा आणि तणावाचा कालावधी असतो. या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. समुपदेशिका म्हणून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची जबाबदारी आमच्यावर असते.
तणावावर नियंत्रण कसे मिळवावे?
- अभ्यासाचे योग्य नियोजन ः वेळेचे व्यवस्थापन करून अभ्यासाची रूपरेषा तयार करावी. सततच्या अभ्यासाने दडपण येऊ नये यासाठी अधूनमधून छोटी विश्रांती घ्यावी.
- स्वतःवर विश्वास ठेवा ः स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नकारात्मक विचार दूर सारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
- योग आणि ध्यान ः ध्यान आणि श्वासोच्छ्वासाच्या तंत्राने मनःशांती मिळते. त्यामुळे अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येते.
- पर्यायी क्रियाकलाप ः सतत अभ्यास केल्याने मानसिक थकवा येतो. त्यामुळे मधून मधून चालणे, संगीत ऐकणे किंवा हलकी व्यायामाची सवय लावावी.
- कौटुंबिक व सामाजिक आधार ः विद्यार्थ्यांसाठी कुटुंबीयांनी आणि शिक्षकांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. आई-वडिलांनी मुलांच्या भावना समजून घेत सकारात्मक वातावरण तयार करावे. मानसिक आधार द्यावा. त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी संवाद साधावा.
- शारीरिक आरोग्याची काळजी ः संतुलित आहार घ्यावा. झटपट ऊर्जा देणारे पदार्थ टाळावेत.
- पर्याप्त झोप ः दररोज किमान 6-8 तासांची झोप आवश्यक आहे. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि अभ्यासात चांगली एकाग्रता राहते.
- पाणी प्या ः शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळते.