
>> दिलीप देशपांडे
पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे असे म्हटले जाते. अर्थात, त्यात सत्यता आहेत. कारण जगातील काही देशांची तर बहुतांशी अर्थव्यवस्थाच तेथील पर्यटनावर व त्यावर आधारित व्यवसायावर अवलंबून आहे. हिंदुस्थानसारख्या विकसनशील देशातील पर्यटनही गेल्या काही वर्षांत जवळपास 30 टक्क्यांनी वाढले आहे आणि त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनातही वाढ झाली आहे. या पर्यटनवाढीचे मुख्य कारण आहे त्या त्या देशातील, राज्यातील, निसर्गसंपन्न प्रदेश, इतिहासाच्या खुणा जपणारे ऐतिहासिक गड आणि किल्ले आणि तेथील स्थानिक संस्कृती, उंचसखल डोंगरदऱ्या, समृद्ध जंगले, अभयारण्य, निसर्गरम्य समुद्रकिनारे, वैशिष्टय़पूर्ण जैवविविधता, नद्या, धबधबे व खाडय़ा, छोटी-मोठी बेटे, गवतांचे गालिचे पसरलेली पठारे, पाण्याचे तलाव आणि धार्मिक स्थळे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते.
आपल्या राज्यात जसे अजिंठा, वेरूळ, गणपतीपुळे समुद्रकिनारा, कोकणातील निसर्गसौंदर्य, महाबळेश्वर, नेरळ- माथेरान आदी तसेच देशाचा विचार केला तर ताजमहाल आग्रा, मथुरा, वृंदावन, राजस्थान, मैसूर, उटी, कश्मीर असे खूप छान ठिकाणे आहेत. अशा पर्यटन स्थळी जाताना फक्त मौजमजा करायला जाण्याचा विचार न करता तेथील निसर्ग जाणून घेतला तर त्याचा खरा आस्वाद आणि आनंद आपल्याला घेता येतो. आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोहोचणार नाही व पर्यटन स्थळाची ठिकाणी स्वच्छता राहील, तेथील सौंदर्याची जपणूक होईल याची काळजी पर्यटकांनी घेतली पाहिजे. पर्यटन व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवायला हवे. आज आपण बघतो की, अनेक पर्यटन स्थळे धार्मिक ठिकाण आदी ठिकाणी अस्वच्छता असते. अर्थात त्याला कारण हे स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता हेच असते. त्याविषयी जागरूकता निर्माण होणे अत्यावश्यक आहे.
पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरूकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारू शकते. नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी यावे म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. आजही सिंगापूरचे उदाहरण समोर आहे.
दरवर्षी पर्यटन दिवस हा वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा केला जात असतो. त्यात अनेक महत्त्वाच्या बाबी येतात जसे सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वारसा, जागतिक शांतता, विकास, परस्पर संवाद, रोजगार निर्मिती, ग्रामीण विकास यांचा समावेश होतो.
प्रत्येक राज्यात पर्यटन विकास महामंडळ आहेत ते पर्यटन स्थळाची ठिकाणे पर्यटकांना सुखसोयी उपलब्ध करून देत असते. तसेच राज्य, देश, व परदेशातील पर्यटकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असते, मात्र त्यासाठी स्थानिक पातळीवर व पर्यटकांकडून योग्य तो प्रतिसादही आवश्यक असतो
महामंडळ स्वतः चालवत असलेल्या पर्यटक निवासाच्या आरक्षणावर व्यक्ती अथवा संस्थांना सवलत देण्यात येते. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार हंगामी व बिगर हंगामी सवलत देण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार सवलत 6 ते 16 वर्षे वयापर्यंत देण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार सवलत देण्यात येते. ज्या अपंग व्यक्तीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे अशा व्यक्तींसाठी सवलत देण्यात येते. हिंदुस्थानी सैन्यदलातील सेवानिवृत्त अथवा कार्यरत सैनिकांना प्रमाणपत्र व ओळखपत्राच्या आधारे सवलत देण्यात येते. सवलतीच्या दरात बदलही होत असतो. आता तर वाय-फाय इंटरनेट सेवाही दिली जाते.
पर्यटन उद्योगवाढीस लागावा म्हणून खासगी कंपन्यांकरिता चर्चासत्र, कल्याण कार्यक्रम, स्नेहसंमेलन याकरिता महामंडळाचे पर्यटक निवास आरक्षणात सवलत दिली जाते.
आता धार्मिक स्थळे तसेच पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहे. मानसिक ताण घालवून आनंद, समाधान मिळवण्यासाठी नियमांचे पालन करून पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात व आपल्या जीवनातला आनंद द्विगुणित करावा.




























































