लेख – पर्यटन उद्योगही भरारी घेईल!

652

>>  केतकी जोशी-काजरेकर

कोरोनाच्या महामारीने मानवजातीला मोठा हादरा दिला आहे. हिंदुस्थानातील अन्य उद्योगांप्रमाणेच देशाला मोठे उत्पन्न मिळवून देणारा आणि युवा पिढीला आत्मनिर्भर करणारा पर्यटन उद्योगही कोरोनामुळे व्हेंटिलेटरवर आहे. अर्थात पर्यटन उद्योगात करिअर करणार्‍या मराठी युवापिढीची जिद्द मात्र आजही कायम आहे. आज मरणासन्न अवस्थेत असणारा पर्यटन उद्योग पुन्हा जिद्दीने भरभराटीला आणू असा या वर्गाचा दृढ विश्वास आहे.

साधारण 7-8 वर्षांपूर्वी पर्यटन क्षेत्रामध्ये मी करिअरची सुरुवात केली आणि करिअरचा आलेख चढताच राहिला. थोडेफार  चढउतार आले,  पण तीच शिकण्याची आणि नविन अनुभव घेऊन पुढे जाण्याची जिद्द होती. जेव्हा पर्यटन क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा पैसा, ग्लॅमर, आकर्षण अगदी सगळं म्हणजे सगळं होतं आणि मुख्य म्हणजे या उद्योगाला मरण नाही असेच वाटत होते. तसं पाहिलं तर आव्हाने आणि संकटे पर्यटन क्षेत्राला नवीन नाहीत. अनेकदा ते अचानक समोर उभे ठाकत असतात आणि त्यातून वेळ निभावून नेत पुढे जायचे असते. त्यामुळे संकटांच्या दुष्टचक्रातून पर्यटन व्यवसाय नेहमीच स्वत:ला सावरत आला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर किंगफिशर, जेट एअरवेजचं बंद होणं, अनेक नामांकित ट्रॅव्हल एजन्सीचे बंद होणं, 250 वर्षे जुनी परंपरा असलेली आणि हिंदुस्थानातील टुरिझम क्षेत्रातील नामांकित अशी कॉक्स अँड किंग्स कंपनी अचानक बंद पडणं अशा अनेक वाईट गोष्टी घडत गेल्या. पण काहीतरी घडत गेले म्हणा किंवा घडले, या व्यवसायाने कायमच स्वत:ला सावरले आणि एकमेकांना मदतीचे हात देत हे क्षेत्र कोसळणार नाही याची काळजी घेतली. पण कोरोनासारखा एक व्हायरस येतो काय आणि इतर अनेक उद्योगांप्रमाणे पर्यटन उद्योगाचेही कंबरडे मोडतो काय, हे सगळंच भयानक आहे. पुन्हा हे कंबरडे मोडणेदेखील एवढे भयंकर आहे की, या व्यवसायातील लोकांच्या मनात दुर्दम्य विश्वासाचे बळ असूनही त्यांना उडणे शक्य होताना दिसत नाही.

नुकताच  मिलिंद बाबर यांचा लेख वाचनात आला. अतिशय उत्तम अशी उपमा त्यांनी सद्यस्थितीत अडकलेल्या पर्यटन क्षेत्राला दिली. ‘टुरिझम व्हेंटिलेटरवर आहे!’ या उद्योगाचा मीही एक भाग आहे आणि म्हणून मला हे मनाला लागले आहे.

सर्वात जास्त आणि प्राथमिकपणे जे क्षेत्र कोरोनामुळे उध्वस्त झालं आहे ते म्हणजे पर्यटन क्षेत्र. सध्याच्या परिास्थितीवरून या  क्षेत्रातल्या दिग्गजांचे असे भाकित आहे कि टुरिझम इंडस्ट्री ही जवळजवळ 8 ते 10 वर्षांनी मागे पडणार आहे. टुरिझम उद्योगाला लागलेली उतरती कळा मन हेलावून टाकत आहे. या भयंकर स्थितीत आपण निभावून नेऊ शकू का, अशी शंका या क्षेत्रातील बहुसंख्य लोकांच्या मनात कायम डोकावत आहे. एकवेळ कोरोनाबाधित व्यक्ती बरी तरी होत आहे, पण आमचे न येणारे पगार, घरखर्च, कर्ज, मुलांच्या शाळेच्या फी, आई-वडील, सासू-सासरे यांची जबाबदारी या सगळ्यांतून आम्ही कधी आणि कसे तरणार? या क्षेत्रातील नोकर्‍या शाबूत राहणार का, किती लोकांना रोजगार गमवावे लागणार असे अनेक प्रश्न आहेत,  ज्यांची उत्तरे तूर्त तरी कोणालाच माहिती नाहीत. सद्यकाळात सगळं फक्त ऑन पेपर आहे. प्रशासनाकडून, आपल्या  विभागामधून फोन किंवा मेल आला कि हृदयाचे ठोके वाढतात.

अनेक कंपन्या त्यांच्या स्टाफला सांगत आहेत की, त्यांना कामावरून काढत नाही, पण पुढील सूचना येईपर्यंत कामावर येऊ नका आणि आम्ही पगारही देऊ शकत नाही. जेव्हा अचानक आपल्याला असा फोन किंवा मेल किंवा मेसेज येतो तेव्हा काय करायचं त्या व्यक्तीने? एक विषाणू, जो डोळ्यांना दिसत नाही त्याने न जाणो किती लोकांच्या पोटावर पाय दिले  आहेत.

पर्यटन क्षेत्रात पाऊल टाकून अनेकांनी त्यांच्या स्वप्नांना भरारी दिली.त्या लोकांचे जणू पंखच छाटले गेले आहेत. कितीतरी लोकं त्यांच्या सहकाNयांना आर्थिक मदत करत आहेत. स्वत:चा पूर्ण पगार न मिळूनसुद्धा. यालाच माणुसकी म्हणतात!

हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीमध्ये सिहांचा वाटा असणारे पर्यटन क्षेत्र आणि त्याच क्षेत्राला सरकारकडून खारीएवढीही मदत मिळू नये, यासारखे दुर्दैव काय? पंतप्रधानांनी आत्मनिर्भर व्हा असे आवाहन केले, पण कशाच्या जोरावर? सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे की अगदी घरातले सगळे आम्ही केले. आत्मनिर्भर होऊन, पण हे करण्यासाठी जे आर्थिक बळ हवं आहे तेच मिळत नसेल तर लोक कसे आत्मनिर्भर होणार? शेवटी स्वदेशी वस्तू घेण्यासाठीही आर्थिक बळ हवेच. त्याशिवाय देश आत्मनिर्भर होण्यासाठी कशी मदत करता येणार?

पर्यटनच नव्हे तर सर्वच क्षेत्रात असलेल्या लोकांच्या मनातील हा संभ्रम आहे. या सगळ्या उलथापालथीचा मूळ कोरोना नावाचा एक विषाणू आहे. त्याने जणू आज प्रत्येकाचे जगणे नियंत्रित केलं आहे. त्याचा आपल्या आयुष्यावर किती काळ परिणाम होणार आहे हे अजून कोणीच सांगू शकत नाही. पण ज्या दिवशी या विषाणूवर मात होईल सगळ्यांचा जणू पुनर्जन्मच होईल. इतर उद्योगांप्रमाणे पर्यटन व्यवसायदेखील त्यानंतर भरारी घेऊ शकेल. या व्यवसायातील विसावलेली विमाने प्रवाशांना घेऊन पुन्हा उड्डाण करतील, वेगवेगळ्या प्रवासी टूर्सची लगबग सुरू होईल, हॉटेल आणि इतर अनुषंगिक व्यवसाय लॉक डाऊन काळात बसलेली धूळ झटकून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहतील. याच दिवसाची आज देशभरातील पर्यटन उद्योग आतुरतेने वाट बघत आहे. लोकांमध्येही पर्यटनाची उर्मी पुन्हा जागी व्हायलाच हवी. कारण अतिथी हेच पर्यटन उद्योगाचे देव आहेत.

कोरोनाची भयंकर साथ, त्यामुळे झालेले न भूतो लॉक डाऊन आणि त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही पडलेली कुर्‍हाड. या कठीण दिव्यातून तावूनसुलाखून निघालेला पर्यटन उद्योग आता स्वत:ला सावरत आहे, किमान मानसिकदृष्टया. आर्थिकदृष्टया सावरायला अद्याप वेळ आहे. त्यासाठी लॉक डाऊन उठून जनजीवन परत पूर्वपदावर यावे लागेल. ते  नेमके कधी होणार, त्याबद्दल आता काहीच सांगता येणार नाही, पण हे जेव्हा घडेल तेव्हा महाराष्ट्र आणि देशातील पर्यटन उद्योग नक्कीच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेईल, यात शंका नाही. हिंदुस्थानी पर्यटन क्षेत्र पुन्हा जोमाने उभे राहील आणि देशाला मोठे आर्थिक बळ मिळवून देईल. फक्त गरज आहे ती देशवासीयांच्या सहकार्याची.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या