
>> दिलीप जोशी ([email protected])
गेल्याच आठवडय़ात टीव्हीविषयी आणि त्याने घडविलेल्या तांत्रिक क्रांतीसंबंधी लिहिलं. आपल्याकडच्या टीव्ही प्रक्षेपणाला यंदा साठ वर्षे पूर्ण झाली आणि पुढच्या वर्षी जागतिक टीव्ही प्रक्षेपणाचा अमृत महोत्सव असेल. या पंच्याहत्तर वर्षांत टीव्हीने आपल्याला बरंच काही दिलं. सारं जग घरात आणलं. अत्यंत माहितीपूर्ण अशा अनेक गोष्टी घरबसल्या समजल्या. जाणिवांची क्षितिजं निःसंशय रुंदावली. अस्तंगत होत चाललेल्या पिढय़ांमधल्या, विस्मरणात जात असलेल्या अनेक नामवंतांचं केवळ दर्शनच घडवलं असं नाही, तर त्यांचे अनुभवाचे बोल पुढच्या पिढय़ांसाठी जतन करून ठेवले. ध्वनिमुद्रण आणि फिल्मचा शोध लागला तेव्हाच डॉक्युमेन्टेशन अस्सल स्वरूपात नोंदवता येऊ लागलं. आज ‘यू’टय़ूबवर त्यातल्या कितीतरी दुर्मिळ ध्वनी आणि चित्रफिती पाहायला मिळतात. त्या कुणीतरी, कधीतरी आठ, सोळा किंवा पस्तीस ‘एमएम’ फिल्मवर नोंदवलेल्या असतात. अथवा त्यांची निर्मिती टीव्हीच्या आरंभकाळात झालेली असते.
ध्वनिचित्र माध्यमाचं हे बलस्थान आणि त्याने केलेली अद्वितीय कामगिरी कधीच विसरता येणार नाही. या माध्यमांतले जसजसे बदल होत गेले तसतसा त्यांचा कल प्रेक्षकांना अधिकाधिक मनोरंजन देण्याकडे दिसू लागला. सुरुवातीला ते सहाजिकच होतं. या माध्यमांच्या प्रसाराच्या दृष्टीने ते आवश्यकही होतं. मात्र कालांतराने त्याचं प्रमाण अवास्तव वाढतंय असं जाणवू लागलं. दिवसभरातले तास-दोन तास मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्याचं सोपं साधन टीव्हीने आणलं हे खरंच. शिवाय हे मनोरंजन अत्यंत अल्प खर्चात होत असल्याने प्रेक्षकांच्या दृष्टीनेही सोयीचं होतं. एखाद्या विशिष्ट मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत रस्ते ओस पडतात इतकं त्यांच्या यशाचं कौतुक होऊ लागलं.
कालगती पुढे पुढे जातच असते. नित्यनवे शोध लागतच असतात. एकोणीसशे एWशीच्या दशकात कॉम्प्युटरने जगाचा ताबा घेतला. तशी त्याची सुरुवात एकोणीसशे साठच्या दशकातच झाली होती, पण तो घरोघरी डेस्क-टॉप आणि नंतर लॅपटॉप आणि पामटॉप इतक्या सहज उपलब्ध झाल्यावर त्याची व्याप्ती वाढली. त्यातच सेलफोनची (मोबाईल) क्रांती झाली आणि त्यात विलक्षण वेगाने होत गेलेल्या प्रगतीने सर्व प्रकारचं मनोरंजन आणि अर्थातच माहितीचाही खजिना अक्षरशः हाती आला. ‘सर्च वर्ड’ दिला की हवी ती माहिती उपलब्ध होऊ लागली आणि अनेक कामंही ऑनलाइन करता येऊ लागली हे वरदान इंटरनेट प्रणालीने दिलं आणि जगाच्या दोन टोकाची माणसं आमने-सामने व्हिडीओ फोनवर गप्पांमध्ये रंगायला लागली.
मग यात बिघडलं कुठे? असा प्रश्न सहजच मनात येईल. ते नेमके कुठे नि काय बिनसलं यावर जागतिक आरोग्य संघटनेनेच अभ्यासपूर्ण प्रकाश टाकलाय, म्हणून त्याची दखल घ्यायला हवी. डब्ल्यूएचओ किंवा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने गेल्या एप्रिलमध्ये जगातल्या टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या ‘व्हय़ूअर्स’ना आरोग्याच्या दृष्टीने सावध केलंय.
त्यात मुख्यत्वे लहान मुलांना टीव्हीचं ‘वेड’ लागण्याबाबतचं भाष्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एक वर्षाखालील मुलांना टीव्हीसमोर बसवूच नये आणि किमान पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना दिवसाकाठी एकच तास टीव्ही पाहू द्यावा. त्यांनी केवळ टीव्हीबाबत जे म्हटलंय ते सेलफोनबाबतही खरं आहे. आपलं वर्षभराचं मूल सेलफोन कसं वापरतं याचं कौतुक करणारे नवतरुण पालक अनेक असतात. त्या बाळाच्या कर्तृत्वावर बघेही खूश होतात. मूल किती बुद्धिमान आहे असं त्यातून भासवलं जातं, परंतु वर्षभरापर्यंतच्या मुलाना केवळ ‘गप्प’ बसवण्यासाठी टीव्ही लावून देणं आणि नैसर्गिक हालचालींपासून दूर ठेवणं पुढच्या आयुष्यात त्रासदायक ठरू शकतं असं ‘हू’ किंवा ‘डब्ल्यूएचओ’ला वाटतं.
ज्या वयात मुलांनी रांगायचं, धावायचं, घरात हुंदडून प्रत्येक गोष्टीत अत्यंत उत्सुकतेने डोकवायचं याला ‘उपद्व्याप’ न मानता मूल सुरक्षित राहील याची काळजी घेत त्याला भरपूर खेळ आणि धावपळ करू देणंचं त्याच्या भावी जीवनाच्या दृष्टीने इष्ट असतं. या काळात केलेली धावपळ त्याची शारीरिक चपळाई वाढवते, आरोग्य उत्तम ठेवते आणि उत्सुकता, स्वतः काहीतरी जाणून घेण्याची ऊर्मी जागवते. ‘तयार’ कार्यक्रम दाखवण्यात यातलं काहीच घडत नाही. अगदी गंमतीच्या खेळांचे किंवा कोडय़ांचे चित्रपट असले तरी ‘स्वतः काहीतरी करण्यापासून ती वंचित राहतात.
त्यापेक्षा जरा मोठी मुलं सारखी टीव्ही किंवा फोनवरच्या चलतचित्रांमध्ये गुंतून राहिली तर त्यांचे मैदानी खेळांचे जग उघडय़ा डोळय़ानी न्याहाळण्याचे, परिसराशी झाडापानांची ओळख करून घेण्याचं निवांत वय निघून जातं. पडद्यावरची फुलपाखरं पाहण्याऐवजी बाहेर गवतावर फुललेली फुलं आणि फुलपाखरं पाहण्यातला आनंद, वसंत ऋतूत झाडांना येणारी कोवळी पालवी म्हणजे काय, अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची संधी हुकते. याशिवाय पडद्यावरचे कार्यक्रम पाहता पाहता ‘जंक’ फूड खात राहिल्याने चलनवलनशून्य खादाडीने लठ्ठपणा किंवा तत्सम विचार नंतर सतावू शकतात. शरीर आणि मन खंबीर, निरोगी आणि खऱ्या अर्थाने ज्ञानसंपन्न करायचं तर बालवयातील विकास खऱ्या अर्थाने होतो आणि ही आरोग्यपुंजी पुढे आयुष्यभर उपयोगी पडते, असं हा अहवाल म्हणतो. तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याचा संयमित वापर करणं हे आपल्यावर अवलंबून आहे. गोष्ट तारतम्याची आहे. बालकांबाबत ही जबाबदारी पालकांची आहे आणि नंतर आपली स्वतःची.





























































