‘युनिटी’ची सात वर्षे!

2646

>>ज्योत्स्ना गाडगीळ

संगीत सभा अनेक होतात. कलाकार-श्रोते समोरासमोर येतात, परंतु त्यांच्यात संवाद घडणे आणि त्यातून शास्त्रीय संगीतात विधायक कामांची भर पडणे महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन ठाण्यातील कलाकारांनी `युनिटी’ दाखवत लागोपाठ सात वर्षे संगीत संमेलन गाजवले. त्याचाच हा वृत्तांत!

कोण म्हणतो, शास्त्रीय संगीताला चांगले दिवस राहिले नाहीत? सवाई गंधर्व महोत्सव, गुणीदास संगीत समारोह, तानसेन समारोह…एवढ्या दूर कशाला जाता? ठाण्यात दर वर्षी भरणारा `युनिटी’ संगीत समारोहच बघा ना! तीनही दिवस हाऊसफुल्ल जातात. घंटाळी येथील सहयोग मंदिर संगीत रसिकांनी आणि कलाकारांनी फुलून जाते आणि समारोह संपता संपताच पुढल्या वर्षीच्या समारोहाची विचारणा केली जाते. हे यश आहे, ठाण्यातल्या कलाकारांच्या `युनिटी’चे!

संगीतकार अनंत जोशी, निवेदिका धनश्री लेले आणि संगीत वाद्यविक्रेते शशांक दाबके ह्या त्रयींच्या संकल्पनेतून `युनिटी’चा जन्म झाला. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुमारास भरणारे हे तीन दिवसीय शास्त्रीय संगीतावर आधारित संगीत संमेलन म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी पर्वणीच! ठाण्यातील कलाकारांनी ठाण्यातील रसिकांसाठी आयोजित केलेले संगीत संमेलन अशीही त्याची व्याख्या करता येईल.

एकाच शहरातील अनेक कलाकारांचे `युनिट’ करण्याची `युनिक’ कल्पना कशी सुचली, असे विचारले असता शशांक दाबके म्हणतात, `ठाण्यात माझे संगीत वाद्यांचे दुकान आहे. ठाण्यातील सर्व कलाकार महिन्यातून एकदा वाद्यांची डागडुजी करण्यासाठी माझ्याकडे येतात. त्यामुळे जवळपास सर्व कलाकारांशी माझा परिचय होतो. मी आणि अनंत जोशी ह्यांनी मिळून शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ कलाकार पुरुषोत्तम वालावलकर ह्यांना ९० वर्षे आणि ज्येष्ठ तबलावादक पं. भाई गायतोंडे ह्यांना ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ठाण्याच्या सहयोग मंदिरात कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा ठाण्यातील सर्व कलाकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करून मानवंदना देण्यात आली होती. त्यांना पाहता आम्हा दोघांना जाणवले, की एकट्या ठाण्यात एवढे कलाकार असूनही त्यांचा परस्पर परिचय नाही. केवळ नावाने एकमेकांना ओळखणारे हे कलाकार काही ध्येय ठेवून एकत्र आले, तर संगीत क्षेत्रासाठी ते भरीव योगदान देऊ शकतील. बस्स! विचार पक्का झाला. धनश्री ताईला या संमेलनाची कल्पना दिली. तिनेही तत्काळ होकार दिला आणि अवघ्या सहा महिन्यांत आम्ही तिघांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले.’

अनंत जोशी सांगतात, `याआधी आम्ही सर्व कलाकारांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित केली होती. त्यामुळे कलाकारांची इत्थंभूत माहिती आमच्याकडे होती. त्या सर्वांना एकत्र बोलावून त्यांच्यासमोर आम्ही संमेलनाचा प्रस्ताव मांडला. सर्वांनी एकसुराने होकार दिला. विशेषत: महिलांनी हिरीरीने भाग घेतला. म्हणून ८ मार्च २०१३ रोजी `जागतिक महिला दिना’च्या दिवशी संमेलनाचा श्रीगणेशा केला. पं. भाई गायतोंडे ह्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ठाण्यात राहणारी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळीदेखील संमेलनास उपस्थित होती. रसिक श्रोत्यांनी सहयोग मंदिर गच्च भरले होते. सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पहिले संमेलन यशस्वी झाले आणि ते पुढे सुरू ठेवण्याचे बळ मिळाले. संमेलनामागचा नि:स्वार्थी हेतू, उत्तम संकल्पना आणि ठाण्यातील उत्कर्ष मंडळाने कार्यक्रमाचे स्वरूप आणि मायबाप रसिकांचा प्रतिसाद पाहता सहयोग मंदिराचा हॉल दरवर्षी विनामूल्य उपलब्ध करून दिला. त्यामुळे जागेचा मुख्य प्रश्न सुटला. यंदाही ८,९,१० मार्च रोजी भरलेल्या संमेलनात तेवढीच गर्दी आणि तेवढेच दर्दी बघायला मिळाले.’

संमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, ह्याचे भान सगळेच कलाकार ठेवतात. कमीत कमी वेळात आपले सादरीकरण करून झाले की सामंजस्याने दुसऱ्या कलाकारासाठी व्यासपीठ मोकळे करून देतात. ह्यातच त्यांची `युनिटी’ दिसून येते. संमेलनात एक सत्र युवा कलाकारांसाठीही राखीव ठेवलेले असते. कमीत कमी वेळात सर्व कलाकार आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून देतात. `युनिटी’च्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या अभंग, जुगलबंदी, गझलसारख्या संकल्पना आपल्या कलाकार मित्रपरिवारासह अन्य ठिकाणीही सादर करतात. युनिटीच्या व्यासपीठामुळे नवनवीन संधीची कवाडे आपल्यासाठी उघडत असल्याची कबुली सर्व कलाकार देतात. ह्या संमेलनातून कलाकारांना लोकाभिमुख होण्याची संधी मिळाली, कार्यक्रम मिळाले. अनेक कलाकारांनी एकत्र येऊन व्यक्तिगत संस्था स्थापन केल्या. नवीन कार्यक्रमांची सुरुवात केली. थोडक्यात, संगीत संमेलनाचा मुख्य हेतू साध्य होऊ लागला.

मागील सहा वर्षांमध्ये वाग्गेयकार, उपशास्त्रीय संगीत, बंदिशींची अंताक्षरी, जुगलबंदी, नाट्यसंगीताचे सवेश सादरीकरण, अभंग, गझल, ओडव-षाडव-संपूर्ण असे विषय संमेलनात ठेवण्यात आले होते. यंदाचे संमेलन `महिला दिना’च्या दिवशी सुरू झाल्यामुळे पहिल्या दिवशी `आभूषण’ हा विषय दिला होता. त्या दिवशी गायक मंडळींनी रागदारीत गुंफलेल्या बंदिशीतून आभूषणांचे मनोहारी रूप दाखवले. `बाजे मोरी पायल झनन झनन’, `लट उलझी सुलझा जा बालम, हाथों मे मेरे मेहंदी लगी है’, `करकन लागी मोरी चुनरी’, `ये जोबन मदमाती लचकत चाल चालत’ अशा बंदिशींनी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. दुसऱ्या दिवशी वाद्यांची, गायकांची जुगलबंदी रंगली. त्यात बासरी आणि गायन अशी अनोखी जुलगबंदी रसिकांना प्रथमच ऐकायला मिळाली. संमेलनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी `रंग’ हा विषय घेऊन शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतप्रकारांची रेलचेल होती. भावगीत, भक्तिगीत, कजरी, चैती, तराणा, बैठकीतली लावणी इ. साहित्य-संगीतातले `रंग’ ऐकायला मिळाले. त्यात गायिका उत्तरा चौसाळकर ह्यांनी एकतारीवर सादर केलेला `बाऊल’ हा बंगाली लोकसंगीतप्रकार आकर्षण बिंदू ठरला. तसेच ज्येष्ठ तबलावादक पं. सुधीर माईणकर ह्यांनी संमेलनात उपस्थिती दर्शवली.

अनेक कलाकारांना विविध स्तरांवर पुरस्कार, सन्मान मिळत असतात. संमेलनाच्या माध्यमातून वर्षभरात मिळालेल्या पुरस्कारांची उजळणी करून दिली जाते आणि `ठाणे म्युझिक फोरम’च्या वतीने त्यांचा पुन्हा सत्कार केला जातो. तसेच गायक-वादकांचे संगीत विषयावर एखादे पुस्तक किंवा नवीन सीडी प्रकाशित झालेली असल्यास त्याचेही पुन:प्रकाशन केले जाते. त्या सीडी विक्रीसाठीही ठेवल्या जातात. कलाकाराला सर्वतोपरी प्रसिद्धी मिळावी हा यामागचा मूळ उद्देश असतो. म्हणून युनिटीच्या जाहिरात पत्रकावरदेखील एक-दोघांच्या नावाचा उल्लेख न करता ६० कलाकारांची नावे कल्पकतेने जाहिरातीत गुंफलेली असतात. संमेलनाच्या निमित्ताने संगीतावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या क्षेत्रात मातब्बर असलेल्या ठाणेकर मंडळींचाही सन्मान केला जातो. तसेच योग्यरीतीने संगीताचा प्रचार-प्रसार करणाऱ्या व्याख्याता, पत्रकार, समीक्षकांचाही सत्कार केला जातो. आजवर ह्या संमेलनात सारंगीवादक पं. अनंत कुंटे, व्हायोलिनवादक आणि पत्रकार डॉ. आशा मंडपे, ज्येष्ठ तबलावादक पं. भाई गायतोंडे, `टाईमपास’चित्रपटासाठी `झी’ गौरव पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक चिनार महेश, `रेगे’ चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड घेणारे रोहित प्रधान, ज्येष्ठ निवेदिका वासंती वर्तक इ. मंडळींचा सत्कार करण्यात आला आहे.

`एकीचे बळ’ ही गोष्ट लहानपणी आपण ऐकलेली आहे. `युनिटी’च्या माध्यमातून ती अनुभवायलाही मिळत आहे. अशी `युनिटी’ प्रत्येक चांगल्या कार्यात दिसायला हवी. तसे झाल्यास अनेक चांगल्या गोष्टी समाजात घडू शकतात. ह्या संगीत संमेलनाच्या निमित्ताने ठाणेकरांनी नवीन पायंडा पाडला आहे, त्यांचा हा प्रयोग एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे `युनिटी’ घडून आली, तर ते ह्या संमेलनाचे फलित असेल.

युनिटीचे शिलेदार : विभावरी बांधवकर, कल्याणी साळुंके, हेमा उपासनी, स्वरांगी मराठे-काळे, दीपिका भिडे-भागवत, निषाद बाक्रे, अपूर्वा गोखले, मंदार वाळुस्कर, किशोर पांडे, पूजा आठवले-बाक्रे, यती भागवत, वेदश्री ओक, श्रिया सोंडूर, नूपुर गाडगीळ, प्राजक्ता जोशी, पुष्कराज जोशी, सुप्रिया मोडक-जोशी, सावनी काळे, मोहन पेंडसे, आदित्य पानवलकर, आदित्य ओक, सुहास चितळे, अनंत जोशी, उत्पल दत्त, पं. प्रकाश चिटणीस, विवेक सोनार, मुकुंद मराठे, संजय मराठे, प्राजक्ता मराठे, योगेश देशमुख, रघुनाथ फडके, पं. मुकुंदराज देव, उत्तरा चौसाळकर, रोहित देव, डॉ. दिलीप गायतोंडे, अथर्व कुलकर्णी, शिरीष पाटणकर, राकेश कुलकर्णी, धनश्री लेले, वासंती वर्तक, पं. शैलेश भागवत, पं. सुरेश बापट, विघ्नेश जोशी, सतेज करंदीकर, प्रणव शेंबेकर, अनघा शहा, अक्षय अभ्यंकर, आदित्य साधले, अवंती लेले, शर्वरी कुलकर्णी, सिद्धेश बिचोलकर, प्रतिमा टिळक, हर्षा बोडस, वरदा गोडबोले, श्रुती गोखले व विनायक सोमण.

आपली प्रतिक्रिया द्या