
>> रतिंद्र नाईक
आता अनलॉकसाठी आपले शासन अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलत आहे. पर्यटनस्थळे काही प्रमाणात सुरू झाली आहेत. सामान्यांचा उत्साह ओसंडतो आहे…
संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱया कोरोनाने गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकालाच घरात डांबून ठेवले. याचा फटका पर्यटनाला बसला असून फिरण्यासाठी बाहेर पडणाऱया पर्यटकांचा यंदा चांगलाच हिरमोड झाला. आता अनलॉकनंतर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे हळूहळू खुली होत आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून घरात अडकून पडलेल्या पर्यटनप्रेमींमध्ये उत्साह संचारला असून त्यांची पावले आपसूकच पर्यटनस्थळांकडे वळत आहेत. मात्र या स्थळांना भेटी देताना प्रत्येकालाच सजग राहावे लागणार असून स्वतःच्या सुरक्षेसाठी कोरोनाचे नियम पाळूनच भटकंती करणे हिताचे ठरणार आहे.
अनलॉकअंतर्गत नियम शिथिल करण्यात आल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळे हळूहळू बहरू लागली आहेत. लॉकडाऊनला कंटाळलेले पर्यटक विकेंडला व सुट्टय़ांमध्ये समुद्र किनारे, गडकिल्ले तसेच निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देण्यासाठी बाहेर पडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच पर्यटनस्थळे पूर्ण क्षमतेने खुली करण्यात आलेली नाहीत त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पर्यटकही गर्दी टाळत आहेत. यासाठी पर्यटकांचा ओघ जास्तीत जास्त मोकळ्या समुद्र किनाऱयांकडे दिसून येत आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल बंद तसेच सार्वजनिक बस वाहतुकीतील गर्दी पाहता पर्यटक बाहेर जाण्यासाठी खासगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत.
काय काळजी घ्याल
- प्रवासाला निघण्यापूर्वी गाडी सॅनिटाइझ करून घ्या.
- प्रवासासह पर्यटनस्थळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे.
- शक्यतो बाहेरचे पदार्थ टाळा, गरम पाणी प्या.
- सर्दी, ताप आणि खोकल्याची सौम्य लक्षणे जरी असतील तर घरीच थांबा.
- घरातून निघण्यापूर्वी मास्क लावणे अनिवार्य, सॅनिटाइझरही जवळ ठेवा.
- ट्रेकिंग करताना मास्कचा वापर नको, मास्कमुळे शरीराला ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता.
- समुद्रात आंघोळ केल्यानंतर चेंजिंग रूममध्ये कपडे बदलताना इतर ठिकाणी हात लागणार नाही याची काळजी घ्या, वाटल्यास सॅनिटायझर वापरा.
- घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करा.
गडकिल्ल्यांची भटकंती
लॉकडाऊनमुळे गिर्यारोहक तसेच दुर्गप्रेमींची अडचण झाली. शासनाकडून गडकिल्ल्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून अनेक ट्रेकर्स गडांवर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर काहींनी किल्ला आरोहणाला सुरुवात देखील केली आहे. परंतु या ठिकाणी जाण्यापूर्वी गडप्रेमींनी तेथील परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे. याशिवाय गर्दी नसेल अशा किल्ल्यांवर परवानगी घेऊन भेट देणे केव्हाही चांगले.
शहरातील मोकळी उद्याने
प्रत्येकालाच स्वतःचे वाहन घेऊन शहराबाहेर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या पर्यटकांना रिलॅक्स होण्यासाठी शहरातील मोकळी उद्यानेही मदत करू शकतात. मुंबईतील नॅशनल पार्क, तुंगारेश्वर, आरे कॉलनी या ठिकाणी घनदाट जंगलसह मैदाने आहेत. मुंबई शहराच्या वेशीजवळ असलेल्या या ठिकाणीही भेट देता येईल. तर लोणावळा, खंडाळा येथील थंडगार निसर्ग ठिकाणेही चांगला ऑप्शन ठरत आहेत.
फिरायला जाताना काळजी घ्या
अनेक महिन्यांनी फिरायला मिळणार या आनंदात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. प्रवासात अथवा पर्यटन ठिकाणी कोरोना तर नाही ना याची खात्री अगोदरच करून घ्यावी. कोरोनाच्या संसर्गामुळे ते पर्यटन स्थळ बंद आहे की सुरू आहे याची अगोदरच माहिती घ्यावी. तसेच पर्यटकांनी पर्यटन स्थळी भेट देताना काळजी घ्यायला हवी.
समुद्र पर्यटन
महाराष्ट्राला सुमारे 700 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. राज्यातील हे समुद्र किनारे वर्षाचे बाराही महिने पर्यटकांनी गजबजलेले असतात. अथांग निळाशार समुद्र आणि फेसाळणाऱया लाटांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. परंतु कोरोनामुळे गेले काही महिने हे किनारे पर्यटकांअभावी ओस पडले. आता मात्र पर्यटक या किनाऱयांवर दाखल होत आहेत. मुंबई, पुण्यातील पर्यटकांना अलिबाग, मुरुड हे किनारे जवळ असल्याने विकेंडला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते.




























































