दखल – साहित्यिकांच्या सहवासात

>> गणेश कदम

पूछते है वो की गालिब‘ कौन है

कोई बतलाये की हम बतलाये तो क्या… 

गालिब वाचला नसला तरी हा शेर किंवा यासारखे अनेक शेर अनेकांनी ऐकलेले असतात. त्यामुळं गालिब माहीतच नाही असं सहसा होत नाही. जागतिक किर्तीच्या आणि अव्वल दर्जाच्या या कवीबद्दल आजही प्रचंड कुतुहल आहे. अशा कवीचं घर एक उत्तम स्मारक म्हणून जपलं जायला हवं असं कुणालाही वाटेल. प्रत्यक्षात चित्र काय आहे…?

‘नवी दिल्लीतील  गालिबची हवेली एखाद्या खंडहरसारखी भासते. हवेलीच्या काही भागात अतिक्रमण झालं आहे. आजूबाजूच्या दाटीवाटीतून हवेलीचं प्रवेशद्वार शोधून काढावं लागतं. तिथं पर्यटकही तुरळक दिसतात…‘

उर्मिला चाकूरकर यांनी केलेली ही नोंद वाचून मनात कालवाकालव होते. तरीही गालिबची हवेली नेमकी आहे कशी? त्या हवेलीत काय आहे? याचं कुतुहल उरतंच. हे कुतुहल शमवण्याचं काम उर्मिला चाकूरकर यांचं ‘लेखकाचे घर‘ हे पुस्तक करतं. गालिबच नव्हे लिओ टॉलस्टॉय, नरहर कुरुंदकर, व्होल्गा, द. भि. कुलकर्णी, सितांशू यशश्चंद्र अशा अनेक साहित्यिकांच्या घरांचं शब्दचित्र लेखिकेनं या पुस्तकात रेखाटलं आहे.

पुस्तकात घरातील इतर गोष्टींबरोबरच लेखकाची बसण्याची खोली, लिखाणाची जागा याचे संदर्भ येतात. त्या जागांवरून चाकूरकर संबंधित लेखकांच्या मनोवस्थेचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, कन्नड साहित्यिक चिन्नस्वामी मूड्नाकुडू यांच्या घरातील त्यांची लिखाणाची खोली किंचित उंचीवर आहे. ते पाहून चाकूरकर त्या उंचीची तुलना लेखनाच्या खोलीशी करतात. रूढ संसाराची पातळी सोडून जरा वेगळ्या उंचीवर गेल्याशिवाय लेखनाला खोली प्राप्त होत नसावी कदाचित, असं त्या म्हणतात. अशाच प्रकारे इतर लेखकांची घर नेमकं काय सांगू पाहतात याचंही वर्णन पुस्तकात आहे.

मान्यवर साहित्यिकांच्या घरांची सैर घडवताना उर्मिला चाकूरकर त्या-त्या लेखकाविषयी, त्यांच्या साहित्याविषयी देखील चर्चा करतात. त्यामुळे अनेक लेखक, कवींच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच त्यांच्या वाड्मय निर्मितीविषयी आपल्याला वेगळी माहिती मिळते. त्यामुळंच कदाचित पुस्तकाचं शीर्षक अपूर्ण वाटतं. त्याऐवजी ते ‘साहित्यिकांच्या सहवासात‘ असं असतं तर अधिक व्यापक झालं असतं. अर्थात, त्यामुळं पुस्तकाचं साहित्यिक मूल्य कमी होत नाही. लोकवाड्मय गृहानं अत्यंत नेटक्या स्वरूपात हे पुस्तक समोर आणलं आहे. वाचनप्रेमींबरोबरच साहित्याच्या अभ्यासकांसाठी ते महत्त्वाचं आहे.