
>> प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर
चामोलीमधील दुर्घटनेने पुन्हा एकदा निसर्गातील मानवाच्या हस्तक्षेपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विकासाच्या प्रारूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिमालयातील उंच पर्वतमय परिसरात धरणे, जलवीजनिर्मिती प्रकल्प उभारू नयेत अशी सूचना यापूर्वीच अनेकदा तज्ञांनी केली आहे, पण राज्यकर्त्यांकडून अशा सूचना गांभीर्याने घेतल्या जात नसतील तर अशा आपत्ती थांबवणार कशा? आज जागतिक तापमानवाढीमुळे हिमकडे कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये चूक निसर्गाची नसून आपण निसर्गाशी चुकीच्या पद्धतीने वागत आहोत.
उत्तराखंडमधील चामोली जिह्यातील जोशीमठ येथील रैनी
गावातील डोंगरावरील नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून तो धौलीगंगा, अलकनंदा आणि ऋषिगंगा या नद्यांना मोठा पूर आला. ऋषिगंगा ही धौलीगंगाची उपनदी आहे. या महापुरात ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून तो वाहून गेला आहे. याचबरोबर तपोवन विष्णूगड प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानीही झाली आहे.
ऋषिगंगा धरणाची उंची नदीपात्राच्या उंचीपेक्षा 29 मीटरने जास्त होती. हे धरण धौलीगंगा नदीवर बांधले जात होते. या ऋषिगंगा प्रकल्पातून 63 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू होते. तपोवन विष्णूगड हा जलविद्युत प्रकल्पदेखील 70 टक्के पूर्ण झालेला होता. पण यातील जवळपास 60 टक्के बांधकाम वाहून गेलेले आहे. 2006 मध्ये बांधकामास सुरुवात झालेला हा प्रकल्प सुमारे 13,500 कोटी रुपयांचा आहे. 2013 मध्ये केदारनाथमध्ये जलप्रलय झाला होता. त्या जलप्रलयामुळेही हे प्रकल्प बाधित झाले होते, त्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही त्यातून आपण कोणताही धडा घेतला नाही ही वस्तुस्थिती आहे.
ही झाली दुर्घटनेची पार्श्वभूमी. पण ती का घडली? याचे मुख्य कारण आहे जागतिक तापमानवाढ. हिमकडे कोसळण्याचे प्रमाण तापमानवाढीमुळे विलक्षण प्रमाणात वाढत चालले आहे. येत्या काही दशकांमध्ये हे हिमकडे नामशेष होतील, अशी भीती शास्त्र्ाज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली असून त्यासंदर्भात इशारेही दिलेले आहेत. ध्रुव प्रदेशावरचा जवळपास 80 टक्के बर्फ आजमितीला वितळून संपुष्टात आला आहे. हिमालयामध्येही मोठय़ा प्रमाणावर हिमकडे आणि हिमनग वितळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
1975 ते 2000 या कालावधीत जागतिक तापमानवाढीमुळे जवळपास एकचतुर्थांश हिमनग वितळून गेले आहेत. पण 2000 सालानंतर अर्धा मीटर हिमकडे वितळून गेल्याचे दिसून आले आहे. आता दरवर्षी अर्धा मीटर हिमकडे वितळत आहेत. याचाच अर्थ ज्या गोष्टीसाठी पूर्वी 10-15 वर्षे लागत असत ते आता वर्षभरातच घडू लागले आहे. 2000 किलोमीटर लांबीच्या 650 हिमकडय़ांचा शास्त्र्ाज्ञांनी अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हिमकडय़ांचा 25 टक्के भाग 40 वर्षांत नष्ट झाला आहे. आता येणाऱया काही वर्षांनंतर हिमकडे इतिहासजमा होण्याची भीती आहे.
चामोलीमधील दुर्घटना असो किंवा मागील काळात पश्चिम महाराष्ट्रात आलेला महापूर असो; यामध्ये प्रचंड प्रमाणात राडारोडा, चिखल आलेला पाहायला मिळाला. याचे कारण काय? सध्या उत्तराखंडामध्ये चारधाम महामार्ग परियोजनेचे काम सुरू आहे. हा महामार्ग 900 किलोमीटरचा असून तो गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या परिसरातच गंगा, यमुना, अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांची उगमस्थाने आहेत. पर्यावरणशास्त्र्ा असे सांगते की नद्यांची उगमस्थाने बाधित करू नका. नदीच्या पात्रापासून किमान 25 किलोमीटर अंतरापर्यंत कसलीही बांधकामे केली जाऊ नयेत अथवा कसलेही प्रकल्प उभे केले जाऊ नयेत. ते आहे तसे नैसर्गिक स्थितीत ठेवा, परंतु आज आपण 25 किलोमीटरवरून पाच किलोमीटरपर्यंत आलो आहोत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी तर नदीच्या पात्रात प्रकल्प उभे केले जात आहेत. पर्यावरणशास्त्र्ााने इतके दाखले देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत आपण विकासाचा रेटा पुढे न्यायचा का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. नद्यांच्या उगमस्थानांवर प्रकल्प उभे केल्याने या उगमस्थानांना धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे या महामार्गासाठी 56 हजार वृक्ष तोडले जाणार आहेत. यापैकी 35 हजार वृक्ष आतापर्यंत नष्ट झाले आहेत. या भागात दगडाळ पर्वतही आहेत. तेथे ब्लास्टिंगचे काम सुरू आहे. 90 अंशांमध्ये पर्वत कापण्याचे काम सुरू आहे. आज अत्याधुनिक यंत्रसामग्रीने काही तासात निसर्गनिर्मित पर्वत खाली आणले जाताहेत. यातून तयार झालेला राडारोडा याच नद्यांमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे या चार नद्यांचे प्रवाहही खंडित झाले आहेत. याला आपण विकास म्हणायचा? सारांश, घडलेल्या दुर्घटनेबाबत निसर्गाला दोषी ठरवता येणार नाही. चूक निसर्गाची नसून आपण निसर्गाशी चुकीच्या पद्धतीने वागत आहोत. आज प्रत्येक शासनाला आपण कसा भरीव विकास केला हे दाखवायचे आहे. दुर्दैवाने लोकांच्याही तशाच अपेक्षा आहेत. त्यामुळेच एखादी दुर्घटना घडली की तेवढय़ापुरती चर्चा होते. काही दिवसांनी ‘ये रे माझ्या मागल्या…’ म्हणत निसर्गाचा नाश तसाच सुरू राहतो. पण हा नाश निसर्गाचा नसून तो मानवाच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे.
2000 ते 2016 या कालावधीत तापमान एक अंश सेल्सियसने वाढले आहे. जागतिक तापमान कमालीच्या वेगाने वाढत चालले असूनही त्याकडे कुणीही फारसे गांभीर्याने पाहत नाही. कार्बन शोषणाच्या मुद्दय़ावर आजही पराकोटीची अनास्था आहे. कार्बनडाय ऑक्साईड कमीत कमी प्रमाणात उत्सर्जित होईल याविषयीही फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. त्यामुळेच गेल्या 16 वर्षांत जागतिक तापमान 1 अंश सेल्सियसने वाढले आहे. आज हिमालयातच नव्हे तर आशिया खंडातील हिंदकुश पर्वत, तामीर पर्वत या पर्वतरांगेतील हिमकडे आणि हिमनद्याही प्रचंड वेगाने वितळू लागले आहेत. हे सर्व पाणी समुद्रात येत असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढत चालली आहे. जागतिक समुदायाने याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास पृथ्वीतलावरील 27 देश बुडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी या भागातील 80 कोटी लोकसंख्या हिमनद्यांवर अवलंबून आहे. हे लक्षात घेता या हिमनद्या अबाधित राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्या वितळून नष्ट झाल्या तर ही सर्व लोकसंख्या तर बाधित होणारच आहे, पण त्याचबरोबरीने हे प्रकल्पही मृत होणार आहेत. कारण तिथे पाणीच राहणार नाहीये. याबाबत वारंवार इशारे, सूचना देऊनही त्याबाबत ठोस उपाययोजना होत नाहीयेत, ही दुर्दैवाची बाब आहे.



























































