ठसा – वि. ह. भूमकर

1815

>> माधव डोळे

कट्टर हिंदुत्व आणि इतिहासाचा ध्यास घेतलेल्या ज्या अनेक व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेल्या त्यात ठाण्यातील वि. ह. भूमकर सरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. एका व्यक्तीमध्ये किती कला असाव्यात? इतिहासाचे गाढे अभ्यासक, व्याख्याते, क्रिकेट प्रशिक्षक, समाजसेवा, लेखन, काव्य, अनुवादक अशा अनेक कला भूमकर सरांमध्ये होत्या. ठाण्यातील अनेक घडामोडींचे ते साक्षीदार होते. ते मूळचे संभाजीनगरचे. हैदराबाद, परभणी आणि संभाजीनगरमध्ये त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड. शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये शिकत असताना त्यांनी क्रिकेटचा सराव केला. रितसर प्रशिक्षण घेतले. हैदराबाद संघातर्फे ते क्रिकेट खेळायचे. राज्यस्तरीय क्रिकेटपर्यंत ते जाऊन पोहोचले, दुर्दैवाने त्यांची संधी हुकली. मात्र निराश न होता त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक बनून आपली आवड जोपासली. नोकरीच्या निमित्ताने भूमकर सरांना फुलंब्री येथे जावे लागले. एकीकडे क्रिकेटची आवड आणि दुसरीकडे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. बी.ए., बी.एड.पर्यंत शिकल्यानंतर त्यांनी काही काळ मराठवाडय़ातच शिक्षक म्हणून नोकरीदेखील केली. मात्र अचानकपणे त्यांना मुंबई गाठावी लागली. चिंचपोकळीमधील एका शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. शिक्षकाची नोकरी करत असतानाच त्यांना छोटासा अपघात झाल्याने ठाणे ते मुंबई प्रवास करणे शक्य झाले नाही. अखेर त्यांनी मुंबईतील शाळेची नोकरी सोडून डोंबिवलीच्या धनाजी नाना संस्थेत काही काळ शिक्षकाचीच नोकरी केली. ठाण्यात नोकरीच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांचे येथील मातीशी आणि संस्कृतीशी नाते जोडले गेले ते कायमचे. ठाण्यातील शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम केले. इतिहास, नागरिकशास्त्र्ा व मराठी हे तीन विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. क्रिकेटचे प्रशिक्षण, शालेय अध्ययन या जबाबदाऱया पार पाडत असतानाच भूमकर सरांनी विविध विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय. त्याशिवाय समर्थ रामदास स्वामी, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस अशा अनेक व्यक्तिमत्त्वांवर त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत व्याख्याने देऊन सर्वांची मने जिंकली. मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल विभागाचेदेखील ते व्याख्याते होते. मुंबई विद्यापीठाने त्यांचा गौरवदेखील केला. व्याख्यानातून मिळणारे मानधन भूमकर सरांनी स्वतःकरिता न वापरता गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग केला. आदिवासी विद्यार्थ्यांकरिता त्यांनी दत्तक योजनादेखील राबवली. भूमकर सरांनी एक मिशन म्हणून आणि राष्ट्रभक्तीची चेतना तरुणांमध्ये जागवण्यासाठी विविध विषयांवर व्याख्याने दिली. दरवर्षी आपला वाढदिवस ते अनोख्या उपक्रमाने साजरा करायचे.  वाढदिवशी विविध संस्थांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी मदतीचा हात दिला. व्‘याख्यान देण्याबरोबरच इतिहासाचे अध्ययन आणि चिंतन हा त्यांचा आवडीचा विषय होता. घारापुरीची अक्षरशिल्पे, चंद्रशेखर आझाद, भटकंती, नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची गाजलेली पुस्तके. वेरुळ येथील अजिंठय़ाच्या जगप्रसिद्ध लेण्यांची त्यांना सखोल माहिती होती. काही काळ त्यांनी तेथे गाईड म्हणूनही काम केले. ‘घारापुरीची अक्षरशिल्पे’ या पुस्तकाला कवी कुसुमाग्रज यांची प्रस्तावना आहे. अनेक इंग्रजी कवितांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्यांनी लिहिलेल्या ‘गोफणगुंडा’ या गीतावर आधारित दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या चित्ररथावर नृत्य सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या चित्ररथाचा खास गौरव केला होता. भूमकर यांनी आकाशवाणी व दूरदर्शनसाठीदेखील लेखन केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण भूमकरांना मिळालेला ‘सर’ हा पुरस्कार सर्वाधिक मोलाचा ठरला. इतिहास जगणारा साधक ही त्यांची ओळख अजरामर राहील.

आपली प्रतिक्रिया द्या