
>> भगवान परळीकर
हिंदुत्ववादी विचारवंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक, भागवताचार्य ह.भ.प. वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांचे नुकतेच निधन झाले. पंढरपूरच्या इतिहासात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक, स्वर्गीय तात्या डिंगरे यांच्यासोबतच ह.भ.प. वा. ना. उत्पात यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण पंढरपूरच्या जडणघडणीत या लोकांचा मोठा सहभाग होता. पंढरपुरातील रुक्मिणी मातेची पूजा करणाऱया उत्पात घराण्यात 1 मे 1940 रोजी वा. ना. यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नारायणराव हेही रुक्मिणी मातेच्या मंदिरात भागवतावर प्रवचन करीत असत. वडिलांचा वारसा त्यांनी अखंडपणे चालू ठेवला. वा. ना. उत्पात हे गेली 33 वर्षे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत प्रवचने करीत होते. तसेच चातुर्मासात त्यांची ‘ज्ञानेश्वरी’वर प्रवचने अनेक वर्षे सुरू होती. वा. ना. उत्पात एक चांगले लोकप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. एमएची पदवी धारण केल्यानंतर त्यांनी सुमारे चाळीस वर्षांहून अधिक काळ कवठेकर प्रशाला, पंढरपूर येथे संस्कृत, मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे अध्यापन केले. संस्कृत व इंग्रजी हे विषय शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. शिक्षक प्रशिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी त्यांना नूतन मराठी प्रशालेत काम करण्याची संधी दिली. तिथेच त्यांच्या संतसाहित्याचे खऱया अर्थाने बीजारोपण झाले. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. पंढरपुरातील समाजकारण, राजकारण यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. पंढरपूर नगरपालिकेत ते पंचवीस वर्षे नगरसेवक आणि दोन वर्षे नगराध्यक्ष होते. अधिकारी आणि प्रशासनावर दरारा ठेवणारा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. त्यांचे गुरुवर्य श्री वरदानंदभारती म्हणजेच प.पू. अनंतरावजी आठवले यांच्या सहवासाने आणि आशीर्वादाने त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात खूप प्रगती केली. गीता, उपनिषदे, संस्कृत वाङ्मय, इतिहास व सावरकर वाङ्मय यांचे ते गाढे अभ्यासक होते. पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा व्हावा हे क्रांतिवीर वसंत बाबाजी बडवे यांचे स्वप्न होते. पंढरपूर येथे सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी त्यांनी पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळाची स्थापना केली आणि पुतळाही उभारला. पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळाची स्थापना करून भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांनी क्रांतिकारकाचे स्वप्न पूर्ण केले असेच म्हणावे लागेल. या वास्तूत सध्या पन्नास हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असलेले सावरकर वाचनालय वा. ना. उत्पात यांच्या अथक परिश्रमातून उभे राहिले आहे. त्यांनी आतापर्यंत 25 पुस्तके आणि शेकडो लेख लिहिले आहेत. त्यांना देवर्षी नारद पुरस्कार, महर्षी याज्ञवल्क्य पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, अलीकडेच मिळालेला नानासाहेब पेशवे पुरस्कार, लावणीचा रामजोशी पुरस्कार व सावरकर प्रतिष्ठान, पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. वा. ना. हे ज्येष्ठ पत्रकार होते. सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी समाजातील वाईट प्रवृत्तींवर परखडपणे आणि निर्भय वृत्तीने लिखाण करून अनेक प्रश्न मांडले. त्यांनी अनेक वर्षे ‘प्रहार’ हे साप्ताहिक चालविले. राजकारणातील अनेक प्रश्नांवर त्यांनी ‘प्रहार’मधून निर्भीडपणे लिखाण करून अनेकांचा रोष ओढवून घेतला. प्रसंगी टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असत. ‘श्री’ साप्ताहिकामधूनही वा. ना. उत्पात यांनी लिखाण केले. त्यांचे अनेक लेख राज्यभर गाजले होते. मुद्रण महर्षी मामाराव दाते यांचे ‘काळ’ हे वृत्तपत्रही त्यांनी अनेक वर्षे चालविले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे उत्पात यांचे दैवत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक ग्रंथसंपदा लिहून ठेवली. त्यांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सावरकर साहित्य संमेलनाची कल्पना त्यांनी मांडली आणि सन 1983 साली पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय बाळाराव सावरकर हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या साहित्य संमेलनामुळे सावरकरांची ग्रंथसंपदा साऱया हिंदुस्थानात पोहोचावी हा एकमेव उद्देश होता आणि तिथूनच सावरकरांच्या हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार खऱया अर्थाने सुरुवात झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 1992 मध्ये वा. ना. उत्पात यांची एकसष्टी कवठेकर प्रशालेत मानपत्र देऊन साजरी करण्यात आली. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला गेला, ‘‘तुम्ही देव आणि देशासाठी काम करता? काही कारणांनी देव किंवा देश असा प्रश्न निर्माण झाला तर काय कराल?’’ तेव्हा क्षणाचाही विलंब न करता वा. ना. म्हणाले होते, ‘‘देवापेक्षा देशासाठी काम करेन.’’ वा. ना. आयुष्यभर समाजासाठी झटले. रुक्मिणी मंदिरातील काकड आरतीपासून त्यांची दिनचर्या सुरू व्हायची ते सायंकाळी गजानन महाराज मठातील ‘ज्ञानेश्वरी’च्या पसायदानाने दिवस मावळायचा. परखड वत्ते, प्रभावी प्रवचनकार आणि हिंदुत्वनिष्ठ प्रखर राष्ट्राभिमानी म्हणून ते सदैव स्मरणात राहतील.























































