लेख – लसीकरण हाच उपाय

>> सीमा श्रीराम शास्त्री मोडक

कोणत्याही अफवांना बळी पडता शासनाच्या, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लस घ्या आणि सुरक्षित राहा. लस घेऊनही कोरोना झाला तरी त्याचे परिणाम अत्यल्प असतात. कोणत्याही गंभीर अवस्थेत जाण्याचे प्रमाण नगण्य असते. कारण लसीचे कवच आपण धारण केलेले असते.

संपूर्ण जगाला ज्याने घाबरवून सोडले आहे अशा या कोरोनाला  आपण कधी घाबरवून हद्दपार करायचं? कोरोनाचं असं झालंय की, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या कोरोनाने हिरावून घेतली आहे त्यांनी याचा धसका घेतला आहे. ज्यांना दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले, इंजेक्शनला, ऑक्सिजनसाठी जिवाचे रान करावे लागाले त्यांनाच कोरोनाचा कहर माहीत आहे, पण ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे आणि ज्यांना कोरोना झाल्यावर घरच्या घरी, फार त्रास न होता बरा झाला त्यांना कोरोना म्हणजे सर्दी, फ्लू, मलेरिया इतकं साधं वाटतं आणि ज्यांना कोरोना झालाच नाही किंवा नकळत होऊन गेला त्यांच्या दृष्टीने तर कोरोनाचं अस्तित्वच नाही.

डोळय़ांनी न दिसणाऱ्या गोष्टी अस्तित्वात नसतात का? मग हवा ही डोळय़ांनी दिसत नाही म्हणून तिचं अस्तित्व नाहीय का? सर्वशक्तिमान परमेश्वर दिसत नाही, तरी पण त्याचे अस्तित्व मानणारे आहेतच की. झाडाच्या मुळांना घातलेलं पाणी झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतं म्हणूनच झाड जिवंत राहतं, पण ते पाणी मुळं शोषून प्रत्येक भागापर्यंत पोहोचवताना आपल्याला दिसतं का? म्हणजेच झाड जगवायचं असेल तर झाडाच्या पानाफुलांची, फळांची काळजी घ्यावी लागतेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुळांनाच जर पाणी, खत दिलं तर ते आपोआप सगळय़ा झाडाचं अस्तित्व टिकवतं. झाड जिवंत राहतं. पाण्याबरोबर झाडाला ऊन, हवा, चांगली मातीही आवश्यक असते ना. मगच ते झाड अनेक वर्षे बहरत राहील.

अगदी याचप्रमाणे कोरोनापासून स्वतःला वाचविण्यासाठी सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण. लसीकरण म्हणजे झाडाचं पाणी आणि खत, पण याबरोबरच सूर्यप्रकाश, हवा, चांगली माती जशी गरजेची तसंच आपल्यासाठी लसीकरणाबरोबरच मास्क लावणं, हात वारंवार स्वच्छ धुणं, सोशल डिस्टस्टिंग राखणं खूप आवश्यक आहे. हे सगळं साधलं तर आपण प्रत्येक जण निरोगी जीवन दीर्घायु होऊन जगू.

‘उपचारांपेक्षा काळजी बरी’ हे अगदी योग्य आहे. कोरोना झाल्यावर बघू काय करायचं ते असं म्हणणाऱयांना काही वेळा कोरोना वेळही देत नाही. अनेक मोठय़ा लोकांना आपण मृत्यूला सामोरे जाताना पाहिलंय, ऐकलंय. ऑक्सिजन, इंजेक्शन्स, दवाखाना सगळय़ांची साथ असूनही वेळ मिळत नाही त्यांचे प्राण वाचवायला. मग पश्चात्तापाशिवाय आणि दुःखाशिवाय हातात काहीच राहत नाही. म्हणूनच अनेक डॉक्टर्स, शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून आपल्या सगळय़ांच्या जीवासाठी लस शोधली आहे. ती लस शासनाच्या मार्गदर्शनाने नक्की घ्या.

खूप लोकांचं म्हणणं असतं की, लस घेऊनही कोरोना होऊ शकतो मग लस का घ्यायची? काही म्हणतात, लस घेतल्यावर त्रास होतो मग ती का घ्यायची? सध्या महिलांनी लस केव्हा घ्यावी आणि केव्हा घेऊ नये याची बाष्कळ चर्चा होताना दिसते. मला वाटतं लस न घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही कारणं आहेत, जी मला वाटतं पूर्ण चुकीची आहेत. अहो, जेव्हा एखाद्या रोगावरची लस येते तेव्हा ती आज ठरवली आणि उद्या आली असं होत नाही. लस तयार करण्यासाठी त्यावर अनेक तज्ञ संशोधन करतात.

या सगळय़ा चाचण्या, प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच ती लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. आताच्या लसींचा प्रयोग मागील वर्षापासून सुरू होता. त्या लसीच्या सुरक्षिततेची खात्री तज्ञांना झाल्यानंतरच ही लस आपणापर्यंत पोहोचली आहे. त्या तज्ञांच्या बुद्धिमत्तेवर, कर्तृत्वावर शंका घेणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे मला वाटते. अहो पोलिओची लस आजही लहान मुलांना दिली जाते. जन्मजात बाळाला बीसीजीची लस आपण देतो. का तर त्याला टीबी होऊ नये. याचप्रमाणे कावीळ, गोवर, कांजण्या, धनुर्वात अशा अनेक लसी आपण लहान मुलांना देतो. अगदी तशीच ही कोरोनाची लस आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता शासनाच्या, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लस घ्या आणि सुरक्षित राहा. लस घेऊनही कोरोना झाला तरी त्याचे परिणाम अत्यल्प असतात. कोणत्याही गंभीर अवस्थेत जाण्याचे प्रमाण नगण्य असते. कारण लसीचे कवच आपण धारण केलेले असते. म्हणून कोरोना झाल्यावर धावपळ करून मानसिक तणाव घेण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून आधीच लसीकरणासाठी नोंद करा. शासनमान्य ठिकाणी जाऊन लस घ्याच. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला लस घेण्यासाठी आग्रह करा. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना तसेच आपल्या घरी कामाला येणाऱ्यांना, सगळय़ांना लसीचे महत्त्व सांगा. एकाने पाच व्यक्तींना तरी लस घेण्यासाठी तयार करा. मग बघा आपले शहर, जिल्हा, राज्य, देश कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. मला तर वाटतं, बीसीजी, कावीळ अशा रोगांप्रमाणेच कोरोनाची लसही आपल्याला भविष्यात घ्यावीच लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या