
माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन 12 भाविकांचा मृत्यू झाला. आपल्याकडे चेंगराचेंगरीच्या घटना तशा नवीन नाहीत. यापूर्वीही अनेक ठिकाणी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन, भाविकांना प्राण गमवावे लागले आहेत. एवढय़ा घटना घडूनही ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ होत नाही. आपल्या देशात आधीच कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यात ओमायक्रोन नावाच्या विषाणूने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना लोकांनी तिथे प्रत्यक्ष दर्शनाला जायचेच कशाला? घरी बसून देवाला मनोभावे हात जोडले तरी तुमची भावना अथवा नमस्कार पोहोचतो, हे जनतेला कधी कळणार? या चेंगराचेंगरीचे खरे कारण असे की, तिथे काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. हा सर्व प्रकार पाहून असे वाटते की, ही सुशिक्षित, सुसंस्कृत मंडळी देवाचे दर्शन घेण्यास येतात की भांडण आणि ढकलाढकली करायला? या भागात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 50 हजारांहून भाविकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी मनात असा प्रश्न उभा राहतो की, या गर्दीला परवानगी दिली कुणी? एवढय़ा मोठय़ा जमावाला आवरणे तेथील पोलिसांना कसे शक्य आहे? नित्याप्रमाणे या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. यातून आता दोषी व्यक्तींना नेमकी काय शिक्षा होणार, हे आता जनतेसमोर यायलाच हवे. कारण याबद्दल जनता नेहमीच अंधारात असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, एवढय़ा दुर्घटना घडून आपण त्याच्यापासून बोध कधी घेणार?
- गुरुनाथ वसंत मराठे


























































