ठसा – वसंत वळंजू

>> स्वप्नील साळसकर

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी झटणारे वसंत लक्ष्मण वळंजू यांनी नुकताच वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांनी अध्यापनाच्या काळात आणि निवृत्तीनंतर समाजासाठी केलेले कार्य हे न विसरता येण्यासारखेच आहे. सिंधुदुर्गात देवगड तालुक्यातील रेंबवली या छोटय़ाशा खेडेगावात राहणाऱ्या वळंजू सर यांनी संस्कृत भगवत्गीता जोडाक्षरविरहित  करून वाचकांना उपलब्ध करून दिली. अगदी पहिलीतील मुलगाही ती सहज वाचू लागला. यामुळे त्यांची ख्याती महाराष्ट्रभर पसरली.

वसंत लक्ष्मण वळंजू यांचा जन्म 1943 मध्ये रेंबवलीसारख्या छोटय़ा खेडेगावात झाला. कुटूंबात शिक्षणाला महत्त्व होते. त्यामळे त्यांचा पाया घरातच मजबूत झाला. शिक्षणच समाजाला घडवू शकते आणि म्हणूनच शिक्षकाची भूमिका त्यांनी स्वीकारली. कला शाखेतून त्यांनी एम. ए. ही पदवी घेतली. संस्कृत आणि हिंदी हे त्यांचे विशेष विषय होते. आणि अवघ्या 20 वर्षी अध्यापन करण्याची पहिली संधी त्यांना मिळाली व ते कणकवली तालुक्यातील कोळोशी-हडपीड विद्यालयात शिक्षक पदावर हजर झाले. शांत आणि प्रखर बुद्धिमत्ता या गुणांमुळे ते विद्यार्थीप्रिय बनले. या ठिकाणी त्यांच्या सेवेची 9 वर्षे पूर्ण झाली.

काही कारणाने ती नोकरी सोडून त्यांनी कणकवली शहरात पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान पुन्हा देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील विद्यालयात त्यांची निवड करण्यात आली. तेथेही त्यांनी वर्षभर नोकरी केली आणि मग ते रत्नागिरी पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे हिंदी आणि संस्कृत विषय त्यांनी उत्कृष्टपणे शिकवले. तेथे ते स्वामी स्वरूपानंद यांच्या सहवासात आले व त्यांना त्यांचा अनुग्रह मिळाला. त्या ठिकाणीही त्यांची 9 वर्षे सेवा झाली. त्या दरम्यान सरांनी  सिंधुदुर्गात बदली मागून घेतली. त्यांना शिक्षण विभागाने देवगड तालुक्यातील किंजवडे हायस्कूलमध्ये रुजू होण्यास सांगितले. किंजवडे आणि रेंबवली हे दोन्ही गाव तसे जवळ असल्याने त्यांना घरी येण्याजाण्यासाठी सोयीस्कर ठरले.

निवृत्तीनंतर सरांनी मिळालेली 75 हजारांची रक्कम धंतोली, नागपूर येथील रामकृष्ण मिशनला सुपूर्द केली. रामकृष्ण मिशनने त्यांनी दिलेल्या पैशातून गरीबांसाठी फिरता दवाखाना सुरू केला. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचं आराध्य दैवत होते. रामकृष्णांवरील साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तसेच रामायण, महाभारत, रामचरित मानस, ज्ञानेश्वरी, गीतारहस्य श्रीमद्भगवत यांसोबत स्वामी स्वरूपानंदांचं समग्र साहित्य आदी ग्रंथांचा त्यांचा अभ्यास वादातीत होता. श्रीमद्भगवद्गीता त्यांना मुखोद्गत होती आणि तिचं वाचन सर्वसामान्यांकडून निर्दोष पद्धतीने व्हावं म्हणून त्यांनी वसुदेव (वस्तुनिष्ठ सुधारित देवनागरी) लिपीचं शोधन केलं व त्यात गीता आणि रामरक्षा लिहिली.

संस्कृत भाषेत असणारी भगवत्गीता ‘व.सु.देव.’ लिपीमुळे जोडाक्षरविरहित झाली ती प्रकाशितही झाली. पहिलीतील मुलालाही ती संथा घेतलेल्या शिष्याप्रमाणे अस्खलितपणे सहज वाचता येऊ लागली. याच पद्धतीचा उपयोग करून मग आळंदी येथील अंधशाळेतील शिक्षकांनी ब्रेल आवृत्ती तयार केली. आणि ती श्रीमद्भगवद्गीता अंध मुलांनाही वाचता आली. सरांचा छंद शास्त्राचा अभ्यास होता. वळंजू सरांच्या जाण्याने गावाने एक जाणकार गमवला असून त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्य मात्र कायम स्मरणात राहणारे आहे. सरांचे विपुल लेखन अप्रकाशित स्वरूपात आहे. मग त्यात ओवीबद्ध रामचरित मानस, छंदोबद्ध रामायण, मराठी शुद्धलेखनावर संशोधन केलेला प्रबंध, शिशूवर्गासाठीची बडबडगीते, किशोरांसाठीच्या कथा, वजनदार गझल संग्रह, विपुल काव्यसंग्रह असतील, व्याकरणावरचे प्रबंध असतील, अशा नानाविध साहित्याचं भांडार सरांनी आपला नातू भार्गव, जो संस्कृत उच्चविद्याविभूषित आहे याच्याकडे सुपूर्द केले आहे, कारण भार्गवने तसा वारसा चालवण्याचे अभिवचन सरांना दिलेले आहे.