मुद्दा – अजेय सावरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश मधुकर साठवणे

विनायक  दामोदर सावरकर…हिंदुस्थानच्या इतिहासातले असे नाव की, ज्यांना मृत्यूनंतरदेखील हिंदुस्थानात अनेक वेदना सोसाव्या लागल्या. हिंदुस्थानातील नामांकित नेते आजही त्यांची सर्रास अवहेलना करतात. आता तुम्ही म्हणाल की, मी आज सावरकरांविषयी का बरं बोलत आहे? आज सावरकर जयंती नाही किंवा पुण्यतिथी! सावरकर असा विषय आहे की, त्याची व्याप्ती क्षितिजापलीकडची आहे, जिथे व्यक्तीच्या विचारांचीदेखील सीमा संपते, त्याच्याही पलीकडचा विचार करण्याची क्षमता सावरकरांच्या विचारांमध्ये आहे. अशा विचारवंताला हिणवणाऱ्या नेत्यांनी स्वतःच्या बुद्धीचे मापन करणे आवश्यक आहे.

अनेकांनी अनेक अंगांनी सावरकरांना वाचलं असेल किंवा समजलं असेल. हिंदुस्थानचा इतिहास, साहित्य, स्वातंत्र्याची चळवळ आणि धर्म यांसारख्या घटकांवर अगदी चिकित्सक व व्यावहारिक अभ्यास करत त्याची सडेतोड समीक्षा करणे व त्यावर परखडपणे आपले मत मांडणे सावरकरांनी शेवटपर्यंत सोडले नाही. जातीयवाद हिंदू समाजाला विघटित करणारा असून एकात्मतेला बाधक आहे. त्यामुळे ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू-बंधू’ ही भावना हिंदुस्थानींच्या मनात रुजावी यासाठी ते फक्त भाषणे देत फिरले नाहीत, तर प्रत्यक्षात हिंदू समाजाला एका हिंदुस्थानीत्वाच्या आणि हिंदुत्वाच्या पंगतीत बसवण्यासाठी स्वतः सेवा वस्तीत जाऊन आनंदाने तिथल्या लोकांसोबत ते भोजन करत. हिंदुस्थानात बोलघेवडे नेते खूप पाहायला मिळतात, पण एखादी गोष्ट कृतीत उतरवणारे बोटांवर मोजण्या इतकेच. बऱ्याच लोकांना स्पष्ट आणि परखडपणे बोलणारे लोक आवडत नाहीत, असा मानवी स्वभाव आहे आणि सावरकरांच्या विचारात स्पष्टोक्ती आणि परखडपणा होता. त्यांचा हा परखडपणा बऱ्याचदा त्यावेळच्या धर्मपंडितांनादेखील आवडला नाही. त्यांनीदेखील सावरकरांवर टीका केल्या, पण अखंड हिंदू समाज जातीपलीकडच्या सीमारेषा ओलांडून गुण्यागोविंदाने नांदावा अशी त्यांची मनीषा होती.

भारतमातेला परकीयांच्या दास्य शृंखलेतून मुक्त करण्यासाठी सेल्युलरचे काळे पाणी नीलकंठाप्रमाणे प्राशन करणे सहज शक्य नाही. अशा असंख्य वेदना झेलतानादेखील मुखातून भारतमातेसाठी जयोस्तुतेचे स्तवन त्यांनी थांबविले नाही. तरीही सावरकरांविषयी एवढा द्वेष का? हिंदुस्थानी समाज जातींच्या भिंती तोडून एक व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले हा त्यांचा दोष होता की ‘तुजसाठी मरण ते जनन,तुजविण जनन ते मरण’ असे म्हणत संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले ही त्यांची चूक होती? ज्यांनी आजपर्यंत सावरकरांची फक्त अवहेलना केली त्या लोकांनीसुद्धा या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. सावरकर विचारांची ज्वाला न विझणारी आहे. कारण सागराला दंड थोपटून आव्हान करणारे बाळकडू सावरकरांनी हिंदुस्थानी समाजाला पाजले आहे.