ठसा – कॉम्रेड विलास सोनवणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

परिवर्तनवादी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेला लढाऊ कार्यकर्ता, तत्त्ववेत्ता, मार्क्सवादी विचारक कॉम्रेड विलास सोनवणे यांचे नुकतेच निधन झाले. कॉ. सोनवणे हे मूळचे जळगाव जिह्यातील तामसवाडी गावचे. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा चळवळीत सक्रिय सहभाग होता. एसएफआय संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक सचिव होते. पहिल्यांदा सर्व धर्मातील ओबीसींची संघटना उभी करण्याचं काम त्यांनी केले. मुस्लिम ओबीसी चळवळीचे ते संस्थापक होते. डाऊ आंदोलन, सेझ विरोधी लढा, सर्वधर्मीय-सर्व पंथीय सामाजिक परिषद याचे ते संस्थापक होते. लढता लढता केलेल्या चिंतनातील काही, बहुजन स्रीवाद, मुस्लिम प्रश्नाची गुंतागुंत ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. विविध नियकालिकांमधूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश केला. ते ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या महाराष्ट्र शाखेचे संस्थापक सचिव होते. ‘सिद्धार्थ कॉलेज’ मुंबईच्या विद्यार्थी संघटनेचे पहिले कम्युनिस्ट विद्यार्थी सचिव म्हणून निवड झाली. ‘कॉम्रेड शरद पाटील’ यांच्यासोबत ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष’ स्थापनेत त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्रातील इतर असंख्य लढे-चळवळी-आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग होता. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ऍड. जनार्दन पाटील यांच्या सोबतीने मुस्लिम ओबीसी चळवळीची त्यांनी सुरुवात केली. देशातील मार्क्सवादी-लेनिनवादी, फुलेवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, जयप्रकाशवादी, लोहियावादी चळवळींतून थबकलेल्या कार्यकर्त्यांची संवाद प्रक्रिया सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. या संवाद प्रक्रियेतून ‘युवा भारत’ या संघटनेची स्थापना केली. वारकऱयांच्या सहकार्याने पुण्याजवळील डाऊ केमिकल्स कंपनीच्या विरोधात झालेल्या लढय़ाचे ते जनक होते. रायगडच्या सेझविरोधी लढय़ाच्या आधाराने देशभरातील सर्व सेझविरोधी लढय़ांच्या समन्वय समितीची स्थापना केली. त्यांनी साम्राज्यवाद विरोधी सर्वधर्मीय व सर्व पंथीय सामाजिक परिषदेची स्थापना केली.