
>>संजय मोने
साधारण साठच्या आसपास वर्षे झालीत, आम्ही एकमेकांना ओळखतो. खरं तर तो माझा मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तो ज्या लोकांच्या वर्तुळात वावरतो आणि ज्या वर्तुळात मी अजिबात नसतो, शिवाय तिथे इतर कोणी वावरू शकेल असं मला माझ्या त्याच्या वर्षांच्या परिचयामुळे वाटत नाही. विनय येडेकर नेमका कोण आहे? किंवा कोण कोण आहे? तर अनेक भूमिका निभावत आपला साधेपणा, सालसपणा जपणारा विनय!
वेळ साधारण ‘आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले’ इतकी, पण एकतारी घेऊन हल्ली कोणी दोहे गात नसल्यामुळे जग खरोखरच शांत झोपलेले. या वेळी समोरच्या घराच्या पटांगणातून एक गाडी हळुवारपणे निघते किंवा कधीतरी प्रवेश करते. त्या गाडीत विनय असतो… विनय येडेकर!
साधारण साठ एक वर्षं झालीत, आम्ही एकमेकांना ओळखतो. खरं तर तो माझा मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तो ज्या लोकांच्या वर्तुळात वावरतो आणि ज्या वर्तुळात मी अजिबात नसतो, शिवाय तिथे इतर कोणी वावरू शकेल असं मला माझ्या त्याच्या इतक्या वर्षांच्या परिचयामुळे वाटत नाही. विनय येडेकर नेमका कोण आहे? किंवा कोण कोण आहे? अभिनेता? आहे. क्रिकेटर ? होता? एक घरातला कर्ता पुरुष आहे? त्याचं कर्म इतकंच की, तो कुणाचाही पती होऊ शकला नाही आजपर्यंत. उत्तम मुलगा? आता त्याचे दोन्ही पालक या जगात नसल्यामुळे होता असंच म्हणायला हवं. पण आईला अभिमान वाटावा असा मुलगा होता तो. मदत करणारा? आहे. त्यात एक वैशिष्टय़ आहे. वेळेवर मदत करणारे बरेच आहेत, पण अवेळी मदत करणारा तोच आहे. अगदी निश्चित आहे.
माझ्या घरासमोर असलेल्या बेडेकर सदनमध्ये तो राहतो. आजही. आम्ही एकत्र शिकलो एकाच शाळेत. नंतर तो क्रिकेट खेळायला म्हणून दुसऱया शाळेत गेला. कारण आमच्या शाळेत क्रिकेटचा संघ वगैरे नव्हता. तशी आमची ताटातूट झाली, पण रोजची संध्याकाळ आमचीच असायची. हल्लीच्या मुलांना संध्याकाळी मैदानी खेळ खेळायचे असतात हेच माहीत नाहीये. आम्ही तुफान दंगामस्ती करायचो. विविध खेळ खेळायचो. त्यात क्रिकेटही असायचंच. शाळा बदलून तो दुसऱया शाळेत गेला होता. हळूहळू त्याचं नाव त्या काळातल्या क्रिकेट स्पर्धांमधल्या बातम्यांत यायला लागलं. मी त्या काळात शाकाहारी आणि तो कौटुंबिक मांसाहारी. जेवायला कधीतरी गेलो त्याच्याकडे, तो माझ्या घरी जेवायला यायची गरज नव्हती, तर त्याचे आई-वडील, बहीण, भाऊ सगळे कधीच ‘मांसाहार कर’ म्हणून मागे लागले नाहीत.
पुढे आम्ही शिकत शिकत (दोनदा ‘शिकत’ हा शब्द वापरला आहे, याचा अर्थ नापास न होता हे सुज्ञ वाचकांना कळलंच असेल. अर्थात सध्या सुज्ञ नसलेले वाचक उरलेच नाहीत असा त्या अज्ञात वाचकांचा आग्रह असतो). कॉलेजला गेलो. त्याआधी त्याच्यावर आणि त्याच्या घरावर फार मोठं संकट कोसळलं. त्याचा मोठा भाऊ, ज्याला आम्ही सगळेच ‘दादा’ म्हणायचो, तो एका अपघातात मृत्यू पावला. त्याचे वडील नुकतेच निवृत्त झाले होते. मोठय़ा बहिणीचं लग्न झालं होतं. सगळ्या घराची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यामुळे त्याला नोकरी करावी लागली. क्रिकेट उत्तम चालू होतं. तो मुंबईचा विभागीय कर्णधार झाला होता. नेमका त्याच वेळी एक विचित्र नियम अंमलात आला आणि तो एखाद वर्षच होता. नोकरी करणाऱया विद्यार्थ्यांना आंतरराज्य पातळीवर खेळता येणार नाही. नोकरी सोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे क्रिकेट सोडावं लागलं 20 व्या वर्षी. नोकरीच्या जोडीला त्याला फोटोग्राफी येत होती. तीही त्याने चालू ठेवली. बँकेतली नोकरी होती. त्यात त्याच्या सहकाऱयांनी त्याला मनापासून मदत करून फोटोग्राफी आणि नोकरी ही त्याची तारेवरची कसरत निभावून नेली. लहान असताना त्याने नाटकात उत्तम कामं केली होती, पण जबाबदारीमुळे त्याला ती आवड मागे टाकायला लागली. त्याच्या बँकेच्या क्रिकेट सामन्यांत तो खेळत असे. त्याचा अत्यंत जवळचा नातेवाईक हिंदुस्थानचा त्या काळातला सगळय़ात यशस्वी कर्णधार होता, पण त्याने कधीही त्याच्या नावाचा गैरफायदा घेतला नाही. अत्यंत मोठमोठे खेळाडू त्याच्या बँकेच्या संघात होते. तरीही तो त्या संघात असायचा. यातच त्या खेळातलं त्याचं नैपुण्य लक्षात येईल. त्याची कुणाशीही चटकन मैत्री होते. परदेशातून कोणी हिंदुस्थानात परत येत असेल त्या माणसाला त्या वेळी नेमकी विनयची आठवण होते. मग सुरुवातीला सांगितलं तसं तो लगेच गाडी घेऊन रात्री-बेरात्री त्या माणसाच्या मदतीला जायचा आणि या बदल्यात त्याला काय मिळायचं?
“आपल्याला काहीच नकोय. त्या माणसाला एवढा मोठा प्रवास करून आल्यावर पुन्हा विमानतळावर तास-दोन तास रखडायला लागलं नाही ना? बास! अजून काय पाहिजे?”
हे त्याचं ठरलेलं उत्तर.
“अरे पण, तुला रात्री-बेरात्री उठून दोन-तीन तास वाया घालवायला लागले त्याचं काय?”
या प्रश्नावर उत्तर म्हणून राष्ट्रभाषेचा आधार घेत तो म्हणतो,
“चलता है यार!”
हां, तर नाटक! त्याने मराठी, हिंदी, इंग्रजी तीनही भाषांत कामं केली आहेत. देशापरदेशांचे दौऱयानिमित्त प्रवास केले आहेत. चित्रपटात कामं केली आहेत.
त्याचा मित्रपरिवार काय आणि किती आहे ही तर थक्क करणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळेच मी एकदा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्याबरोबर जेवायला गेलो होतो. त्या लहान वयातही ती दोन्ही मुलं फार म्हणजे फारच प्रसिद्ध होती. पण विनय त्यांच्याबरोबर अत्यंत सलगीने गप्पा मारत होता.
त्याला कोण कोण नावाने ओळखतो याची यादी फारच लांबलचक होईल. मी त्याच्याबरोबर एका नाटकात काम केलं. मी ते नाटक लिहिलं होतं. लिखित भूमिकेच्या पलीकडे जाऊन त्याने उत्कृष्ट अभिनय केला होता. त्याआधी त्याने ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकात काम केलं होतं. शिवाय ‘हसत खेळत’ नावाच्या नाटकात तो होता. या तीनही नाटकांत त्या नाटकाच्या नायकापेक्षा त्याच्या कामाची प्रशंसा झाली होती. दोन नाटकांत त्याच्याबरोबर अशोक सराफ होते. अशोकमामांचं वैशिष्टय़ म्हणजे समोरच्याची भूमिका उत्कृष्ट होत असेल तर त्याला त्याचा वाटा घेऊ द्यायचा. हे असं करू देणं म्हणजे एक फार दुर्मीळ गोष्ट आहे. फार लोकांना नाही जमत. जॉनी लिव्हरसारखा कलाकार विनयला भेटला की, नुसता भेटत नाही, तर आवर्जून भेटतो. सचिन पिळगावकर, कै. सुधीर जोशी हे त्याचे खास परिचयातले. महम्मद अझरूद्दीनने त्याला एका सामन्याच्या वेळी बोलावून गप्पा मारल्या होत्या, असं त्या वेळी त्याच्याबरोबर असलेल्या आमच्या मित्राने थरारून सांगितलं होतं. बाकी मंत्री, मोठमोठे सरकारी अधिकारी काही वेळा तर चक्क मुख्यमंत्रीसुद्धा त्याला ओळख दाखवतात. अर्थात त्याला त्याचं काही फारसं वाटत नाही. आम्हीच उगा वेडगळासारखे बघत राहतो. कलाकारांसाठी त्या वेळी आरक्षित घरं मिळत असत. तेव्हा एका कलाकाराला तो थेट मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेला होता आणि त्या कलाकाराला चक्क घर मिळालं. विनय येडेकर मात्र अजून त्याच घरात राहतो. पावलं पूर्णपणे जमिनीवर ठेवून.
त्याचा पन्नासावा वाढदिवस होता. त्याला असंख्य मित्र आवर्जून जमले होते. तेंडुलकर, वेंगसरकर, गावस्कर हे होतेच, पण त्याच्याबरोबर खेळलेलेही मित्र त्याने आवर्जून बोलावले होते. त्या दिवशी त्या सगळय़ा ािढकेटर लोकांचे दोन संघ करून एक सामना खेळता आला असता. इतके इतके देदीप्यमान लोक होते की, त्या जागेत जर वीज गेली असती तरी लख्ख उजेड पडला असता. सध्या तो मस्त जगतो आहे. मालिका सुरू आहेत, चित्रपटाचं चित्रीकरण चालू आहे. नेमाने व्यायाम चालू असतो. त्यात कधीतरी खंड पडू शकेल, पण आजही रात्री-बेरात्री कुठल्यातरी कामासाठी त्याची गाडी मंदपणे बाहेर जात असते किंवा कुणाची तरी समस्या सोडवून परतत असते.
प्रामाणिकपणे सांगतो, आपल्याला बुवा इतका स्वतला त्रास घेऊन या वयात अशी मदत करायला नाही जमणार!
रेखाचित्र : संजय मिस्त्री
– [email protected]





























































