ठसा – विनायक जोशी

885

>> विकास काटदरे

इंदूर येथे गजानन महाराजाच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आटोपून डोंबिवलीत येत असताना भावगीत गायक विनायक जोशी यांचा हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले. ही बातमी डोंबिवलीकरांना चटका लावणारी होती.  स्वरभावयात्रा, सरीवर सरी, बाबूल मोरा यासारख्या अनेक सांगीतिक कार्यक्रमाचे ते संकल्पक होते. शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांनी एस.के.अभ्यंकर यांच्याकडे  घेतले. संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांच्याकडे सुगम संगीत तर गझल गायन पंडित विजयसिंह चौहाण यांच्याकडे घेतले. विनायक जोशी अस्सल डोंबिवलीकर होते डोंबिवलीबद्दल त्यांना विलक्षण अभिमान होता.   बंक ऑफ इंडियामध्ये ते नोकरी करत होते व वर्षभरात ते सेवानिवृत्त होणार होते. डोंबिवली चतुरंगचे किरण जोगळेकर याचेही असेच अचानक निधन झाले. त्यानंतर विनायक जोशींनी आपले संगीताचे विविध कार्यक्रम, नवीन नवीन संकल्पनांची तयारी, नोकरी हे सर्व सांभाळत डोंबिवली चतुरंगची धुरा सांभाळली. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचे विश्वस्त, चतुरंगचे ज्येष्ठ कार्यकर्ते आशा विविध संस्थांमध्ये ते कार्यरत होते. किरण जोगळेकर यांच्या अचानक निधनानंतर ती जबाबदारी त्यांनी कसली तक्रार न करता सांभाळली. येत्या जुलै महिन्यात सुधीर फडके यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्त नव्या कार्यक्रमाची जुळवाजुळव त्यांनी सुरू केली होती, पण नियतीला ते मान्य नव्हते. संगीत हा त्यांचा विलक्षण जिव्हाळय़ाचा आणि प्रेमाचा विषय होता. त्यामुळे संगीत आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम यात ते सतत व्यग्र असत. त्याशिवाय त्यांना दुसरे ‘मिशन’ नव्हते असे म्हणणे योग्य ठरेल. त्यातूनच त्याचे सातत्याने प्रवास होत. कार्यक्रमाच्या तारखा व दगदगीचे वेळापत्रक ठरलेलेच असे. मात्र हे सर्व ते आनंदाने करत. सरीवर सरी, स्वरभावयात्रा, या कार्यक्रमाचे त्यांनी हजारो प्रयोग केले. अत्यंत शांत, संयमी, मृदू असा त्यांचा स्वभाव असल्याने मित्रवर्ग व त्यांच्या गाण्याचे चाहते मोठय़ा संख्येने होते. डोंबिवलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते त्या निमित्त गीत तयार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. ‘स्वरभावयात्रा’ हे त्याचे पुस्तक तर खूप गाजले होते. विनायक जोशी स्वतः अप्रतिम गायक होते. नवीन प्रयोगाबाबत ते नेहमी मेहनत करायचे. ते खऱया अर्थाने कलाकार असल्याने नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा ते प्रयत्न करीत. बँकेसारख्या क्षेत्रात सेवेत असूनही  त्यांनी आपली कला जोपासली हे खरंच कौतुकास्पद आहे. बँकेच्या कामाशीदेखील त्यांची  शंभर टक्के बांधिलकी होती. संगीत, गायनाचे अनेक कार्यक्रम सातत्याने करूनही बँकेच्या दैनंदिन कामात त्यांनी काहीच कसूर केली नाही. उलट कॅशियरची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली. बँकेतील ग्राहकांशी प्रेमाने बोलणारा, वागणारा अशी त्यांची ओळख होती. कधी ग्राहक रागावले तर स्वतः शांत राहून ग्राहकांची समजूत ते सहज काढत असत. भावगीतावर प्रेम असणारा, अभ्यासू म्हणून त्याची ओळख करून देता येईल त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा होता. साधा सरळ निरलस स्वभाव. यामुळे मित्रवर्ग, पण सर्व क्षेत्रात होता. ‘बाबूल मोरा’ हे स्वर्गीय सैगल यांच्या संगीताची सफर घडवणारे पुस्तक अतिशय परिश्रमाने त्यांनी लिहिले. ‘बाबूल मोरा’ नावाचा गीताचा कार्यक्रमही त्यांनी सादर केला होता. गझल, भावगीत, चित्रपट गीत या सर्व प्रकारचा संशोधक वृत्तीने अभ्यास होता. संगीताच्या विविध प्रकारावर त्यांनी खूप लेखन केलेले आहे. डोंबिवलीतील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात ते अग्रेसर होते. त्यांच्या अचानक निधनामुळे डोंबिवलीच नव्हे तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या