
देवेंद्र वालावलकर <<z [email protected]>>
मराठी क कोंकणी साहित्यिक किश्वाप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही ज्येष्ठ साहित्यिक किष्णू काघ यांनी विशेष ठसा उमटवला होता. साहित्य क्षेत्रासह संगीत, नाटय़, चित्र, शिल्प आदी कलांमध्ये त्यांचे प्रभुत्क होते. मराठी राजभाषा व्हावी यासाठी ते आग्रही होते आणि याबाबत अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग असे. काव्यहोत्र कार्यक्रमाद्वारे त्यांच्यातील जिंदादिल कवीमन कायम दिसून आले.
कॉलेजच्या दुसऱया वर्षात असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा निरीक्षक म्हणून गोव्यात आलो होतो. वास्कोमध्ये बांदेकर यांच्या घरी बैठक होती. मी निरीक्षक असल्याने खुर्चीवर बसलो होतो आणि समोर मांडी घालून जे कार्यकर्ते किंवा समविचारी बसले होते त्यात विष्णू वाघ यांचा समावेश होता. वाघ यांची पहिली ओळख माझी त्या दिवशी झाली. त्यानंतर ती वाढत गेली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सगळी रूपे मी जवळून अनुभवली आहेत. त्यामुळे काल जेव्हा वाघ यांच्या निधनाची बातमी ऐकली तेव्हा धक्काच बसला.
विष्णू वाघ हे प्रचंड प्रतिभा असलेले व्यक्तिमत्त्व होते. अफाट विद्वत्ता, हजरजबाबीपणा आणि संवेदनशील वृत्तीमुळे वाघ यांना भेटणारा प्रत्येकजण त्यांच्या पहिल्याच भेटीत मित्र बनत असे. अंत्रुज महालातील डोंगरी गावात जन्मलेल्या वाघ यांनी विद्यार्थीदशेपासूनच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गोव्यात ते लोकप्रिय होतेच. शिवाय मराठी साहित्य आणि कला क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. 2012 मध्ये सांतआंद्रेसारख्या ख्रिश्चनबहुल मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून वाघ पहिल्याच वेळी आमदार झाले. कला आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्याकडे कला अकादमीचे अध्यक्षपद आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करणाऱया गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्षपद सोपवले गेले. दोन्ही जबाबदाऱया वाघ यांनी उत्तम रीतीने पेलून दाखवल्या. मध्यंतरी झालेल्या काही राजकीय मतभेदांमुळे त्यांनी आपली पदे सोडली. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना लाल दिवा असलेले उपसभापतीचे पद देऊन त्यांचा मान राखला गेला.
वाघ यांचा खरा पिंड कलाकार, कवी आणि साहित्यिकाचा होता. सध्याचे राजकारण त्यांना पचवता आले नाही. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली. काही काळ मगोमध्ये युवा संघटनेत प्राण फुंकण्याचे काम केल्यानंतर रवी नाईक यांच्याशी सूर जुळताच त्यांनी स्वतःला काँग्रेसमध्ये झोकून घेतले. मात्र जास्त काळ त्यांना काँग्रेस मानवली नाही. त्यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेनादेखील त्यांना जास्त काळ आपल्यासोबत ठेवू शकली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणून त्यांचा पक्षात जम बसेल असे सर्वकाही त्यांना उपलब्ध करून दिले. 2012 च्या सुमारास काँग्रेस सरकारविरोधात भाषा माध्यमाच्या प्रश्नावर जाहीरपणे वैर घेत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. पहिल्याच प्रयत्नात ते आमदार झाले. निवडून आल्यानंतर भाजपचे राजकारण त्यांच्या फारसे पचनी पडले नाही. मात्र याच काळात त्यांनी विविध पदे भूषवली आणि आपली छाप पाडली. 14 जानेवारी 2016 रोजी त्यांना विधानसभेचे उपसभापती करण्यात आले. त्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले असे वाटत असतानाच 15 मे रोजी एका कार्यक्रमात व्यस्त असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातून सावरत पुन्हा त्यांनी आपले काम सुरू केले होते, मात्र 14 ऑगस्ट रोजी त्यांना दुसरा झटका आला आणि ते अंथरुणाला खिळले.
आमदार म्हणून त्यांनी अनेक विषय पोटतिडकीने मांडले. मराठी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. मराठी अकादमीप्रश्नी तोडगा काढण्यासाठी वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीच्या अहवालामुळेच सरकारी मराठी अकादमी जन्मास आली होती. अनेकदा त्यांनी सरकारच्या चुकांवर बोट दाखवण्याचे धाडस दाखवले होते. त्याची किंमतदेखील त्यांना मोजावी लागली.
विष्णू वाघ हे सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी गद्यकाव्य, काव्य, एकांकिका, नाटक, कोकणी नाटक, चरित्रलेखन, अनुवाद अशा प्रकारात विपुल लेखन केले आहे. ‘तुका अभंग’ हे त्यांचे नाटक फार गाजले आणि वाजले. तुकाराम यांचा ब्राह्मणांनी खून केला असे त्याचे सूत्र होते. कला अकादमीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने ते नाटक मुंबईत गेले, मात्र तेथे त्यांना नाटकासाठी सेन्सॉर सर्टीफिकेट मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. नाटकाचा विषय वादग्रस्त असल्याने त्यांचे हे नाटक आजदेखील चर्चेत आहे.
वाघ यांनी साहित्य आणि राजकारणाबरोबर पत्रकारितेतदेखील आपला ठसा उमटवला. संपादक, व्यंगचित्रकार आणि विडंबनकार म्हणून पत्रकारितेमध्ये त्यांनी आपली छाप सोडली होती.
अध्यात्म क्षेत्रातदेखील वाघ यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. कुंडई येथील पद्मनाभ शिष्य संप्रदायात वाघ मध्यंतरी सक्रिय होते. तेथे त्यांच्या रसाळ वाणीतून ऐकायला मिळणाऱया प्रवचनांमुळे तपोभूमीत गुरुवारी प्रचंड गर्दी होत असे.
वाघ हे कलाकारांची खाण असलेल्या गोव्यात जन्मास आले आणि आपल्या कर्तृत्वाने जगभर परिचित झाले. वाघ यांची मित्रमंडळी जगभर पसरली आहेत. मित्रांची ऊठबस करण्यात ते कसलीच कमतरता ठेवत नसत. वाघ यांच्या अकाली जाण्याने गोव्याचे कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील अपरिमित नुकसान झाले आहेच. शिवाय त्यांचा मित्रपरिवार पोरका झाला आहे. वाघ हे आपल्या कार्याच्या रूपाने कायम जिवंत राहतील यात कसलीच शंका नाही.


























































