साहित्य जगत – अवघाचि विठ्ठल

>> रविप्रकाश कुलकर्णी

 हिंदुस्थान हा जगावेगळा देश आहे. इथे प्रत्येकाचे म्हणून एक वैशिष्टय़ आहेच. त्या सगळ्यांचे मोठेपण मान्य करूनसुद्धा महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि वारी यांचे वेगळेपण आणि मोठेपण अनन्यसाधारण असे आहे. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी यापैकी एका शुद्ध एकादशी दिवशी गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपूरला जातो तो पंढरपूरचा वारकरी व त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो वारकरी पंथ. अर्थात या पंथात कर्मकांडाला अजिबात प्राधान्य दिले नसून खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे…

काया-वाचा-मने। जिवे सर्वस्वे उदार।। 

बापरखुमादेवीवरू। विठ्ठलाचा वारीकर।।

त्यामुळे सगळ्याच संतांनी विठ्ठल प्रशस्ती भरभरून केली आहे.  ‘विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी’ या चोखोबांच्या वचनात अवघ्या वारकरी संप्रदायाचं वर्णन झालं असं म्हणता येईल.

भक्तजनांच्या मनात अखंड पंढरी निनादत असतेच. हे माहात्म्य तुकोबांनी सांगूनच टाकले आहे.

उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे।

ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे।

ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे।

तुका म्हणे आम्हां अनाथा कारणे

पंढरी निर्माण केली देवे।।

तर पंढरीची मोहिनी अशी आहे आणि त्याची सार्थकता काय आहे हे एकनाथांनी सांगितलं आहे…

कृपाळू उदार, उभा कटी ठेवूनी कर।

सर्व देवांचा हा देव, निवारी भेवकाळाचे। 

निघता शरण काया वाचा, चालवी त्याचा योगक्षेम।

दृढ वाचे वदती नाम, होय निष्काम संसारी।

एका जनार्दनी ठेवणे, खरे ते जाणे पंढरी।।

म्हणूनच सर्वसामान्यांना विठोबा आपला वाटतो.  केवळ लोकाश्रयावर अजूनपर्यंत टिकलेला आणि टिकून राहील असा हा एकमेव वारकरी संप्रदाय असं म्हणता येईल. संप्रदाय म्हटला की, त्याची म्हणून आचारसंहिता असतेच असते. त्याप्रमाणे वारकरी संप्रदायात चंद्रभागेचे स्नान, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध किंवा बुक्का, विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ हे नामस्मरण करणे अटळ समजले आहे. भक्ताला आपला माथा विठ्ठलचरणी टेकवून त्याला तृप्तीचा अनुभव देणारा हा एकमेव देव असावा. म्हणूनच तो सखा म्हणूनसुद्धा वाटतो!

त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे यदाकदाचीत यापैकी कुठल्या ना कुठल्या कारणाने काहीही करणं जमलं नाही तर भक्ताला मंदिराचे कळस दर्शन झाले तरी कृतार्थता लाभते. आपल्याप्रमाणेच विठ्ठलासाठी आलेला कुणी अपरिचित जरी असला तरी दोघे एकमेकांच्या चरणांना स्पर्श करून भक्तिभावाने नमस्कार करतात. आपल्यामध्येच विठ्ठल पाहणे हा विश्वास अपूर्व आहे. असे देवत्व दुसऱया कुठल्याही परंपरेत नसावे. असा हा एकमेव देव!

अशा या वारीबद्दल इतर लोकांनादेखील कुतूहल आहे. भले संपूर्ण वारी नाही करता आली तर निदान पुणे ते सासवड, वारीतील सर्वात मोठं अंतर – 32 किलोमीटर चालून वारी काय आहे याची झलक पाहता येते. वारीत रिंगण हा प्रकार, त्यामध्ये अश्वाची करामत ही चित्त थरारून टाकणारी आहे.

एरवी महाप्रचंड वारीमध्ये ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ प्रकाशन ही तशी अवघड गोष्ट असावी. मात्र अलीकडच्या काळात दरवर्षी आषाढी एकादशीला वारीमध्ये ‘रिंगण’ या वार्षिकाचे प्रकाशन होते. आजच्या संदर्भात गेल्या 700 वर्षांतील ‘संतांचा शोध’ या अंकातून घेतला जातो. कुठलाही समज-गैरसमज न ठेवता संतांच्या कामगिरीचा शोध या अंकातून घेतलेला दिसतो. संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत विसोबा खेचर, संत सावता माळी असे विशेषांक त्याची साक्ष आहेत. यंदाचा त्यांचा अंक संत सेना न्हावी यांच्यावर आहे. संत सेना म्हटलं की, ‘आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक’ अशासारख्या मोजक्याच अभंगांची आठवण येते, पण संपादक सचिन परब यांनी अथक मेहनत घेऊन संत सेनाचा जो धांडोळा घेतला आहे, त्यामुळे संत सेनासंबंधात अनेक नव्या गोष्टी उजेडात येतील.

रिंगणाच्या या कामगिरीमुळे कोणी सांगावं, वारीमध्ये नवा अभ्यास गट तयार होऊन आपल्या सांस्कृतिक जगाला नवे परिमाण लागू शकेल. आषाढी एकादशीचे हे देणंदेखील लक्षात राहावे. परंपरेला असे चांगले धुमारे फुटायलाच हवेत.