मुद्दा – पावसाचे अंदाज का चुकतात?

209

>> जयराम देवजी

पावसाच्या लहरीपणावर जितकी चर्चा होते, दुर्दैवाने तितकी चर्चा हवामान खात्याच्या लहरी अंदाजांच्या बाबतीत होताना दिसून येत नाही. हिंदुस्थानी शेती आणि हिंदुस्थानचे अर्थकारण अजूनही पावसावरच अवलंबून आहे. सामान्य माणसाला पावसाची प्रतीक्षा असतेच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रतीक्षा शेतकऱ्याला असते. त्यामुळे हवामान खात्याकडून वर्तवल्या जाणाऱया पावसाच्या अंदाजाकडे सर्वांचेच डोळे लागलेले असतात. मात्र गेल्या काही वर्षांत हवामान खात्याकडून वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज फसत चालले आहेत. त्यामुळे हवामान खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पावसासंदर्भात अनेकदा हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी अगोदरच काही तारखा जाहीर केलेल्या असतात. त्यामुळे या तारखा खऱया ठरविण्यासाठी मग आटापिटा केला जातो. मात्र अशातऱहेने घाईघाईने वर्तवल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱयांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल त्यांना काहीच देणेघेणे नसते. प्रसारमाध्यमांकडेही हवामान खात्याने जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजाची सत्यासत्यता तपासून पाहण्याचे कोणतेही परिमाण नसते. त्यामुळे हवामान खात्याकडून जी माहिती दिली जाते तीच सत्य मानून लोकांसमोर ठेवली जाते. साधारणपणे दिल्ली आणि पुणे या हवामान विभागांच्या कार्यालयांतून दिल्या जाणाऱया माहितीवरच प्रसारमाध्यमांची सारी भिस्त असते. यात फसगत मात्र बिचाऱया शेतकऱ्यांची होते कारण पावसावरच शेतकऱ्यांचे पीक लागवडीचे गणित असते. हे गणित चुकले की शेतकऱयांचे सर्व अर्थकारणच उलटेपालटे होते. त्यातून शेतकऱयाचा कर्जबाजारीपणा वाढून ते फेडता न आल्याने पुढे आत्महत्येत त्याची परिणती होते.

हाताशी आधुनिक उपकरणे असूनही हवामान खात्यातील तज्ञ व शास्त्र्ाज्ञ मोसमी पावसाविषयी अचूक माहिती का देऊ शकत नाहीत, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. विकसित देशांमध्ये हवामानाचा अंदाज चुकला तर शास्त्र्ाज्ञांना जाब विचारला जातो. त्यांच्याकडून भरपाई घेतली जाते. आपल्याकडे असे काही होत नसल्याने शास्त्र्ाज्ञही बेफिकीर झाले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हिंदुस्थानी हवामान खात्याच्या अचूक माहितीसाठी हवामान संशोधन केंद्र म्हणजेच आयआयटीएम (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) ही हवामान संशोधन करणारी संस्था कार्यरत आहे. मात्र या दोन्हींमध्ये समन्वयाचा अभाव आणि श्रेयवाद आहे. युरोप-अमेरिकेसारखे विकसित देश समशितोष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे तेथे हवामानाची माहिती अचूकपणे शक्य होते. हिंदुस्थान उष्ण कटिबंधात येत असल्याने काही अडचणी येतात असे कारण वर्षानुवर्षे सांगितले जात आहे. मात्र उष्ण कटिबंधात येणारा हिंदुस्थान हा एकमेव देश नाही. अमेरिकेसह आफ्रिका खंडातील अनेक देशांतील प्रदेश उष्ण कटिबंधात येतात. विशेष म्हणजे या प्रदेशांतदेखील तेथील हवामान विभागाकडून दर तासाला बिनचूक माहिती दिली जाते.

हवामानाची अचूकता हा मुद्दा व्यक्तिजीवनाशी जोडला जातो. बदलत्या हवामानाचे ‘वर्तमान’ तत्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्यावर हवामान खात्याची विश्वासार्हता अवलंबून असते. ही माहिती चुकली तर हवामान संशोधकांवर थेट न्यायालयातच खटले दाखल केले जातात. हवामान प्रमुखांना कारागृहात पाठवून त्यांच्या वेतनातून नुकसानभरपाई वसूल करण्याच्या घटना विदेशात घडल्या आहेत. विदेशात शेतकऱयांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा हवामानाचे ताजे वर्तमान त्यांच्या भ्रमणध्वनीवर कळवून त्याबाबतची दक्षता घेण्याबाबतची माहिती दिली जाते. हिंदुस्थानी हवामान खात्याकडून असे संभाव्य धोके आणि त्याबद्दलच्या सूचना तर दूरच, आत्मविश्वासाने हवामानाची अचूकता देण्याचे दायित्वदेखील निभावले जात नाही. हवामानविषयक मॉडेल ‘अपग्रेड’ होत असले तरीही त्यांचा वापर करून भाकीत वर्तवणारी माणसे मात्र तीच जुनाट आहेत. विदेशात हिंदुस्थानी हवामान संशोधकांची पाठ थोपटली जाते; परंतु हिंदुस्थानी हवामान खाते या संशोधकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यास मात्र तयार नाहीत.

हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यास शेतकरी महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी करीत असतो. मात्र पावसाने ओढ दिल्यास, पेरणी वाया गेल्यास यासाठी सर्वस्वी हवामान खाते जबाबदार आहे. नव्हे, तर हवामान विभाग आणि बी-बियाणे कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी अशी चुकीची माहिती प्रसारित करीत असल्याच्या संशयास पात्र असतील असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.

आपली प्रतिक्रिया द्या