विज्ञान रंजन – पक्षिणी सुस्वरे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

आकाशी झेप घेणाऱया, हवेवर डौलात तरंगणाऱया आणि क्षणात इकडे, क्षणात तिकडे अशी भुर्रर्रss भरारी मारणाऱ्या पक्ष्यांचे जग फार विलोभनीय असते. आपल्याकडे जगभरचे, विशेषतः पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातले लहान-मोठे पक्षी सध्याच्या थंडीच्या काळात येतात. साधारण नोव्हेंबरचा मध्य ते मार्चचा पहिला आठवडा आपल्याला थंडीचा वाटला तरी पक्ष्यांच्या दृष्टीने तो सुखावह ऊबदार उन्हाळा असतो. याच काळात त्यांचं मिलन, प्रजनन इत्यादी गोष्टी घडत असतात. त्यासाठी अतिशीत प्रदेश सोडून, हजारो किलोमीटरचा अवकाशी प्रवास करून त्यांची झेप योग्य ठिकाणाकडे होते.

आपले उपखंड नैसर्गिक वैविध्याने परिपूर्ण आहे. उत्तरेकडे हिमालयाची थंडी, राजस्थानात थर वाळवंटाचे चटके, पश्चिम घाटातली अद्वितीय वनसंपदा, प्रचंड मोठय़ा नद्या, विस्तृत सागर किनारा आणि हजारो पाणथळ जागा. वाचायलासुद्धा सारं कसं रम्य वाटतं ना! त्यावर आता सर्वंकष प्रदूषणाची काजळी धरतेय ही काळजीची गोष्ट आहेच. म्हणून तर फेब्रुवारीच्या मध्याला कधीकाळी कडाक्याची असणारी थंडी आता उकाडय़ात रूपांतरित होतेय.

…पण सवयीने आपले पाहुणे म्हणून आलेले काही पक्षी, खिडकीबाहेरच्या बऱयापैकी वनश्रीत, अगदी मुंबईतही दिसतात. पहाटे जाग आली की विविध पक्ष्यांचा कधी स्वतंत्र तर कधी एकत्रित गुंजारव कानी पडतोच. कदाचित आणखी महिनाभर तापमानातील चढ-उतार सहन करत ही मंडळी इथे राहतील आणि पुढच्या वर्षी याच काळात अगदी नेमाने येतील. माणसांसारखा कंटाळा त्यांना परवडणारा नाही. कारण एअरकंडिशन्ड घरटी त्यांना बनवता येत नाहीत. बाहेरच्या हवामानाच्या विसंगत म्हणजे कधी थंड तर कधी हिटर लावून घरातलं वातावरण त्यांना बदलता येत नाही.

मग नैसर्गिक प्रेरणेने त्यांचे थवेच्या थवे दूरच्या प्रवासाला निघतात. त्यांचा सामूहिक प्रवास वाऱयाचा वेग समजून घेत असतो. म्हणून ते अनेकदा इंग्लिश ‘व्ही’ आकाराची रचना करून शिस्तीत उडतात. त्यांचा लीडर त्यांना योग्य दिशेला नेतो.

पक्ष्यांची सर्वात मोहक गोष्ट म्हणजे विविध फुलांसारखे त्यांचे असंख्य रंग! प्राणीजगतातही रंग असतात. पण एकाच पक्ष्याच्या पिसाऱयात चार-पाच प्रकारचे रंग मनोहारी वाटतात. मोर हे त्यांचं उत्तम उदाहरण. या आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचा पिसारा किती शोभिवंत दिसतो ते या वर्षी पावसाच्या आरंभी एखाद्या माळरानात मोराचं बेभान नृत्य पाहायला मिळालं तर जरूर अनुभवा. आताही झाडांवर दिसणाऱया पक्ष्यांमध्ये अनेक रंगांचे पक्षी दिसतायत. अगदी छोटा सनबर्ड (सूर्यपक्षी) मंजूळ किलबिल करतो. वॅगटेल (धोबी) सतत शेपूट हलवतो. फॅनटेल (नाचण) पक्ष्याचा पिसारा पंख्यासारखा असतो. त्याचं पंखानृत्य पाहण्यासारखं.

पक्षी म्हटलं की ‘स्वर’ आलाच. तुकोबांनीही म्हटलंय, ‘पक्षिणी सुस्वरे आळविती…’ पक्ष्यांचं हे कुंजन वातावरण भारून टाकते. अगदी बारमाही पक्षी असलेल्या चिमण्या पहाटेच्या वेळी चिवचिवाट करतात किंवा सायंकाळी घरटय़ाकडे परतलेल्या कावळय़ांचा ‘काकरव’ होतो, तो वेळात वेळ काढून ऐकला पाहिजे. याशिवाय आपल्याकडे येणाऱया पक्ष्यांपैकी महत्त्वाचे ‘गाणारे’ पक्षी आहेत. बुलबुल, लार्क (चंडोल), रॉबिन (दयाल), मलबार थ्रश (कस्तुर), मैना, बॅब्लर (सातभाई), गोल्डन ओरिऑल (हळद्या), कॉपरस्मिथ (तांबट), वुडपेकर (सुतार) आणि सर्वात महत्त्वाचा कोकिळ. त्याविषयी सविस्तर माहिती चैत्राची चाहूल लागली की वसंत ऋतूमध्ये घेऊ.

…तर आपल्याकडचा मलबार थ्रश हुबेहूब माणसासारखी शिट्टी वाजवतो. म्हणून त्याला व्हिसलिंग थ्रश म्हणतात. बॅब्लर तसे कलकलाट करणारे पक्षी, चिमणी-कावळय़ांसारखेच. रोलर पक्षी तीक्र आवाज लावतो.

विविध पक्ष्यांचं गायन ही आपल्यासाठीची मैफल नसते तर ते त्यांचं मिलनगीत, संदेशवहन आणि सावधगिरीच्या संवादाचं गाणं असतं. वनानुभव घेताना हे सारे स्वर चहूबाजूंनी कानी पडतात. थंडीत एकदा तरी जवळच्या पक्षी अभयारण्यात जायला हवे. देशातली अशी बरीच अभयारण्ये अनुभवल्याने त्या स्मृतीही सुस्वर झाल्या आहेत.

आपल्याकडचा सर्वात मेलडिअस किंवा सुस्वर पक्षी कोकिळ (नर) असला तरी इतर पक्ष्यांचे स्वरही कान तृप्त करतात. ड्रोन्गो (कोतवाल) पक्षी तर इतर पक्ष्यांचे आवाज काढून त्यांची दिशाभूल करणारा मिष्किल पक्षी आहे.

पक्ष्यांच्या जगताविषयी माहिती घ्यायची तर आपल्याकडे दोन अरण्यऋषींनी लिहिलेली पुस्तके जरूर वाचायला हवीत. पहिले डॉ. सलीम अली आणि दुसरे मारुती चितमपल्ली. त्यांनी सारं आयुष्य वनसंशोधनात घालवलं. त्यातील प्राणी-पक्ष्यांची एरवी कुठे न मिळणारी माहिती नोंदवली. साधारण काऊ-चिऊ पलीकडे न जाणाऱया आपल्या पक्षी-जाणिवा समृद्ध केल्या. आपल्या देशात सुमारे 1200 ते 1300 प्रकारचे पक्षी आहेत. त्यात स्थलांतरित पक्ष्यांची भर घातली तर अधिकच. त्यांचे ‘सुस्वर’ कानामनात साठवायला हवेत. ही निसर्गाची देणगी विनाशुल्क आहे… म्हणून अमूल्यही!