
>> विनायक डी. पाटील
आज जागतिक दूध दिवस… 1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार सन 2001पासून संपूर्ण जगात दूध दिवस साजरा केला जात आहे. 1 जून 2001 रोजी पहिला दूध दिवस साजरा केला गेला. दूध दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करणे आणि वाढविणे असा आहे.
कोरोनाच्या कठीण प्रसंगी सहकारी संघांनी दूध खरेदी सुरू ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेत नियमित रोख प्रवाह यशस्वीरीत्या सुरू ठेवला आहे. आमच्या राजारामबापू दूध संघाने याही परिस्थितीत दूध उत्पादकांना योग्य दर देऊन दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून आरोग्यपूर्ण दूध व दुग्ध पदार्थांचा पुरवठा संघामार्फत सुरू ठेवला आहे. दूध संकलनापासून ते विक्रीपर्यंतची एकसंध अशी साखळी आहे ज्यायोगे दूध उत्पादकांच्या जनावरांच्या गोठय़ापासून ते ग्राहकांच्या हातात दूध व दुग्ध पदार्थ पोहोचेपर्यंत दूध व दुग्ध पदार्थांची योग्य ती हायजेनिक काळजी घेऊन वितरीत केले जात आहेत.
आज जगभरात मोठय़ा प्रमाणात दुधाचे उत्पादन होत आहे. हिंदुस्थानचे दूध उत्पादनात जागतिक स्तरावर वेगळे स्थान आहे. हिंदुस्थानचे मिल्क मॅन अशी ओळख असलेले वर्गीस कुरीयन हे हिंदुस्थानातील धवल क्रांतीचे जनक आहेत. अमूलच्या माध्यमातून त्यांनी देशात दुग्धक्रांती घडवली.
दूध उत्पादकांनी दुधाच्या उत्पादनाबाबत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी जागतिक दुग्ध दिन मानवी जेवणातील दुधाचे महत्त्व अधोरेखित करण्यास मदत करतो. जगभरातील कोटय़वधी दुग्धशाळांशिवाय सर्व दूध उत्पादकांसाठी हा दिवस साजरा करणेदेखील महत्त्वाचे आहे.
हिंदुस्थानातील दुग्ध व्यवसायाच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एनडीडीबीच्या माध्यमातून मिल्क मॅन वर्गीस कुरीयन यांनी ऑपरेशन फ्लड अंतर्गत देशात दुग्ध व्यवसायात धवल क्रांती घडवून आणली. हिंदुस्थानातील दुग्ध व्यवसाय हा 70 दशलक्षाहूनही अधिक दूध उत्पादक शेतकऱयांना सातत्याने पाठिंबा देत आहे. त्यापैकी बहुतांशी अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी असून ज्यांच्याकडे सरासरी दोन जनावरे आहेत त्यांना रोजगाराच्या कामाला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याचा अनुभव आहे. ग्रामीण स्तरावरील प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून हे दूध उत्पादक सहकारी दूध संघांना दूध पुरवठा करीत असतात. देशाची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन (एनसीडीएफआय) ही संस्था काम पाहते तर महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, महानंद ही संस्था महाराष्ट्रातील जिल्हा-तालुका सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून काम पाहते.
सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर दुग्ध व्यवसायावरदेखील इतर व्यवसायांसारखे बिकट दिवस आलेले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱयाला शेतात पिकविलेल्या मालास बाजारपेठ न मिळाल्याने कवडीमोल भावात माल विकावा लागला, शासनाने दुग्ध व्यवसाय हा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केल्याने दूध उत्पादकास थोडा दिलासा मिळाला. मात्र या परिस्थितीत संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया करून मार्केटमध्ये दूध व दुग्ध पदार्थांची विक्री करणाऱया सहकारी तसेच खाजगी दूध संघांवर याचा परिणाम झाला. मार्केटमध्ये पॅकिंग केलेल्या दुधास मागणी नसल्याने पॅकिंग दूध विक्रीत मोठी घट झाली आहे. मात्र सहकारी संस्था या दूध उत्पादकांचे दूध स्वीकरण्यास बांधील आहेत. त्यामुळे दुधाची मागणी कमी असतानाही सहकारी संस्थांकडून दूध खरेदी स्थिर राहिलेली आहे. अशा परिस्थितीत सहकारी दूध संघांकडील अतिरिक्त दुधाचे मूल्यावर्धित उत्पादनांमध्ये रूपांतरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दूध पावडर, लोणी इत्यादी मूल्यावर्धित उत्पादनांची विक्री ही एनसीडीएफआयच्या ई-मार्केट पोर्टलवरून इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. कोविड या साथीच्या आजारामुळे लागू केलेल्या वारंवारच्या लॉक डाऊनमुळे सहकारी संस्था तसेच संघांना विविध आव्हाने पेलावी लागत आहेत.
लोकनेते राजारामबापूंनी लावलेल्या इवल्याशा रोपटय़ाचा आज वटवृक्ष झालेला असून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संघाची घोडदौड सुरू आहे. या संघाचा चेअरमन म्हणून काम पाहताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ संघामार्फत सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱयांपर्यंत मला पोहोचविता आला याचा मला अभिमान आहे.



























































