लेख – संस्कृतीचा संग्रह!

>>दिलीप जोशी  

लेख लिहिण्यासाठी विचार करता करता लक्षात आलं की आजच जागतिक पुरातन वस्तुसंग्रहालय दिवस आहे. दरवर्षी ‘इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ म्युझियम्स’ या संस्थेतर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो आणि त्यातून जगभरच्या लोकांना, जगभरातील शेकडो पुराणवस्तू संग्रहालयांकडे जाण्याची प्रेरणा मिळते. त्यांची यावर्षीची ‘थीम’ किंवा ‘बोधवाक्य’ आहे ‘द फ्युचर ऑफ म्युझियम्स रिकव्हर अॅण्ड रिइमॅजिन.’ वस्तुसंग्रहालयाचं भवितव्य हे नवी उमेद आणि नव्या संकल्पांवर आधारित असावे, असा त्याचा साधारण अर्थ. खरोखरच म्युझियमला भेट देणं आणि तिथे काळाचा अक्षरशः मागोवा घेत त्यात हरवून जाणं यात अवर्णनीय आनंद तर असतोच, पण तिथल्या प्राचीन, दुर्मिळ वस्तूंची कहाणी रंजक भाषेत सांगणारे कुणी भेटले की आपण वर्तमान काळाचं भान विसरतो. वर्तमानाशी येऊन थांबणाऱ्या संस्कृतीचं दर्शन घडतं.

योगायोगाने मला गेल्या पंचेचाळीस वर्षांत असे मार्गदर्शक अनेकदा भेटले. माझ्या मागच्या पिढीतले ज्येष्ठ म्युझियम तज्ञ म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे त्यावेळचे प्रमुख सदाशिव गोरक्षकर. त्यांना भेटलो, तो अगदी तरुण पत्रकार असताना. त्यावेळी ‘म्युझिऑलॉजी’ हे म्युझियमविषयक स्वतंत्र शास्त्र किंवा अभ्यासक्रम असतो हेही मला ठाऊक नव्हतं. गोरक्षकरांनी अर्धा तास त्याबद्दल समजावून सांगितलं आणि वेळात वेळ काढून या म्युझियममधल्या अनेक महत्त्वाच्या वस्तू दाखवल्या… किंवा त्याचबरोबर त्यांचा इतिहासही सांगितला. अगदी सिंधुसंस्कृतीत वापरली जाणारी मातीची भांडी, बैलांच्या मूर्ती किंवा नंतरच्या कालखंडात वस्त्रप्रावरणात होत गेलेला बदल, वेगवेगळय़ा काळात वापरली गेलेली आयुधं आणि दागदागिने अशा कितीतरी गोष्टी विस्मयचकीत होऊन पाहिल्या.

नंतर लेखाचं काम संपलं तरी आमच्या ऑफिसच्या जवळच असलेल्या या म्युझियममध्ये मी अनेकदा गेलो. विविध ऐतिहासिक गोष्टींची सप्रमाण माहिती सातत्याने मिळत गेली त्यानंतरचा आणखी एक योगायोग म्हणजे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्यामुळे नागपूरच्या उमेश पवनकर या माझ्याच वयाच्या तरुणाची ओळख झाली. थोडय़ाच दिवसात तो ‘म्युझिऑलॉजी’ करून पुण्याच्या ‘राजा केळकर’ म्युझियममध्ये क्युरेटर (अभिरक्षक) म्हणून काम करू लागला. मग पुण्याला गेलं की त्या म्युझियममध्ये तासन् तास जायचे. त्यावेळी म्युझियमचे संस्थापक, संग्राहक दिनकरराव ऊर्फ काका केळकरही तिथे असायचे आणि या दुर्मिळ वस्तू त्यांनी किती कष्टाने जमवल्या त्याबद्दल सांगायचे.

त्यामुळे पुढे हिंदुस्थानभर फिरताना जवळचं म्युझियम आवर्जुन पाहायचं असं आपोआप घडायचं. केरळमधलं संग्रहालय, हैदराबादचं प्रसिद्ध सालारजंग संग्रहालय, भूजच्या किंवा राजस्थानातल्या राजवाडय़ांमधली संग्रहालयं असं खूप काही पाहता आलं. विविध संग्राहकांनी प्रयत्नपूर्वक जमवलेला इतिहासाचा ‘खजिना’ न्याहाळता आला. त्यात श्रीमंत राजेरजवाडे जसे होते तसेच पैठणच्या बाळासाहेब पाटील आणि पुण्याच्या केळकरांसारखे सामान्य लोकही होते. खरं तर जगातलं पहिलं म्युझियम 1677 मध्ये एलियस अॅशमोलियन यांच्या व्यक्तिगत संग्रहातून आकाराला आलं. ते इंग्लंमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात आहे. सध्या तिथे क्युरेटर (अभिरक्षक) म्हणून शैलेंद्र भंडारे हा मराठी तरुण कार्यरत आहे, असं मला मुंबईच्या ‘भाऊ दाजी लाड म्युझियम’च्या क्युरेटर आणि पुरातत्व संशोधक ऋता वाघमारे यांनी सांगितलं. या म्युझियमविषयी सांगताना त्या म्हणतात ‘1857 मध्ये एका छोटय़ा इमारतीत स्थापन झालेलं हे मुंबईतलं सर्वात जुनं म्युझियम. डॉ. भाऊ दाजी लाड यांनी इंग्रज अधिकाऱयांसमवेत त्याच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान दिलं म्हणून एकेकाळच्या या ‘अल्बर्ट’ म्युझियमला  भाऊ दाजींचंच नाव 1975 मध्ये देण्यात आलं! दरवर्षी आमच्या या म्युझियमला सुमारे 4 ते 5 लाख लोक भेट देतात. त्यात तरुणवर्ग मोठय़ा संख्येने असतो. इथली सर्वात जुनी वस्तू म्हणजे भाऊ दाजी आणि जॉर्ज बर्डवुड यांनी प्रयत्नपूर्वक इथे आणलेला घारापुरी (एलिफण्टा) बेटावरचा दगडी हत्ती. तो इंग्लंडला नेण्याचा बेत या दोघांच्या जागरूकतेमुळे फसला आणि आज तो इथे पाहायला मिळतो. ऋता यांनी म्युझियमसंबंधी खूप मोलाची माहिती दिली. त्यावर एक स्वतंत्र सविस्तर लेखन होऊ शकेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या