प्रासंगिक – योगाचे वाढलेले महत्त्व

>> विलास पंढरी

कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर योगाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सातवा योग  दिवस साजरा करण्यात येत आहे. कोरोना साथीमुळे गेल्या योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘घरी योग आणि कुटुंबासह योग’ अशी थीम जाहीर करण्यात आली होती व योग दिवस हा घरीच राहून कुटुंबीयांसोबत साजरा करा, असं आवाहन मोदींनी केलं होतं. कोरोनाचा कहर काहीसा कमी झाला असला तरी धोका कायम असल्याने यंदाही योग दिन घरूनच साजरा करायचा आहे.

आसन किंवा प्राणायाम यांनाच बऱयाच वेळेला योग समजले जाते. मात्र तसे नसून योगाची व्याप्ती ही त्यापलीकडे खूप मोठी आहे. योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे असे म्हणायला हरकत नाही. भगवद्गीतेनुसार योगाची ही परंपरा अनादी अशी असून स्वतः भगवान श्रीकृष्णांना ‘योगेश्वर’ असे म्हटले जाते. तरीही ते योगशास्त्राचे उद्गाते नव्हे, प्रणेते आहेत. आचार्य पतंजली हेदेखील योगशास्त्राचे उद्गाते नसून त्यांनी योगाला सुसूत्रतेने बांधण्याचे महत्कार्य केले आहे. आचार्य पतंजली योगाची व्याख्या करताना ‘योगस्तु चित्तवृत्तीनिरोधः।’ अशी करतात. थोडक्यात, आपल्या मनाला स्थिर करणे म्हणजे योग. ‘समत्वं योगमुच्यते।’ असे भगवद्गीता सांगते. सिद्धी आणि असिद्धी या दोहोंबाबत समान दृष्टी ठेवून कर्म करत राहणे म्हणजेच योग. याशिवाय ‘योगः कर्मसु कौशलम्।’ असेही भगवान श्रीकृष्ण म्हणतात. थोडक्यात, दैनंदिन वा नैमित्तिक कर्मांतही ती ईश्वरार्पित आहेत अशा दृष्टिकोनातून समत्व प्रस्थापित करणे हादेखील योगच आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग, हठयोग असे विविध योगमार्ग दिसून येतात ते योगाच्या याच सर्वव्याप्तीमुळे. सखोल विचार केल्यास योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला निरोगी ठेवते. सुश्रुतसंहितेत ‘अनागताबाधा प्रतिषेध’ नावाचा अध्याय आला आहे. अनागता बाधा म्हणजे अद्याप जी आलेली नाहीत अशी दुखणी/ विकार/आजार. या अध्यायात दिनचर्येचे सविस्तर वर्णन करून या ‘अद्याप न आलेल्या’ विकारांना दूर ठेवण्याचा मार्ग दाखवला आहे. ‘हेयं दुःखम् अनागतम्।’ असे सांगत असतानाच आचार्य पतंजली योगाची आरोग्यविषयक व्याप्ती दाखवतात. निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग असायला हवे; किंबहुना जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो तितका सहज योग आपल्यात भिनलेला हवा. मात्र योग केवळ आपल्या लौकिक आयुष्यातच उपयुक्त आहे असे नसून त्याचे प्रयोजन पारमार्थिक आहे. अन्य कोणत्याही हिंदुस्थानी शास्त्राप्रमाणेच ‘मोक्ष’ हेच योगाचेही अंतिम उद्दिष्ट आहे.

आयुर्वेदाप्रमाणेच योगाचीदेखील आठ अंगे आहेत. प्रत्यक्षात ही आठ अंगे नसून मोक्षप्राप्तीच्या दिशेने जाणाऱया आठ पायऱया आहेत. यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे बहिरंग योग आपल्या शरीराकडे अधिक लक्ष देतात. तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग योग मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहोचवतात. आसने आणि प्राणायाम यांपुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. हिंदुस्थानी तत्त्वज्ञानात षड्दर्शनाचे महत्त्व वादातीत आहे. योगाला स्वतंत्र दर्शन म्हणून दिलेली मान्यता मानवी जीवन सर्वार्थाने उच्च प्रतीचे बनवण्यासाठी योगाच्या योगदानाची असलेली साक्षच आहे. एखाद्या हिऱयाला पैलू पाडल्यावरच तो अनमोल होत असतो. योगशास्त्र मानवी जीवनाला पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवते. याकरताच प्रत्येकाने  रोजच नव्हे, तर प्रत्येक क्षणी ‘योगाभ्यासक’ बनायला हवे. 21 जून रोजी असणारा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ हा केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस न राहता आपल्या सगळ्यांची दैनंदिन योगाकडे वाटचाल घडवणारा ठरावा. जे अजूनही योगापासून  दूर आहेत त्यांनी आजच्या योगदिनाच्या निमित्ताने योगाशी जोडून घ्यायला हवे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढून जगभरात दुर्दैवाने सर्वाधिक  कोरोनाग्रस्त असलेल्या हिंदुस्थानला कोरोनाशी लढणे सोपे होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या