
>>प्रशांत गौतम<<
ज्येष्ठ दलित साहित्यिक, अभ्यासक, कवी, संशोधक, साक्षेपी समीक्षक प्रा. डॉ. परशुराम गिमेकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने भारावलेले एक अक्षरयात्री. प्रतिकूल परिस्थितीत संघर्षावर मात करीत त्यांनी शिक्षण घेतले. पदव्या प्राप्त केल्या. संशोधन आणि अध्यापनाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्दीसोबतच त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः कविता, समीक्षा, संशोधन क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले. काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. तेव्हा त्यांच्या कार्याचा समग्र आढावा घेणारा ‘कस्तुरी’ हा महागौरवग्रंथ प्रकाशित झाला, ज्याचे प्रकाशन 8 जुलै 2018 या दिवशी झाले. आता डॉ. गिमेकर यांच्या समग्र साहित्यावर, लेखन प्रवासावर नांदेड येथे 16 डिसेंबर रोजी एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. परशुराम गिमेकर यांचे मूळ गाव आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्हय़ातील पंधरा कि.मी. अंतरावर असलेले ‘गिम्मा’ होय. त्यावरून तेच आडनाव त्यांना मिळाले. गिम्मा हा शब्द तेलगू असल्याने त्यांच्या पूर्वजांचीही तेलगू हीच मातृभाषा राहिली. आजोबा, पणजोबा पुजारी असल्याने त्यांच्याकडे माहुरगडाची पूजा होती. डॉ. गिमेकर यांचे आजोबा नारायण बुवा आंध्रातून विदर्भात आणि विदर्भातून नांदेड जिल्हय़ातील उमरी येथे आले व स्थायिक झाले. त्यामुळे परशुराम यांचे बालपण, मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना नांदेड, उदगीर आणि संभाजीनगरात यावे लागले. काही वर्षे उदगीरला अध्यापन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून ते सेवानिवृत्त झाले. खरे तर गिमेकर यांच्या घरची कौटुंबिक स्थिती अतिसामान्य असली तरी शिक्षण घेण्याचा ध्यास मोठा होता. लेखन आणि वाचनाच्या अविरत ओढीने आवडीच्या क्षेत्रात दमदार प्रगती करीत राहिले. मूळ कविता हा प्रांत असलेल्या गिमेकर यांनी लोकसाहित्याच्या क्षेत्रात भरीव काम केले. दलितांचे लोकसाहित्य त्यांनी संकलित केले. आंबेडकरी ओवीगीतांचे त्यांनी संकलन केले. या सर्वच क्षेत्रातील लक्षणीय कार्याचा आढावा अनेक मान्यवर लेखकांनी ‘कस्तुरी’ या गौरवग्रंथातून घेतला आहे. जुलै महिन्यात ‘कस्तुरी’ हा गौरवगंथ प्रकाशित झाला आणि त्या निमित्ताने लेखकाचा संपूर्ण जीवनप्रवास साहित्यरसिक आणि जाणकारांसमोर आला. या ग्रंथात शंभरेक मान्यवर लेखकांनी गिमेकर यांच्या विविध लेखनपैलूंचा विस्ताराने आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांच्या साहित्य आणि लेखनप्रवासावर नांदेड येथे 16 डिसेंबर 2018 रोजी एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. शरद व्यवहारे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत परिसंवादातून प्रा. गिमेकरांच्या वडारवाडी काव्यसंग्रहाचा इंग्रजी अनुवाद ः आकलन आणि विश्लेषण, डॉ. गिमेकर यांची कविता ः आशय आणि अभिव्यक्ती, डॉ. गिमेकर यांचे समीक्षा लेखन, लोकसाहित्य ः संकलन आणि संशोधन यासारख्या विविध विषयांतून मान्यवर परिसंवादात सहभागी होत आहेत. संघर्षमय वाटचाल करीत असताना कविता, ओवीगीतांमुळे डॉ. गिमेकर यांना प्रेरणा मिळाली आणि या सर्वच प्रवासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे भारावलेपण लाभले.





























































