
संभाजी भोसले यांना सुप्रतिष्ठत ‘स्नेहांजली’ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण स्थळवर्णनाची पुन्हा एकदा आठवण झाली. ‘सफर ऐतिहासिक मुंबईची’, ‘सफर पुण्याची’ आणि ‘सफर अहमदनगरची’ ही त्यांची गाजलेली पुस्तके. या शहरांचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी आपल्या पुस्तकातून वाचकांच्या समोर मांडले आहे. या शहरांमधील विविध स्थळे आजही आपले ऐतिहासिक महत्त्व टिकवून आहेत. त्यांच्या नेमक्या कथा, तिथे घडलेल्या घडामोडी यांची तपशीलवार माहिती भोसले यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे. ‘सफर ऐतिहासिक मुंबईची’ हे त्यांचे पुस्तक विशेष रूपाने गाजले. मुंबईची जडणघडण, ती होण्यासाठी कार्यरत असणारे ब्रिटिश अधिकारी, त्यांनी केलेले अफाट कार्य आणि त्यामुळे आज उभी असलेली मुंबई या सगळ्याचे रसभरीत वर्णन संभाजी भोसले यांनी आपल्या पुस्तकात केलेले आहे. विशेषकरून दक्षिण मुंबईतील ठिकाणे आजही बघताना त्यांचे पुस्तक हातात घेऊन जर ती ठिकाणे बघितली तर आपण सहजगत्या इतिहासात रमून जातो. समोर उभ्या असलेल्या इमारतीचा 200 वर्षांपूर्वीचा इतिहास ज्ञात झाला की, ती इमारत अजून निराळी दिसू लागते असा अनेक वाचकांचा अनुभव आहे.
या पुस्तकाची मोहिनी वाचकांनाच पडली असे नव्हे, तर केंद्र सरकारच्या सेंटर फॉर कल्चरल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेलाही पडली. त्यांच्या ‘आर्किटेक्चरल क्विझ’ या उपक्रमासाठी त्यांनी संभाजी भोसले यांच्याकडून मुंबईतील 24 वारसास्थळांची माहिती लिहून घेतली. केंद्र सरकारकडून एक प्रकारे त्यांच्या कार्याला मिळालेली ही पोचपावतीच म्हणायला हवी.
24 ऑक्टोबर 1949 रोजी पुण्यात जन्मलेल्या संभाजी भोसले यांचे शालेय शिक्षण शिरूर इथे, तर महाविद्यालयीन शिक्षण बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स इथे पूर्ण झाले. कॉर्पोरेशन बँकेमध्ये नोकरी करताना त्यांनी वृत्तपत्रीय लिखाण सुरू केले. विविध वृत्तपत्रांतून आणि मासिकांतून त्यांचे लेख प्रकाशित झाले. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिकेतूनसुद्धा ते लिहू लागले. स्नेहल प्रकाशनाने त्यांची दोन पुस्तके प्रकाशित केली. एक होते ‘सफर ऐतिहासिक मुंबईची’ आणि दुसरे ‘सफर ऐतिहासिक पुण्याची.’ यातील मुंबईच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘श्रेष्ठता’ पुरस्कार मिळाला, तर पुण्याच्या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय ‘सफर नगरची’ या पुस्तकाला ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळाला आहे. अस्सल कागदपत्रांचा सखोल अभ्यास करणे, संदर्भ साहित्य वाचून त्यातून नेमके संदर्भ मिळवणे आणि ते अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांसमोर मांडणे ही संभाजी भोसले यांच्या लिखाणाची खासीयत आहे. एखादा निराळा विषय की, ज्याने इतिहासावर प्रभाव पाडला आहे, अशा विषयाचा अगदी मुळाशी जाऊन अभ्यास करून त्यानंतर त्यावर सविस्तर लिखाण भोसले यांनी केलेले आहे. उदाहरण द्यायचे तर पेशवाईच्या शेवटच्या काळात डॉ. कोट्स यांचे महत्त्व. 2002 सालच्या ‘लोकसत्ता’मध्ये भोसले यांनी ‘डॉ. थॉमस कोट्स-पुणेकरांचा देवदूत’ हा लेख प्रसिद्ध केला. सन 1797 ते 1817 या काळात डॉ. कोट्स पुण्यात होते. त्या काळात देवीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत असत. डॉ. कोट्स यांनी पेशवाईत देवी लसीकरणाची मोहीम मोठय़ा प्रमाणावर राबवली आणि हजारो पुणेकरांचे प्राण वाचवले. ब्रिटिश आणि मराठा कागदपत्रात मिळालेल्या त्रोटक संदर्भांवरून भोसले यांनी हा लेख लिहिला. देवदूतासारख्या धावून आलेल्या एका आगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्याची माहिती त्यायोगे
लोकांसमोर आली.
ऐतिहासिक विषयावर असे आगळेवेगळे लिखाण करणाऱ्या संभाजी भोसले यांना यंदाचा ‘स्नेहांजली पुरस्कार’ जाहीर झाला आहे. इतिहासावर सखोल अभ्यास करून त्याची वस्तुनिष्ठपणे मांडणी करणाऱ्या लेखकांमध्ये भोसले यांचा समावेश होतो. या पुरस्कारामुळे त्यांच्यासारख्या चिकित्सक आणि संशोधक वृत्तीच्या व्यक्तीचा योग्य सन्मान झाला आहे हे खरे.
>> आशुतोष बापट


























































