संस्कृती – मुकुंदरतीवर्धिनी यमुना

>> प्रा. स्नेहा नगरकर

नाद करणारी ती नदी असं जिचं वर्णन केलं जातं त्या नदीच्या संवर्धनासाठी सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी नदी दिन साजरा केला जातो. आपल्या तीरांना समृद्धीचे वाण देत खळाळणाऱया, अनेक आयुष्यं पोसणाऱया नदीची अनेक समृद्ध वर्णनं प्राचीन साहित्यात आढळतात. तिचं हे वाङ्मयीन सौंदर्य, पौराणिक महत्त्व पानोपानी आढळतं. पौराणिक कथा, लोककथा, साहित्य यात अढळपद मिळवलेल्या यमुनेचं हे पौराणिक महत्त्व.  

पाणी हे जीवनासाठी अति आवश्यक आहे. पृथ्वीचा 75 टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. यात फक्त 3 टक्के गेडे पाणी आहे आणि त्यातही 2 टक्के हे बर्फाच्या रूपात आहे. पाण्याच्या जीवनदायक गुणामुळे जगातील बहुतांश धर्मपरंपरांमध्ये त्याचे दैवतीकरण झाले आहे. जगातील अनेक संस्कृतींमध्ये नद्यांना मातेचे स्थान दिलेले आहे. नदीला स्त्रीरूप मानले गेले आहे आणि हिंदुस्थानात नद्या या पूजनीय समजल्या गेल्या आहेत. हिंदुस्थानातील अनेक तीर्थक्षेत्रे ही नद्यांच्या तटांवर वसलेली आहेत. हिंदू धर्मात नद्या या पावित्र्याची आणि सुफलनाची प्रतीके आहेत. या नद्यांमध्ये स्नान केल्यावर आपल्या पापांचे क्षालन होते अशी ही समजूत हिंदू धर्मात रूढ झाली आहे.

यमुना ही हिंदुस्थानातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. यमुना नदीचा उगम हिमालयाच्या मध्य भागात मिड मायोसीन कालखंडात झाला. यमुना ही मुळात सिंधू नदीच्या रिव्हर सिस्टमचा भाग होती, पण प्लेट टेक्टोनिक प्रक्रियेमुळे तिने आपला प्रवाह बदलला आणि ती गंगेची उपनदी बनली. यमुना ही गंगेची सगळय़ात मोठी आणि महत्त्वाची उपनदी आहे आणि या दोन नद्यांचा संगम प्रयागराज येथे होतो. यमुनेचा प्रवाह म्हणजे या नदीच्या यमुनोत्री येथील उगमापासून ते गंगेबरोबरच्या संगमापर्यंत 1376 किलोमीटर इतका लांब आहे. या नदीचा catchment एरिया 3,66,223 चौरस किलोमीटर इतका आहे. यमुनेचा उगम हा समुद्रसपाटीपासून 20,000 फूट वरती असलेल्या यमुनोत्री येथे होतो. यमुनोत्री हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे आणि अनेक यात्रेकरू या स्थानाला भेट देतात. उत्तर हिंदुस्थानातील चार पवित्र धामांपैकी यमुनोत्री एक आहे. इतर तीन धामे ही गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही आहेत. यमुनोत्री जवळच कलिन्द पर्वत आहे आणि याच पर्वताच्या उतारावरून यमुना नदी दक्षिणेकडे मार्गक्रमण करते. हिंदुस्थानी परंपरेत यमुनेला कालिंदी असेही म्हणतात, कारण तिला कलिन्द पर्वताची कन्या मानले गेले आहे.

यमुनोत्री येथे उगम पावलेली यमुना डाकपठार येथे मैदानी भागात (plains ) मध्ये प्रविष्ट होते. ताजेवाला येथे यमुनेची विभागणी पूर्व आणि पश्चिम अशा दोन कालव्यांमध्ये होते. पश्चिम यमुना कालवा हा मुळात 14 व्या शतकात फिरुझशहा तुघलक याने बांधला होता. पुढे मुघल काळात या कालव्याची डागडुजी करण्यात आली. पूर्व यमुना कालव्याची बांधणी ही ब्रिटिश काळात साधारण 1830 च्या दशकात झाली. यमुनेच्या तीरावर दिल्ली, वृंदावन, मथुरा, आग्रा, बाटेश्वर आणि प्रयाग ही काही प्रमुख शहरे वसलेली आहेत. दिल्ली येथे अश्मयुगीन काळापासून मानवाची वस्ती होती. पुराना किल्ला म्हणजेच प्राचीन इंद्रप्रस्थ येथे झालेल्या उत्खननामध्ये लोहयुग (Iron Age) काळापर्यंत मागे जाणारे पुरावशेष सापडले आहेत तसेच मौर्य, शुंग, कुशाण, गुप्त आणि मध्ययुगीन पुरावशेषसुद्धा सापडले आहेत. शहाजहानने 17 व्या शतकात बांधलेला लाल किल्ला आणि शहाजहानाबाद हे शहर यमुनेच्या जवळच होते, पण नंतर यमुनेचा प्रवाह बदलला. आग्रा येथील ताजमहाल यमुनेच्या तीरावरच बांधण्यात आला. आग्य्राच्या पुढे यमुनेवर बाटेश्वर नावाचे एक स्थान आहे जिथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. बाटेश्वरच्या दक्षिणेस चंबल नदी यमुनेला येऊन मिळते आणि ही यमुनेची प्रमुख उपनदी आहे. प्रयाग येथे यमुनेचा संगम गंगेबरोबर होतो. पद्म पुराणाच्या मते हा संगम हे सर्वात पावन आणि पवित्र असे तीर्थ आहे. गंगेचे पाणी हे शुभ्र आणि यमुनेचे जल हे गडद निळे आहे. या संगमात स्नान करणे अत्यंत पुण्यदायक समजले जाते.

यमुनेच्या जन्मकथा आपल्याला अनेक पुराणांमध्ये मिळतात. एका कथेप्रमाणे जयामुनी नावाच्या ऋषींच्या पुढाकाराने सात ऋषींनी यमुनेला पृथ्वीवर अवतरित करण्यासाठी कलिन्द पर्वतावरच्या एका कुंडावर अनेक वर्षे तप केले. या कुंडाला आता सप्तर्षी कुंड असे म्हटले जाते. या तपामुळे यमुना पृथ्वीवर अवतरित झाली आणि लोककल्याणासाठी तिचा प्रवाह वाहू लागला. यमुना ही सूर्याची किंवा विवस्वताची कन्या आहे असेही उल्लेख आपल्या वैदिक आणि पौराणिक वाङ्मयात सापडतात. विवस्वताचा विवाह हा विश्वकर्म्याची पुत्री संज्ञा हिच्याबरोबर झाला आणि त्यांना यम आणि यमी नावाची जुळी मुले झाली. ऋग्वेदात यम आणि यमी संवाददेखील आहे. मध्ययुगीन काळात गर्ग संहितेत असाही संदर्भ सापडतो की, यमुनेची उत्पत्ती कृष्णाच्या डाव्या स्कंधातून झाली.

मथुरा, वृंदावन आणि गोकुळ ही यमुनेच्या तटावर वसलेली, कृष्णभक्ती आणि उपासनेसाठी प्रसिद्ध असलेली तीर्थक्षेत्रे आहेत. ही तिन्ही ठिकाणे ऐतिहासिक आणि पुरातात्त्विक दृष्टीनेसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत. मथुरेत विश्राम घाट किंवा विश्रांती तीर्थ हा यमुनेवरचा सर्वात महत्त्वाचा घाट आहे. कंसाचा वध केल्यावर कृष्णाने या ठिकाणी विश्राम केला होता अशी एक समजूत आहे . येथे अनेक भाविक मंडळी स्नान करतात आणि यमुनेचे पूजन करतात. याच घाटावर यमुनेची अनेक मंदिरे आहेत. लोक यमुनेची आराधना या मंदिरांमध्येही करतात आणि यमुनेच्या जलप्रवाहाचीदेखील फुले आणि दूध अर्पण करून पूजा करतात. मथुरेत यमुनेच्या तीराजवळ काही पांढरीची टेकाडे (archaeological mounds) देखील आहेत. यमुनेच्या पात्राजवळ मथुरेत प्राचीन शिल्पांचे आणि पुराभिलेखांचे अवशेष सापडले आहेत. मथुरेच्या साधारण 12 किलोमीटर उत्तरेस वृंदावन हे तीर्थक्षेत्र आहे. वृंदावनात यमुनेला विशेष स्थान आहे. पुराणांमधील संदर्भांवरून असे समजते, श्रीकृष्णाच्या जीवनाचा आणि यमुना नदीचा खूप जवळचा संबंध आहे. बाल्यावस्थेत कृष्णाने यमुनेच्या डोहात उडी मारून कालीय नागाचे दमन केले. कृष्णाच्या या पराक्रमामुळे यमुनेचे किनारे यांना तीर्थांचे पावित्र्य लाभले. आजही वृंदावनात ‘कालीयदह’ नावाचा घाट आहे आणि भाविकांची अशी श्रद्धा आहे की, इथेच कृष्णाने कालीयदमन केले होते. भागवत पुराणात अशी कथा सापडते की, कृष्णाने गोपींचे चीरहरण केले आणि या कथेची आठवण म्हणून वृंदावनात चीरघाटदेखील आहे. वृंदावनातला सगळय़ात भव्य असा घाट म्हणजे केशीघाट! असे म्हटले जाते की, कृष्णाने केशी नावाच्या अश्वरूपी दैत्याचा वध येथे केला होता. पुराणांमधील संदर्भांवरून असेही समजते की, कृष्णाने यमुनेच्या तीरावर गोपींबरोबर रासक्रीडा केली होती तसेच कृष्णाने यमुनेच्या काठांवर गोचरण केले होते. यमुना ही कृष्णाची पट्टराणी आहे अशी ही एक समजूत आहे. कृष्णाच्या आठ प्रमुख राण्यांमध्ये कालिंदी ही एक राणी होती आणि ही कालिंदी म्हणजेच यमुना नदी अशी ही एक मान्यता आहे. यमुनेला कृष्णाचेच स्वरूप मानले गेले आहे. 16व्या शतकात वल्लभाचार्यांनी स्थापन केलेल्या पुष्टी संप्रदायात यमुना ही विशेष पूजनीय आहे. गर्ग संहितेत यमुनेच्या पूजनाचा विधी दिलेला आहे आणि याच ग्रंथात यमुनेचे सहस्रनामदेखील समाविष्ट करण्यात आले आहे.

यमुनेचे दैवतीकरण साधारण गुप्तकाळापासून किंवा त्याच्या थोडे आधी झाल्याचे समजते. यमुनेचा उल्लेख हा ऋग्वेदातील दहाव्या मंडलात नदीस्तुती सुक्तामध्ये प्रथम सापडतो. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिसच्या ‘इंडिका’ या ग्रंथात यमुनेचा संदर्भ आहे आणि हा संदर्भ मथुरा हे शहर आणि शूरसेन हे लोक यांच्याशी निगडित आहे. यमुनेचे माहात्म्य अनेक पुराणांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आद्य शंकराचार्यांपासून वल्लभाचार्य आणि रूप गोस्वामींपर्यंत अनेक भारतीय आचार्यांनी अष्टकांच्या रूपात यमुनेची स्तवने लिहिली आहेत. या अष्टकांमध्ये यमुनेचे नैसर्गिक सौंदर्य तसेच तिचे कृष्णाबरोबर असलेले जवळचे नाते अधोरेखित करण्यात आले आहे. गुप्तकाळापासून आपल्याला यमुना आणि गंगा यांच्या प्रतिमा मिळू लागतात. या प्रतिमा मुख्यत्वे मंदिरांच्या द्वारशाखांवर कोरल्या जात. यमुनेचे अंकन कश्यपावर उभ्या असलेल्या एका युवतीच्या स्वरूपात झाले आहे आणि या नदीदेवतेने एका हातात कुंभ धारण केला आहे. हा कुंभ समृद्धीचे प्रतीक आहे. अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये यमुनेचे अशा पद्धतीने अंकन करण्यात आले आहे.

आज यमुना अत्यंत प्रदूषित झाली आहे आणि तिचे शुद्धीकरण करणे हे एक मोठे आव्हान आहे. कृष्णप्रेमाचे वर्धन करणारी ही पुण्यसलीला यमुना परत शुद्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणे हे आजच्या काळात अत्यावश्यक झाले आहे.

(लेखिका पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासक आहेत)

 [email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या